धार्मिकता: अफगाणिस्तान आणि भारत
अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हाती गेल्यामुळे तेथील महिलांचं काय होणार? अशी चिंता व्यक्त करणाऱ्या लोकांना आपल्या देशातील महिलांचे अत्याचार का दिसत नसतील? धर्म अफगाणिस्तान मधल्या तालिबानी कठ्ठरतावाद्याचा असो अथवा भारतातील कठ्ठरतावाद्यांचा असो त्रास तर महिलांनाच होतो ना? धार्मिक द्वेषाला विवेकाची फोडणी देणारा आनंद शितोळे यांचा लेख;
#अफगाणडायरी०३
'पहा पहा तालिबानी कसे वाईट आहेत, दुष्ट आहेत, मुसलमान असेच असतात, इस्लामिक तत्वज्ञान हे असचं आहे. गेल्या शेकडो वर्षाचा इतिहास मुस्लीम आक्रमणाचा आहे. ब्ला ब्ला ब्ला '
सगळ्या तथाकथित हिंदू राष्ट्र निर्मितीच्या पिपाण्या वाजवणाऱ्या लोकांचा साधारण हाच सूर सगळीकडे आहे. मुळात त्यांचा धार्मिक अजेंडा रेटायला तालिबानने मोठी सुवर्णसंधी पुन्हा एकदा निर्माण करून दिलेली आहे. पण तालिबानी लोकांना नाव ठेवताना एक म्हणं आठवते. "आपलं ठेवावं झाकून, लोकांच पहावं वाकून" साधी उदाहरण पहा.
मुलींनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल कुणी वक्तव्य केलेलं? मुलींना मोबाईल देऊ नयेत असं कुठल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणाल्या? १४ फेब्रुवारीला जोडपी सापडली की आम्ही त्यांची बळीच लग्न लावून देऊ असं कोणती संघटना म्हणते? गोमांस आहे या निव्वळ संशयावरून झुंडीने दगडांनी ठेवून माणसांचा खून करणारी कोण लोक आहेत? या झुंडबळीचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला झुंडीने मारून टाकणारी कोण लोक आहेत?
मुलींनी चूल आणि मुल हे पाहणे, नवऱ्याच्या धाकात राहणे, नवऱ्याचा शब्द झेलणे, पारंपारिक वस्त्र परिधान करणे हे नाती जपूया नावाच्या कार्यक्रमात जाहीरपणे सांगणाऱ्या एक वकील महिला आठवतात का?
लग्न हा एक करार असतो आणि बायकांनी घर सांभाळणे अपेक्षित असते असं कोण म्हणाले? विद्यापीठात उपहारगृहात अन्न शाकाहारी असावे की मिश्र याच्या उठाठेवी कोण करत आहे? हिंदू स्त्रियांनी जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावीत असे सल्ले देणारे बिनलग्नाचे नारिंगी परकर घालणारे हुच्च लोक कोण आहेत? मग तालिबानी आले की महिलांच्या हालात भर पडेल, मुलींचे शिक्षण थांबेल, त्यांचा विकास थांबेल असं गळे काढून रडताना आपण आपल्या देशात वेगळं काय करतो आहोत?
"ढोल, गवार, शुद्र, पशू, नारी, ये सब है ताडन के अधिकारी "असं लिहून जाणाऱ्या माणसाला आपण संत म्हणतो? तालिबानी नालायक आहेतच, क्रूर आहेतच, त्यांचा धोका सगळ्या मानवजातीला आहेच पण तुम्ही इथल्याच आपल्या नागरिकांचा, आपल्या समाज बांधवांच्या आयुष्याचा नरक करून ठेवलाय. त्याची पाप कुठल्या गंगेत धुणार आहात रे चोरांनो?
त्यामुळे इथले तालिबानींना पाठींबा देणारी वक्तव्य करणारे मुसलमान जेवढे बेअक्कल, मूर्ख आणि हरामी आहेत तेवढेच तालिबानींचा बागुलबुवा दाखवून त्यांच्यामुळे धर्म खतरेमे येणार आहे. म्हणून गळे काढणारे भ्रष्ट कट्टरवादी नालायक आहेत.
ब्रिटीशांचे राज्य संपून १९२० च्या आसपास अफगाणिस्तान स्वतंत्र झाला आणि राजेशाही आली. आपल्यासोबत पाकिस्तानची निर्मिती झाली. ज्या ज्या देशांनी धर्माला देशापेक्षा मोठा होऊ दिला. धर्म बोकांडी बसला की देशाच टिपाड वाजलं म्हणून समजा. आपल्या बापजाद्यांना ही जाणीव होती. तेवढे शहाणपण त्यांच्यात होते म्हणून त्यांनी भारताची राज्यघटना लिहिताना देश संविधानानुसार चालेल हे ठणकावून सांगितलेलं आहे.
आपली जबाबदारी हा देश संविधानानुसार चालेल याची काळजी घेण्याची आहे. संविधानाचे रक्षण करायचे म्हणजे त्याला पोथी बनवून कडीकुलपात बंद करून ठेवायचं नाहीये ना? त्याची पारायण करून हरीनाम सप्ते बसवायचे आहेत तर नागरिक म्हणून आपण कायदेपालन करून जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. सबब आपण आपल्या घराला सुरक्षित ठेवूया, आपण आपला देश नीट राहील याची काळजी करूया, अफगाणिस्तानची काळजी अफगाण लोक करतीलच.
आनंद शितोळे