नशा, पैसा आणि धोका…!
आर्यन खान प्रकरणावरुन महीनाभर मिडीया आणि सोशल मिडीयावर गदारोळ झाला. आर्यनच्या जामीनावरील सुटकेने वादळ शांत होईल असं वाटत असतानाही आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. या प्रकरणावर सामाजिक, राजकीय आणि मानशास्त्रीय दृष्टीकोनातून भाष्य केलयं हेमंत पाटील यांनी.....;
"आर्यन सुटला, गोसावी अडकला."
"आरोपी सुटला अन पंच गुतला."
"मन्नत पे जन्नत ।"
"नवाबांनी हटकले, वानखेडे लटकले."
"ज्ञानदेवचा झाला दाऊद."
" मालिकांचा सुरा आणि कोंबडीची तडफड."
वानखेडेंच्या कोर्टवाऱ्या सुरू.
मन्नतवर 4 दिवस आधी दिवाळी.
माणेशिंदें रोहतगीना सुटकेस तर इतरांना ब्रिफकेस.
वानखेडे कुटुंबांचे हिंदू म्हणून आक्रोश.
मराठी लोकांना न्याय द्या..
हे सर्व आगामी चित्रपटाची शीर्षक नाहीत किंवा चित्रपटांचे सीन नाही. गेल्या 29 दिवस घडत असलेल्या घटनांमधील वास्तव आहे.
ही घटना सर्वांना माहीत आहे.
2 ऑक्टोबरला एन सी बी च्या 20 अधिकाऱ्यांनी मुंबईवरून गोव्याला निघालेल्या एका क्रुजवर धाड घालून 8 मुलामुलींना ड्रग घेतल्याच्या आरोपावरून पकडले. गोव्याला निघालेले ते क्रुज परत मुंबईच्या दिशेने वळविण्यात आले. मुंबईत त्या आठ लोकांना उतरवले. त्यांना एनसीबीच्या कार्यालयात आणले. क्रुज परत गोव्याला रवाना करण्यात आले. समीर वानखेडे आणि त्यांची टीम या पार्टीवर नजर ठेवून होते. इन्स्टावरून या पार्टीची जाहिरात देण्यात आली होती. त्यामुळे समीर वानखेडेंसह त्यांच्या टीमनेही या पार्टीत भाग घेऊन सापळा रचला होता. त्यानंतर पार्टी ऐन रंगात आलेली असताना आणि पार्टीतील तरुणांनी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली असताना वानखेडे आणि त्यांच्या टीमने ताब्यात घेतलं. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या घटनेत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन सुद्धा सापडला होता. देशात मोठी खळबळ माजली. सुशांतसिंगच्या वेळेस असेच एनसीबी चर्चेत आले होते. विशेष करून समीर वानखेडे जास्त चर्चेत आले. त्यांनी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. दीपिका पदुकोण, भारती सिंग यांची सुद्धा चौकशी केली होती. भारती सिंगकडे काही ग्रॅम ड्रग सापडले होते. परंतु तिला लगेच जामीन मिळाला. साधारणपणे 10 महिन्यांपूर्वी समीर वानखेडेंनी नवाब मालिकांच्या जावईवर कारवाई केली होती. 9 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला. समीर वानखेडे ड्रग माफियांचे कर्दनकाळ बनले. भाजपच्या लोकांचे गळ्यातील ताईत बनले होते.
वास्तविक पाहता समीर वानखेडे हे नवाब मालिकांचे नातेवाईक. तरीही त्यांनी त्यांच्या जावईवर कारवाई केल्याने मलिक काहीसे चिडले. त्यांनी शांतपणे वानखेडेंच्या धाडसत्राचा अभ्यास सुरू केला. वानखेडेंविरुद्ध कागदपत्र जमा केली. वानखेडेंनी बॉलिवूड मधील सेलिब्रेटींच्या काही ग्रॅम ड्रगवर कशी कारवाई केली आणि त्यात काही माया गोळा केली का.. ती प्रकरणे खरी होती का… त्यामागे नक्की कोणते उद्देश होते हे शोधून काढण्याचा प्रयत्न मालिकांनी केला.त्यात काही प्रमाणात त्यांना यश मिळाले. मालिकांनी वानखेडे मुस्लिम आहेत तरी त्यांनी एससी दाखवून सरकारची फसवणूक केली व नोकरी मिळवली हे कागदपत्राद्वारे मीडिया समोर आणले. आर्यन खानच्या ह्या धाडीमध्ये 25 कोटी रुपयांची खंडणी गोसावीनी मागितली आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना द्यायचे हे समोर आले. पुण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपी गोसावी व भाजपचे कार्यकर्ते भानुशाली, आर्यन व अरबाज यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जातानाचे व्हिडिओ मीडियात समोर आले.
यानंतर खरी चर्चा सुरू झाली. मलिक रोज काहीतरी मीडियात आरोप करीत होते. कोर्टात या आठ लोकांना जामीन मिळत नव्हता. वानखेडेंवर वैयक्तिक आरोप झाल्याने त्यांच्या कुटुंबाला प्रतिउत्तर द्यावे लागत होते. मीडिया सगळीकडे धावत होता..
यात नक्की कुणाची काय भूमिका होती..
एनसीबी
वास्तविक पाहता एनसीबीची स्थापना देशपातळीवर ड्रग रॅकेट उध्वस्त करण्यासाठी झाली. ड्रग पेडलर मार्फ़त आंतरराष्ट्रीय कट कारस्थान संपवण्याचा मुख्य उद्देश. ड्रग हे देशाच्या सीमेवरुन येते. ड्रग पुरावण्याबाबत अफगाणिस्थान प्रथम स्थानावर आहे. सीमेवर कडक नजर ठेवून तिथून ड्रग रोखणे हे एनसीबीचे प्रमुख कार्य असावे. राज्य पातळीवर प्रत्येक राज्याचा नॉरकोटिकस विभाग आहे. राज्यातील ड्रग अफू गांजा घेणारे आणि विकणारे पकडणे हे त्यांचे काम. याच कालावधीत राज्यातील याच विभागाने कोट्यवधी अंमली पदार्थ पकडले.
याचा अर्थ एकीकडे राज्याचा विभाग कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पकडत होता आणि तिकडे देशाचा विभाग काही ग्रॅम ड्रग पकडत होता. ते ही सेलिब्रेटी लोकांचे. एनसीबीच्या ह्याच भूमिकेवर संशय व्यक्त झाला. त्यातच ही संस्था केंद्राच्या अखत्यारीत. केंद्राच्या अखत्यारीतील ईडी, आयकर, एन आय,सीबीआय या संस्थांनी गेल्या दोन वर्षात कश्या संशयास्पद कारवाया केल्या ते राज्याने बघितल्या. त्यामुळे एनसीबीवर जास्त संशय. आठ पंचांपैकी एक साहिल प्रभाकर जो गोसावीचा अंगरक्षक होता त्याने नवीन माहिती समोर आणली. कोऱ्या कागदावर आपल्या साह्य घेतल्याचे सांगितले. वानखेडेंना 8 कोटी मिळणार असल्याचे सुद्धा सांगितले. त्यातील 50 लाख त्याने स्वतः गोसावीला आणून दिले व 38 लाख परत दिल्याचे सांगितले. खरं तर आता एनसीबीने वानखेडेंना बाजूला करून चौकशी समिती नेमायला पाहिजे. परंतु त्यांनी फक्त दिल्लीवरून एक समिती पाठवली आणि वानखेडेंची चौकशी केली. वानखेडेंनवर दोन वेगवेगळे महत्वाचे आरोप आहेत. एक त्यांनी खोटी धाड टाकून खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरा खोटा दाखल काढून शासनात नोकरी मिळवली. हे दोन्ही आरोप खूप गंभीर आहेत. त्यात काही पुरावे समोर आलेत. कोऱ्या कागदावर सहया घेतल्याचं व एका निर्दोष व्यक्तीला दुसऱ्या धाडीत पकडल्याचे पंचाने सांगितले आहे. हे सुद्धा खूप गंभीर आहे. समीर वानखेडेंना या तिन्ही आरोपामुळे त्वरित निलंबित करून चौकशी लावली पाहिजे. परंतु एनसीबी तसे काहीही करताना दिसत नाही..
वानखेडेंची भूमिका
वानखेडेंचे आज पर्यंत वर्तन खूप चांगले राहिले आहे. एक कडक आणि शिस्तीचा अधिकारी असे त्यांचे नाव आहे. त्यांनी कायद्यासमोर सर्व सारखे असे त्यांच्या कृतीतून दाखवले आहे. मग आताच समोर आले हे सर्व काय आहे..
मालिक सुरवातीला वानखेडेंवर आरोप करताना म्हणाले होते की वानखेडेंबरोबर त्यांचे बोलणे झाले होते आणि ते म्हणाले की यात माझे काही नाही, हे सर्व वरून करण्यात आले आहे. 11 मुलामुलींना पकडले आणि 3 जणांना सोडले. त्यात एक भाजपचा कार्यकर्त्यांचा नातेवाईक होता. वानखेडेंनी हे खोडून काढले.
क्रुजवर हजारो व्यक्ती असताना फक्त या 8 लोकांची झडती घेऊन त्यांना पकडले. मग वानखेडेंनी इतरांची झडती का घेतली नाही..? त्यात कोणीही ड्रग घेत नव्हते, की कुणाकडेही सापडणार नव्हते..? ही खात्री वानखेडेंना कशी झाली.?
वानखेडेंनी त्यांच्यावरील वैयक्तिक आरोप खोडण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. मालिकांनी दाखवलेली कागदपत्र खोटी असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी का करीत नाही.
पंच आरोपीला धरून कसे आणू शकतात..? एखाद्या पंचाने एखादी ड्रगची पुडी आरोपीच्या खिशात टाकली तर..? पंच आरोपीला एखाद्याशी फोनवर कसे बोलून देऊ शकतो..?
साहिल प्रभाकर नावाच्या एका पंचाने खंडणीच्या पैशाचा व्यवहार झाल्याचे सांगितले आहे. तो व्यवहार त्याच्या मार्फत झाल्याचा त्याने गौप्यस्फोट केलाय. ह्या गोष्टीवर काहीही प्रतिक्रिया वानखेडेंनी दिली नाही. म्हणून मग त्यांच्यावर जास्त संशय..
भाजपची भूमिका –
भाजपने आपली सत्ता नसलेल्या सर्व राज्यात केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून त्रास द्यायचा प्रयत्न केलाय. राज्यपालांची सुद्धा मदत या कामी त्यांनी घेतलीय. हे 135 कोटी जनतेने आजपर्यंत बघितले आहे. सोमय्यांना राष्ट्रवादी सेना व काँग्रेसचा भ्रष्टाचार दिसतो. भाजपचा दिसत नाही. किंवा मनसे, वंचित,एम आय एम या इतर पक्षांचा दिसत नाही. ईडी आयकर विभाग कुणावर कधी कारवाई करणार,कधी धाड घालणार हे भाजप नेते आधी जाहीर करतात..!
या घटनेत भाजपचे भानुशाली पंच कसे – भाजपच्या नेत्याच्या नातेवाईकाला सोडले कसे असे आरोप झाल्यावर भाजपने मालिकांविरुद्ध भूमिका घेतली. त्यांच्या आय टी सेल ने वानखेडे या मराठी अधिकाऱ्याला त्रास कसा दिला जातोय याच्या खोट्या गोष्टी पसरवण्याचा उद्दोग सुरू केला. खरं तर आरोप भाजपच्या राज्यातील किंवा केंद्रातील कोणत्याही नेत्यावर झाला नाही. फक्त केंद्र सरकारच्या हेतुवर शंका घेतली गेली. तरी सुद्धा भाजप सुरवातीला वानखेडेंची बाजू का घेत होते हे काही कळत नाही. अर्थात एक एक पुरावे समोर यायला लागल्यावर भाजप गप्प बसले. सोमय्या नेहमी प्रमाणे वानखेडेंच्या घरी जाऊन फोटो काढून आले. तेव्हढंच..
एका अधिकाऱ्याच्या वर्तनावर काही प्रमाणात पुरावे असताना शंका घ्यायच्या नाही का..? तो अधिकारी केंद्राच्या अधिपत्याखाली काम करतो म्हणून त्याच्यावरही शंका घ्यायची नाही का..? हा एक प्रकारचा नवीन दहशतवाद भाजप मार्फत सुरू झाला आहे. ही गोष्ट आपण अर्णब गोसावी – परमविरसिंग – कंगना यांच्या बाबत बघितली आहे. फडणवीस – चंद्रकांत पाटील – दरेकर – पडळकर – राम कदम – चित्रा वाघ इत्यादी मंडळी कशी एकदम अंगावर येऊन काहीही बोलतात.
मीडियाची भूमिका –
मीडिया या सर्व घटना आपल्याला दाखवत होती. आर्यन खान त्यांच्या साठी देवच झाला होता. नाही म्हणायला मुख्यमंत्री व काही नेत्यांचे भाषण दाखवले. परंतु या सर्व काळात 6 रुपयांची वाढ पेट्रोल मध्ये झालीय हे दाखवायला मीडिया विसरली. टी आर पीच्या नादात चॅनलला काय काय करायला लागते..?
आर्यनला जेल मधून सोडताना आर्थर रोड ते मन्नत त्याचा पाठलाग करतात.का ..? या सर्व प्रवासात आर्यनचे नख सुद्धा दिसत नाही.
समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील काजीची मुलाखत त्यांच्या कडे जाऊन घेतात. त्यांच्या सासऱ्यांची मुलाखत त्यांच्याकडे जाऊन घेतात आणि बातमी देताना असे सांगतात की आता हे पुढे आलेत..!
काही चॅनेल ठरवून वानखेडेंची तळी उचलत होते. भुजबळांना प्रश्न विचारणाऱ्या एका बातमीदाराला त्यांनी सौम्य भाषेत हटकले. तो बातमीदार मराठी अधिकाऱ्याला कसा त्रास दिला जातो असा प्रश्न विचारत होता..!
वानखेडे कुटुंब व क्रांती रेडकर
या प्रकरणात वानखेडे कुटुंबावर आरोप झाले . समीर वानखेडेंचे वडील मुस्लिम आहेत असा आरोप झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे हे मलिक सांगत होते. समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला मालिकांनी दाखवला. त्यामध्ये वडिलांचे नाव दाऊद असे लिहिले आहे आणि जातीच्या जागी मुस्लिम असे लिहिले आहे. समीर यांची आई मुस्लिम . वडिलांचे नाव ज्ञानदेव. ते जातीने महार. म्हणजे अनुसूचित जातीमध्ये गणले जातात. परंतु ज्ञानदेवांनी लग्न करताना मुस्लिम धर्म स्वीकारला असे असे दिसतंय. नावात बदल करून दाऊद हे नाव लावलं. समीर यांच्या जन्माचा दाखला जुना आहे. त्यांचा जन्म 1979 सालचा. मुंबई महानगरपालिकेचा तो दाखला आहे. त्यात दाऊद हे नाव कसे आले..? समीर यांचा धर्माचा उल्लेख मुस्लिम कसा दाखवला ?
दुसरा पुरावा समोर आला तो म्हणजे समीरच्या पहिल्या लग्नाचा फोटो आणि लग्नाचा दाखला. त्यात सुद्धा स्पष्ट लिहिलंय की समीरच्या वडिलांचे नाव दाऊद. मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे हे लग्न निकाह वाचून झाले. नवरा नवरी दोघे मुस्लिम असल्याशिवाय असे लग्न होत नाही. लग्न लावणाऱ्या काजीने व नवरीच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं की समीर वानखेडे मुस्लिम आहेत.
समीरच्या वडिलांनी त्यांच्या जातीचा दाखला दाखवला तो 07 - 08 सालचा आहे. 2008 साली समीर हे केंद्रीय परीक्षा पास होऊन नोकरीला लागले. हा दाखला ज्ञानदेवांनी जुन्या नावाने आणि त्यांच्या मूळ गावी काढण्यात आला. या वेळी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे लपवले.
हाच मुख्य आरोप आहे. त्यांनी दाखवलेला जातीचा दाखला खरा आहे आणि त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला हे ही खरं आहे. फक्त मुस्लिम धर्म आधी स्वीकारला. एकदा मुस्लिम धर्म स्वीकारल्यावर परत हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्या फायदा घेता येत नाही. तरी सरकारला फसवून तसा फायदा घेतला.
समीरच्या मुस्लिम धर्म स्वीकारल्याला अजून पुष्टी मिळते ती त्यांच्या घरातील सर्वांची नावे मुस्लिम असल्याने. समीरच्या बहिणीचे नाव यास्मिन,तिचा नवरा मुस्लिम. एव्हढंच काय तर समीर क्रांतीच्या मुलांची नावे सुद्धा मुस्लिम.. झोया व झायदा.. आता कोणत्या हिंदू लोकांच्यात मुलांची नावे अस्सल मुस्लिम नावाप्रमाणे ठेवतात..?
मुलाला वाचवण्यासाठी समीरचे वडील ,पत्नी, बहीण पुढे आले. क्रांतीने मराठी व्यक्तीला त्रास असे सांगून मराठी कार्ड बाहेर काढले. लाडाने बायको आणि तिचे नातेवाईक मला दाऊद म्हणत असा हास्यास्पद दावा वडिलांनी केला. मात्र कागदपत्रांवर दाऊद नाव कसे आले हे काही सांगितले नाही. किंवा पहिल्या पत्नीचे वडील व लग्न लावलेला काजी खोटं बोलतात असा दावा केला नाही…
कोर्टाची भूमिका
आर्यन खानकडे ड्रग मिळाले नाही,तो घेताना सापडला नाही, फक्त त्याच्या मोबाईल मध्ये व्हाट्सएपच्या चॅट मधून कळले की तो ड्रग घेत होता. तो व अनन्या पांडेच्या चॅट मधून सुद्धा ही माहिती समोर आली. त्यावरून त्याच्यावर गंभीर कलम लावण्यात आले. मोठं कट कारस्थान कळेल, आर्यन फरार होईल, पुरावे नष्ट करेल इत्यादी युक्तिवाद एनसीबी कडून जामिनीला विरोध करताना केला गेला. त्यामुळे आर्यनाला 28 दिवस तुरुंगात राहायला लागले.
ही गोष्ट कोर्टाला कळली नाही का..? फक्त व्हाट्स चॅट वरून इतके दिवस एखाद्याला जामीन मिळत नाही..? बरं काही दिवस चौकशी केल्यावर काहीच निष्पन्न झाले नाही तरी कोर्ट जामीन का नाकारते..? अनेक प्रश्न उपस्थित होतात..!
फक्त व्हाट्सएपच्या चॅट वरून गुन्हेगार आहे हे कसे सिद्ध होईल.. उद्या एखाद्या पोलिसाने व्हाट्सएपच्या चॅट वरून बलात्काराचा आरोप नाही लावला म्हणजे मिळवली…
राज्य शासनाची भूमिक
मलिक हे राज्य शासनात आहेत. मंत्री आहेत.त्यांनी जाहीर सभेत आव्हानात्मक भाषण करू नये. किंवा ट्विटर वरून पोटो टाकून पहचान कोण ..? असा बालिश प्रकार करू नये. जे पुरावे असतील ते पोलिसात देऊन तक्रार करावी.
राज्य शासनाने सुध्दा त्वरित कारवाई करावी. समीर यांचे मुस्लिम असणे हे खरे आहे का ..
त्यांनी तसे जात सर्टिफिकेट देणाऱ्या संस्थेपासून लपवले का..
प्रभाकर साहिल सांगतोय तसा पैश्याचा व्यवहार झाला का..
समीरला पैसे मिळणार होते का..
समीर यांच्या कडे किती संपत्ती आहे आणि ती कशी मिळवली..
कांबळे नावाचा पंच सांगतो त्या प्रमाणे निर्दोष व्यक्ती पकडला का..
कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या का..
राज्य शासनाचा ढिला कारभार बघितल्यावर ते फारशी कारवाई करतील असे वाटत नाही.
समीर यांनी कोर्टात आपला तपास सीबीआयने करावा अशी विनंती केली. म्हणजे राज्य शासनावर शंका घेतलीय.
ही गोष्ट महाविकास आघाडीने गंभीरपणे घेतली पाहिजे.
जनता
नेहमी प्रमाणे व्हाट्स आणि फेसबुकवर चर्चा करतील. काही मलिक,राज्य शासनाच्या नावाने तर काही वानखेडे, भाजपच्या नावाने खडे फोडतील. विनोद तयार करतील. काही काळाने विसरून जातील. याचा शेवट तर व्हायला पाहिजे. कुणाची तरी बाजू योग्य असेल आणि कुणाची तरी अयोग्य. अयोग्याला शिक्षा झाली पाहिजे. मग आर्यन असो,साहिल असो, गोसावी असो की वानखेडे.. योग्य व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे..! नाहीतर तरुणांना नशा – माध्यमं व अधिकाऱ्यांना पैसा आणि जनतेला धोका मिळेल..!
नेहमी प्रमाणे..!
हेमंत पाटील