आंदोलन कुठे, कशासाठी? वंचितचं नेमकं काय सुरुये!

‘राहुल गांधींनी माफी मागावी’ यासाठी वंचित बहुजन आघाडीने ॲड. असीम सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर केलेलं आंदोलन योग्य आहे का? VBA भाजपचा नरेटिव्ह प्रस्थापित करतेय का? VBAची भूमिका नेमकी काय? राहुल गांधींच्या आरक्षणाविषयी वक्तव्यावरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत का? यासंदर्भात वाचा विश्वंभर चौधरी यांचे मत...

Update: 2024-09-15 09:02 GMT

वंचितचं आजचं असीमच्या ऑफिसवरचं आंदोलन आमच्यासाठी अनाकलनीय होतं आणि तितकंच आश्चर्यकारक.

राहूल गांधी आरक्षण विरोधात काहीच बोलले नाहीत, उलट 'भारतात समानता आली की काढू आरक्षण' हे त्यांचं sarcastic अर्थात छद्मी विधान होतं. पाच हजार वर्ष ज्यांनी जातीमुळे भोगलं त्यांचं दुःख अजूनही संपलेलं नाही आणि म्हणून सगळे समानतेच्या पातळीवर येत नाहीत तोपर्यंत आरक्षण चालू राहीलं पाहिजे हे त्यांचं म्हणणं.

आता यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी आंदोलन केलं ते आपण समजूच शकतो. बुद्धीभेद आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवणं हा भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा आत्माच आहे. आणि त्यांचा मतदारही ढोंगीच आहे पण वंचितला या भूमिकेत काय वावगं वाटलं ते कळलं नाही.

निर्भय बनो आरक्षणवादी आहे. ज्यांच्यावर पाच हजार वर्ष जातीमुळे अन्याय झाला त्यांच्यावरचा अन्याय सत्तर वर्षात संपला आणि आता आर्थिक निकषावर आरक्षण ही भूमिकाच ढोंगी आहे असं आमचं मत आहे. अर्थात ज्यांची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट आहे अशा कोणत्याही जातसमूहाला आरक्षण दिलं पाहिजे असंही आम्हाला वाटतं आणि ते ओबीसी/एससी एसटी कोटा कमी न करता द्यावं असंही आमचं मत आहे.

निर्भय बनोच्या सर्व सभांमधून आम्ही लॅटरल एन्ट्री अर्थात मागच्या दारानं संघ परिवारातले लोक घुसवून घटनादत्त आरक्षणाला हरताळ फासणाऱ्या मोदी धोरणावर आम्हीच हल्ला चढवला. तरीही आमचा राग का हेच आम्हाला कळेनासं झालं. फेसबुकवर वाचलं की आज रावसाहेब कसबे सरांच्या घरासमोर पण आंदोलन झालं. हे अतिशय दुःखद आहे.

आम्ही आंदोलकांशी चर्चाही केली असती पण त्यांची आमच्यापर्यंत आलेली मागणी फार विचित्र होती. राहूल गांधींना माफी मागायला सांगावं अशी त्यांची मागणी होती! ही मागणी असीम किंवा कोणीही कशी पूर्ण करणार? राहूल गांधींची आणि असीमच्या दोन भेटी झाल्या, एक भारत जोडो यात्रे दरम्यान आणि एक अशोका फेलोज सोबत सात आठ वर्षांपूर्वी! राहूल गांधी आम्हाला काय खेळण्यातला भिडू म्हणून ओळखतात काय? आम्ही काँग्रेसचे प्राथमिक सभासद देखील नसतांना राहूल गांधी का आमचं ऐकतील आणि का भेटतील? आणि जे राहूल गांधी बोललेच नाही त्याबाबत माफी मागा अशी मागणी आम्ही कशी करायची?

अजून एक सांगायचं आहे. निर्भय बनो म्हणून आम्ही कोणत्याच पक्षाच्या कोणत्याच नेत्याची भेट मागत नाही. ज्यांच्याकडून निरोप येतो त्यांना जरूर भेटतो.

निर्भय बनोची कल्पना राजकीय नाही, लोकसहभागाची आहे. गांधी-आंबेडकर एकत्रीकरण हाच भारताच्या भविष्याचा मार्ग आहे ही धारणा घेऊन आम्ही चालतो. हे दोघंच भारताला घडवू शकतात यावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच आजचं आंदोलन आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि दुःखदायक दोन्ही होतं.

जाताजाता हेही कृतज्ञतापूर्वक सांगितलं पाहिजे की सिन्नर आणि पुण्यातील वागळे सरांवरच्या बेशरम हल्ल्यानंतर आम्हाला प्रत्येक सभेला संरक्षण दिलं ते आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी. त्यांचं जे प्रेम आम्ही अनुभवलं त्या काळात ते वर्णन करण्याच्या पलिकडचं आहे.

Tags:    

Similar News