Bageshwar Dham Sarkar सगळे काही हिंदुत्वासाठी ... पुरुषोत्तम आवारे पाटील
गपुरात बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री याना श्याम मानव यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिल्यानंतर त्यांच्या भक्तांना जो भयंकर राग आला तो काही अजूनही थांबला नाही. अनिसचे कार्यकर्ते आणि पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांना श्याम मानव समजून ट्रोलिंग आणि शिवीगाळ करण्यात आली. या अनुभवांना वाट मोकळी करून दिली आहे पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी..;
नागपुरात बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री याना श्याम मानव यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिल्यानंतर त्यांच्या भक्तांना जो भयंकर राग आला तो काही अजूनही थांबला नाही. अनिसचे कार्यकर्ते आणि पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांना श्याम मानव समजून ट्रोलिंग आणि शिवीगाळ करण्यात आली. या अनुभवांना वाट मोकळी करून दिली आहे पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी..
सगळ्या राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे तो राष्ट्रव्यापी झाला आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा चाहता वर्ग देशभरात आहे त्यामुळे प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. अलीकडे असा एकही प्रवचनकार सापडत नाही की ज्याचे देशभर अनुयायी नाहीत. सोशल मीडियाने प्रचार,प्रसार सहज उपलब्ध करून दिल्यामुळे आणि सगळे प्रवचनकार धर्माचा आधार घेत असल्याने त्यांच्यावरचा हल्ला हा प्रत्येक भक्ताला स्वतःवर झालेला हल्ला वाटत आहे. वास्तविक या घटनेत रामकथा,हिंदुधर्म आणि अंनिस यांचा तास काहीही संबंध नाही. श्याम मानव यांनी शास्त्रीजी जादूटोणा विरोधी कायद्याचे कसे उल्लंघन करीत आहेत हे दाखवून त्यांच्या दिव्यदरबार बाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ किंवा श्याम मानव यांनी आधीच हे स्पष्ट केले आहे की आमचा कोणत्याही देवा,धर्माला विरोध नाही. धीरेंद्र शास्त्री या दरम्यान जो दिव्यादरबार घेऊन ज्या काही आक्षेपार्ह कृती करतात आणि आपल्यात दैवी शक्ती असल्याचा जो दावा करतात तेवढ्यापुरता खरतर हा विषय आहे. कोणत्याही बुवा,बाबाना मात्र असा हस्तक्षेप सहन होत नसतो. तसा तो धीरेंद्र शास्त्री यांनाही सहन झालेला दिसत नाही. आपण जे काही करीत आहोत त्याला धर्माचा आणि धर्म रक्षणाचा तडका मारला की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात हे आजवर सिद्ध झालेले आहे. अशा प्रसंगात बुवा,बाबाना मानणाऱ्या भक्तांचा काहीही दोष नसतो. भक्त नेहमीच प्रामाणिक असतात. आपला बाबा नेमके काय करतो हे अनेकदा प्रामाणिक भक्तांना माहित नसते. बाबा राम रहीम,आसाराम बापू यांच्याही प्रकरणात प्रामाणिक भक्तांची गोची झालेली दिसते.
धीरेंद्र शास्त्री यांचे प्रकरण थेट या बदमाश बुवा,बाबांसारखे नसले तरी दावा मात्र सारखा असल्याचे जाणवते. मी कोणताही चमत्कार करीत नाही किंवा माझ्यात काहीही दैवी शक्ती नाही असे धीरेंद्र शास्त्री सांगतात आणि वरून भक्तांचे भविष्य सांगतात. त्यावर विचारले असता ही भगवान हनुमानाची देणगी असल्याचेही सांगतात याचा अर्थ काय होतो हे कुणाला समजत नाही असा कदाचित त्यांचा समज असावा. कोणत्याही विवेकशील व्यक्तीचा अशा दाव्याला नक्कीच विरोध असतो. मुद्दा स्पष्ट आहे की खरोखर त्यांच्याजवळ दिव्यशक्ती असेल तर टी सिद्ध करून दाखवायला एवढे आकांडतांडव करण्याची गरज नसावी. एकदा ती दाखवून श्याम मानव यांचे तोंड कायमचे बंद करण्याची उत्तम संधी त्यांच्याकडे आली असताना त्यांनी ती वाया का घालवली हे समजत नाही. आश्रमात बसूनही बाबा श्याम मानव याना दिव्यशक्तीचा अनुभव दाखवू शकले तर उत्तम होईल.
कोणत्याही धर्मातील अंधश्रद्धा वाईटच असतात. त्या बंद व्हाव्यात यासाठी त्या धर्मातील सुधारणावादी लोक प्रयत्न करीत असतात मात्र त्यांचे प्रयत्न कमी पडतात हे मान्य केले पाहिजे. धार्मिक सुधारणेबाबत मी सावरकरवादी आहे. मला त्यांनी केलेली धर्माची चिकित्सा आजही मोलाची वाटते. माझा धर्म अधिक निकोप आणि सुदृढ व्हावा असे वाटणे चुकीचे नाही त्यासाठी धर्माच्या वेलीवर वाढणारी अंधश्रद्धांची बांडगुळे आपणच छाटली पाहिजेत असे सावकार नेहमी म्हणत असत. आजच्या हिंदुत्वादी समूहाला हे सावरकर नको आहेत असे वाटते. अशी एखादी घटना घडली की एक हमखास प्रश्न विचारला जातो. तुम्हाला इस्लाम आणि मिशनरी यांच्यात असलेली बुवाबाजी दिसत नाही का ? त्यांच्याबाबत बोलताना ---- फाटते का ? असा सवाल करणाऱ्या कुणालाही मानव यांनी ख्रिश्चन मिशनरी आणि मुस्लिम बाबाना सुद्धा अशी आव्हाने दिली आहेत याची माहिती नसते.
आमच्या गुरुजींना बोलतो याचा अर्थ कुठून तरी सुपारी घेतली असावी असा संशय भक्त परिवारात अलीकडे जाणीवपूर्वक निराम करून दिला जातो आणि मग भक्तांना चेकाळून दिले जाते. मग व्हॉटस अप विद्यापीठात शिकलेले भक्त एखाद्यावर तुटून पडतात. सोशल मीडियावर त्यांच्या भाषेचा स्तर एवढा गलिच्छ होतो की दुर्गंधीला सुद्धा लाज वाटते. सगळेच भक्त असे नसतात , काहींची विवेकशक्ती कायम असते ते चारही बाजूनी विचार करतात आणि ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात. काही मात्र उन्मत्त आणि वेडे झालेले असतात मात्र त्यांची संख्या बोटांवर मोजण्याएवढी असते. कुणी रास्त प्रश्न विचारला तरी त्याचा संपर्क नंबर जाहीर करून त्याला त्रास देण्याची मोहीम सुरु करणे हा अलीकडे कोणत्याही बाबांच्याअनुयायांचा लोकप्रिय फंडा झाला आहे. चर्चा न करता थेट शिव्यांची संवादाची सुरुवात करण्याचा नवा संस्कार जणू यांच्यावर केला जातो की काय असा संशय यावा अशा गतीने हे घडत जाते.
धीरेंद्र शास्त्री यांच्या या प्रकरणी देशभरातून अनेक अनुयायी फोन करतात आणि थेट विचारतात की क्योरे मादर... ? यातून भक्त बनलेल्या व्यक्तीचा मेंदू कशापद्धतीने गुलाम झालेला असतो याचा अनुभव येतो. आमच्या गुरुजींनी काहीही केले तरी आम्ही त्यांच्या सोबत आहोत कारण गुरुजी हिंदुत्व सांगत असतात. याचा सरळ अर्थ असाही होतोय की गुरुजींनी काहीही करावे आणि सतत संदर्भ मात्र धर्माचे द्यावेत. मुळात प्रश्न असा आहे की आपल्याला असे हिंदुत्व अपेक्षित आहे काय ? चार्वाकाच्या काळातही देव,धर्म नाकारणाऱ्या समूहासोबत जर शंकराचार्य एका मंचावर चर्चा करीत असतील तर त्यांचा धर्म कोणता होता ? हे या निमित्ताने शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
Purushottam Aware patil