अर्वाचिन मुंबईचे शिल्पकार !

मुंबईच्या १९व्या शतकातील इतिहासाचे प्रणेते व ज्येष्ठ समाज सुधारक जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांची आज जयंती. मुंबईच्या या शिल्पकाराला एक मुंबईकर म्हणून मानाचा मुजरा शब्दातून व्यक्त केलाय ज्येष्ठ संपादक भारतकुमार यांनी..;

Update: 2021-02-10 03:36 GMT

१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईतील असे एकही क्षेत्र नव्हते ज्यावर नानांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला नाही. समाजकारण, समाज सुधारणा, प्रशासन, विकास, धार्मिक रुढी अशा सर्व क्षेत्रांत नानांनी भरीव कामगिरी बजावली. त्यांचा जन्म एका व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली.

नानांचे वडील १८२२ मध्ये निधन पावले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. नानांत्यांवर सर जमशेटजी जिजिभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळा-पुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापन रेलीच. पुढे १८२४ मध्ये तिचेच बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.

एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय वेगवेगळे झाले.बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली.

मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते. नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले.

मुंबईच्या प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गँस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वेगाडी १८५३ मध्ये धावली, तिचे कार्यालय नानांच्या राहत्या घरातच होते.

नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या. देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. नानांचे वयाच्या ६२ व्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.

असे नाना शंकरशेट. त्यांच्या कार्याची गणती करायची तर ग्रंथ लिहावे लागतील. असे युगपुरुष काळाच्या प्रवाहात विस्मरणात जातात, हे दुर्दैव ! कै. पु बा कुळकर्णी लिखित 'जगन्नाथ शंकरशेट: काळ व कामगिरी' या नानांच्या चरित्र ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २०१५ मध्ये झाले. त्याची प्रस्तावना लिहिण्याची संधी मला मिळाली, हे माझे परम भाग्य!

Tags:    

Similar News