देहू संस्थानचे पदाधिकारी भोंदु? रवींद्र पोखरकर
संत तुकाराम महाराज कोण होते? तुकारामांचे धार्मिक सामाजिक क्रांतीकारक विचार काय आहेत? तुकारामाचे मंदिर उभारण्यात कोणाचा स्वार्थ आहे?बंडखोर आणि धाडशी मानवतावादी संत तुकाराम महाराज कोण सांगणार?असे चिकित्सक प्रश्न उपस्थित केले आहेत लेखक रवींद्र पोखरकर यांनी...;
देहू संस्थानचे पदाधिकारी मुळातच भोंदू आहेत. त्यांना चिलीम ओढणाऱ्या किंवा अन्य तशाच पद्धतीच्या तथाकथित बुवा-बाबा-महाराजांच्या मंदिर-मठांप्रमाणेच देहूतील संत तुकाराम मंदिर असावे आणि त्या मंदिरांमध्ये येतात तशाच धार्मिक अंधश्रद्धाळूंच्या मोठ्या झुंडी देहूत याव्यात असं वाटतं.तुकोबारायांनी आपल्या अभंगांतून, कीर्तन- प्रवचनातून त्या काळाच्या परिप्रेक्ष्यात जे काही धार्मिक-सामाजिक क्रांतिकारक विचार सांगितले,जे बंड केलं ते लोकांपर्यंत पोहचावं असं देहू संस्थानला वाटतच नाही,त्या विचारांपेक्षा त्यांचं सदेह वैकुंठाला जाणं या मंडळींना अधिक महत्वाचं वाटतं.संत तुकाराम महाराजांच्या विचारांच्या प्रसारासाठी, धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्रातील वाढती भोंदूगिरी रोखण्यासाठी काही प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी 'हेच ते स्थान..जिथून तुकोबारायांचे वैकुंठाला सदेह प्रस्थान झाले' याचं मार्केटींग या मंडळींना अधिक महत्वाचं वाटतं.
टाळ-चिपळ्या हाती घेऊन,संसाराकडे दुर्लक्ष करून फक्त विठ्ठल-विठ्ठल करत राहणारे आणि अन्यायापुढे शरणागती पत्करून हवालदिल,निराश होणारे जे तुकोबाराय आपल्याला वर्षानुवर्षे सांगितले-दाखवले गेले ते असत्य असून संत तुकाराम महाराज हे बंडखोर आणि धाडशी त्याचप्रमाणे अत्यंत मानवतावादी होते हे वास्तव अनेक संदर्भांसह अभ्यासूपणे मांडणाऱ्या डॉ.आ.ह.साळुंखे यांचे 'विद्रोही तुकाराम' हे पुस्तक किंवा लोकसत्ताने वर्षभर चालवलेल्या तुलसी आंबिले यांच्या अतिशय सुंदर लेखमालेचा संग्रह देहू संस्थानचे पदाधिकारी मंदिर परिसरातील पुस्तकांच्या दुकानांमध्ये विक्रीला ठेवू देत नाहीत यावरून या लोकांची मानसिकता कळू शकते.
तुकोबारायांनी आयुष्यभर ज्या प्रवृत्तीशी वैचारिक संघर्ष केला त्याच विचारांची पालखी आज हे देहू संस्थानचे लोक अतिशय अभिमानाने आपल्या डोक्यावरून वाहताहेत.त्यामुळेच या संस्थानच्या लोकांचे भाजप-फडणवीस-मोदी प्रेम आणि तिथे घडलेल्या ताज्या वादाविषयी मला तरी अजिबात आश्चर्य वाटलं नाही..