Afghanistan Crisis: इम्रान खानचं ट्वीट नक्की काय सांगतं?

तालिबानने अफगाणिस्तावर वर्चस्व मिळवताच इम्रान खान यांनी जे ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटच नक्की अर्थ काय आहे? तालिबानच्या वर्चस्वाने पाकिस्तान आनंदी का होतोय? वाचा तृप्ती डिग्गीकर यांचं विश्लेषण

Update: 2021-08-17 04:00 GMT

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अफगाणिस्तानातील स्थित्यंतराबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. तालिबान्यांच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानातील गुलामगिरी नष्ट झाली असे इमरान म्हणतात...

अश्रफ घनी हुकूमशहा होते का? पाकमध्ये गोडधोड वाटप सुरू आहे.... पाकिस्तान सरकार व सैन्य तालिबान्यांचे आश्रयदाते आहेत. आता याचे आणखी पुरावे शोधण्याची गरज नाही. आता इमरान खान यांनी स्वत: राजीनामा देत तालिबान्यांच्या हाती पाकिस्तानचा तख्त द्यावा म्हणजे पाकिस्तानमधील सांस्कृतिक वादही मिटतील. कारण पाकचे परराष्ट्र धोरण अंमलात आणण्याची जबाबदारी कट्टरवादी संघटनांवर सोपवली आहे.

१९४७ मध्ये एका कौमसाठी पाकिस्तान व हिंदूस्तान फाळणी झाली होती. नंतर असं घडलं की, कौमसाठी भूभाग मिळाला. मात्र, त्यातून कौम गायब झाली. पाक भूभागावर सिंधी, पंजाबी, पाश्तो,बलुच, शिया, अल्पसंख्यांक हिंदू, काश्मिरी मुसलमान, गुर्जरी, सराईकी अशा भाषा व प्रादेशिक अस्मितांवरून मतभेद कायम राहिले. पंजाबी भाषा ५७.८ टक्के पाकिस्तानी बोलतात. म्हणजे कौमी एकतेचा आधार इस्लाम होऊ शकला नाही हे पाकचे वास्तव असताना इमरान खान यांचे अफगाणिस्तानबद्दलचे आजचे वक्तव्य स्वार्थी व महासत्तांच्या अंकित राहून सत्ता चालविण्याच्या परंपरेचा कळस आहे. आशिया खंडात जणू काही कौमला एकजूट करणारा पाकिस्तानच आहे. अशा अविर्भावात तिथले सत्ताधारी बोलत आले आहेत.

२०२१ च्या सुरूवातीलाच इमरान खान यांनी पॅलेस्टाईनचे समर्थन करत टि्वट केले होते. हमासबद्दलची भूमिका काय आहे? हे मात्र ते कधी विस्ताराने बोलले नाहीत. त्याबद्दलचे त्यांचे वक्तव्य कधी वाचनात आले नाही. मात्र, चोमस्कीचे कोट त्या टि्वटमध्ये होते म्हणजे इमरान हमास या संघटनेलाही वैध मानतात हेच सिद्ध होते.

#WeStandWithGaza #WeStandWithPalestine असे लिहित इमरान खान यांनी टि्वट केलेले.  



 


मग इमरान खान तालिबान, हमास इ. इ. कडेच कारभार का सोपवत नाहीत? शिवाय चीनमधील विघूर मुस्लिमांबद्दल खान साहेब मौन का? काश्मीरींचा पुळका भारी आहे त्यांना. मग विघूर त्यांच्या कौमचा हिस्सा नाहीत का? रोहिंग्यांसाठी चर्चा व राजनयिक शिष्टाचारांपलिकडे पाकिस्तानने काय केले? कौमसाठी भूभाग मागितलेल्या पाकिस्तानचा जन्म आपल्या देशासोबतचाच आहे. पण त्यांना कौमलाही बांधता आले नाही व विकासाच्या नावाने भोपळाच आहे. तात्पर्य सांस्कृतिक राष्ट्रवाद ही फोल संकल्पना आहे. महासत्तांचे मांडलिकत्व हेच त्यातून हाती आलेले वास्तव आहे.

- तृप्ती डिग्गीकर

#Afghanistan

#TalibanDestroyingAfghanistan

Tags:    

Similar News