पत्रकारीता आणि अन्वय नाईक प्रकरणाचा संबंध काय?

अर्णब गोस्वामी ला अन्वय नाईक प्रकरणात अटक झाली असताना, अन्वय नाईक हे प्रकरण अर्णब गोस्वामी चे वैयक्तीक प्रकरण असल्याने हा पत्रकारीतेवर हल्ला कसा होणार? पत्रकार एस. एम. देशमुख यांचा सवाल;

Update: 2020-11-04 06:27 GMT

रिपब्लिक टीव्हीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याला पोलिसांनी इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली असून त्यांनी हे प्रकरण अर्णब गोस्वामी यांचं वैयक्तिक प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.

रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे.. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही..त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही.

मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती. पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी. अशी मागणी केली होती.

त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली. या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही.

दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल. अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी याचा नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.. त्यांची पत्रकारिता समर्थनीय नाही असे आम्हाला वाटते..

Tags:    

Similar News