आसाम-मिझोराम संघर्ष समजून घेताना…
आसाम आणि मिझोराम राष्ट्रीय माध्यमांमध्ये फारशी न चर्चीली जाणारी राज्य... मात्र, काही दिवसांपुर्वी या दोन राज्यातील सीमांवरुन झालेल्या वादात काही जवान मारले गेले. त्या निमित्ताने चर्चेला आलेल्या या राज्यांबाबत तुम्हाला नक्की काय काय माहिती आहे. या राज्यातील सामाजिक धार्मिक रचना कशी आहे? येथील लोकांचा व्यवसाय कोणता? या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांचा लेख;
आसाम, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँण्ड, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम ही ईशान्येकडील सातही राज्यांमधील समाज-संस्कृती टोळी वा निमटोळी समाजाची आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख असे सर्व धर्म या प्रदेशात आहेत. मात्र, मूलभूत अस्मिता जमातीची आहे. तिथली जातिव्यवस्थाही मुख्य भारतीय भूमीसारखी बंदिस्त नाही, बर्यापैकी सैल आहे.
यापैकी एकाही राज्यात अस्पृश्यता नाही. मुख्य भारतीय भूमीतील समूह काही प्रमाणात अस्पृश्यता पाळतात. परंतु तो काही तिथल्या समाजरचनेचा मुख्य प्रवाह नाही. आदिवासी कोणाला म्हणायचं ही देखील तिथली समस्या आहे. पिढ्यान् पिढ्या चहामळ्यांवर काम करणारे मुख्य भारतीय भूमीतील संथाल, मुंडा इत्यादी आदिवासींना तिथे परके मानलं जातं. त्यांना आदिवासी म्हणतात, परंतु अनुसूचित जाती-जमातींमध्ये त्यांचा समावेश नाही.
टोळीप्रधान समाजात दुसर्या टोळीबद्दल अविश्वास, संशय आणि भय असतं. टोळ्यांमधला संघर्ष सहजपणे हिंसक वळण घेतो. असमिया अशी एक ओळख नाही. अहोम, हिंदू, बोडो (यामध्ये अनेक जमातींचा समावेश होतो), कोच राजबंशी, बौद्ध, जैन, शाक्त, वैष्णव अशा अनेक ओळखी वा अस्मिता आहेत.
असमी, बोडो आणि बंगाली अशा तीन भाषांना आसाममध्ये राज्य भाषेचा दर्जा त्यांच्या प्रदेशानुसार आहे. उदाहरणार्थ सिल्चरमध्ये बंगाली ही राज्यकारभाराची भाषा आहे तर लोअर आसाममध्ये बोडो भाषेला ही मान्यता आहे. कोच राजबंशी आणि बोडो हे स्वतंत्र राज्याची मागणी करतात.
मेघालयात गारो आणि खाँसी या दोन भाषांमध्ये वर्तमानपत्रं निघतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बोडो भाषेतील आल्बम मोठ्या प्रमाणावर निघतात. चित्रपटही बनवले जातात.
एकट्या नागालँण्डमध्ये १७ प्रमुख जमाती आहेत. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे. नागा राष्ट्रवादाने या सर्व जमातींना नागा ही अस्मिता म्हणजे राजकीय-सांस्कृतिक ओळख दिली. बोडो राष्ट्रवादही हेच करू पाहातो आहे. कारण बोडोंमध्ये कचारी, गारो, तिवा अशा अनेक जमातींचा समावेश होतो. मिझोराममध्ये मिझो ही एक प्रमुख जमात आहे. मिझोंशिवाय अन्य जमातीही आहेत.
नागालँण्ड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा या राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा भिडलेल्या आहेत. अनेक गावं या सीमारेषांवर आहेत. काही घरं म्यानमारमध्ये तर काही घरं भारतात अशी स्थिती आहे. राष्ट्र-राज्य या राजकीय भूगोलात न बसणारी टोळीप्रधान संस्कृती तिथे आहे.
ईशान्य भारतात केरळी, पंजाबी, तमिळ, बंगाली, उडिया, नेपाळी, हिंदी, मारवाडी असे अनेक प्रांतातील लोक पिढ्यान पिढ्या स्थायिक झालेले आहेत. म्यानमारमधील राजकीय घडामोडींचा परिणाम या प्रदेशामध्ये होतो. म्यानमारमध्ये भारतीयांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. तिथल्या सरकारने भारतीयांची मालमत्ता जप्त केली. त्यामुळे अनेक जण भारतीय यामध्ये तमिळ, बंगाली, शीख इत्यादींचा समावेश आहे, मिझोराम, मणिपूर या राज्यांमध्ये स्थायिक झाले.
१९५० च्या दशकात अरुणाचल प्रदेशात प्रशासन पोहोचलं नव्हतं. नागालँण्डमधील अनेक जिल्ह्यांमध्ये साठच्या दशकातही म्यानमार आणि भारत दोन्ही देशांचं चलन अनेक गावांमध्ये व्यवहारात होतं.
राष्ट्र-राज्य ही मूलतः आर्थिक-राजकीय रचना आहे. आपआपल्या समाजसंस्कृतीनुसार त्या रचनेचा वेगवेगळा अर्थ लावला जातो. १९७० नंतर निर्माण झालेली राज्यं भाषावार प्रांत रचनेवर आधारित नाहीत. तेलंगण आणि आंध्र प्रदेश यांची भाषा एकच आहे. परंतु स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी तेलंगणात प्रदीर्घ आंदोलन झालं. तीच गत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड यांची आहे.
अडचण अशी की सत्ताधारी वर्गाला (या वर्गात प्रामुख्याने ब्राह्मण व अन्य सवर्णांचा आणि मध्यमवर्गातील विविध धर्मीयांचा समावेश होतो) आणि भाजप व अन्य मूर्ख राष्ट्रवादी लोकांना एकात्मतेची नशा असते.
आपण सर्वप्रथम भारतीय आहोत. नंतर बंगाली, मराठी, इत्यादी अशी टाळ्या घेणारी परंतू फसवी विधानं म्हणून केली जातात. पाकिस्तानातील बलुचिस्तानातील एक पुढारी म्हणाला होता. हजारो वर्षं आम्ही बलुच आहोत. दोन-पाचशे वर्षांपासून मुस्लिम आहोत. तिच गत भारतीय उपखंडातील हजारो समूहांची आहे. गडचिरोलीतील आदिवासी हजारो वर्षं गोंड आहेत, भारतीय ही ओळख ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांना मिळाली, ते भारताचे नागरिक बनले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. ही साधी बाब आपल्याला माहीत नसते.
भारतीय उपखंडाची शक्ती विविधतेमध्ये आहे, एकात्मतेमध्ये नाही, ही बाब आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमा संघर्षामुळे आपल्या ध्यानात यायला हवी.