अदानी यांचा थक्क करणारा प्रवास... चिंतायुक्त भीती निर्माण करणारा...!

Update: 2024-04-12 05:21 GMT

गौतम शांतीलाल अदानी (जन्म २४ जून १९६२) हे भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. ते भारतातील बंदर विकासात गुंतलेल्या अहमदाबाद येथील बहुराष्ट्रीय अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. ३ मार्च, २०२२ मध्ये ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. अवघ्या दहा वर्षात त्यांनी $ ९२.९ अब्ज (डॉलर) म्हणजे रु.७,००,००० कोटी पेक्षा अधिक संपत्तीसह मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. असा गौतम भाईंचा परिचय समाजमाध्यमातून केला जातोय. अदानी नेमके कसे पुढे आले आणि त्यांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना कसे सहकार्य केले आणि मोदींनी पंतप्रधान झाल्यावर त्यांना कसे जगभर आपल्यासोबत नेऊन अदानी उद्योगाचा पाया जगभरात वाढवला याच्या अनेक सुरस कथा किंवा सत्य कथा सांगितल्या जातायत . अदानी उद्योजक म्हणून कसे वाढले हे जगजाहीर असले तरी ते सर्वच क्षेत्रात हातपाय पसरतायत . त्यांच्या अवघ्या 27 वर्षातील यशाचा हा थक्क करणारा प्रवास डोळ्याखालून घातल्यावर त्यांच्या यशामागे सारथी कोण हे सहज लक्षात येते. पण अदानी इतके कर्जबाजारी आहेत की ते जर झोला उठाके चले जाणाऱ्यांसोबत निघून गेले तर अर्थव्यवस्थेचे काय होईल ?

७ मार्च २०२२ पर्यंत फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत अदानी १० व्या स्थानावर आले . त्यांनी १९८८ मध्ये अदानी समूहाची स्थापना केली आणि विविध व्यवसाय करत एक एक क्षेत्र पादाक्रांत केले. ज्यात लॉजिस्टिक, ऊर्जा, कृषी, संरक्षण आणि एरोस्पेस सारख्या विविध क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करत अदानी पोर्ट्स सेझमध्ये त्यांचा ७४% हिस्सा आहे, अदानी एंटरप्रायझेसमध्ये ७५% हिस्सा आहे आणि अदानी पॉवरमध्ये ७४% हिस्सा आहे. एवढे साम्राज्य त्यांनी केवळ एका गुजरात राज्याच्या बळावर उभे केले. त्याची सत्यकथा अशी सांगितली जाते की नरेंद्र मोदी यांनी 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून गुंतवणूक दारांना गुजरातमध्ये आमंत्रित केले मात्र जिथे काही महिन्यांपूर्वी दंगली झाल्या तिथे त्या राज्यात गुंतवणूक करण्यास कोणी पुढे येईना त्यावेळी गौतम अदानी पुढे आले आणि त्यांनी दंगली झालेल्या गुजरात राज्यातील विविध भागात गुंतवणूक करण्यासाठी विविध गुंतवणूक दारांना तयार केले. गौतम अदानी जेव्हा एखाद्या विषयात चर्चेला येतात तेव्हा ते तो गेम आपल्याबाजुनेच फिरवतात अशी त्यांची ख्याती आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना त्या काळात गौतम अदानीचा खूप मोठा आधार वाटला आणि त्यांनी त्यांच्यासाठी सगळे राज्य सहज उपलब्ध करून दिले. अदानी यांना मुंद्रा बंदर कंत्राटावर मिळाले. मागोमाग गुजरातचे ऊर्जा क्षेत्रही त्यांच्या ताब्यात आले आणि मग गौतम अदानी जणू मोदींच्या गळ्यातील ताईतच झाले. खाणी वर खाणी त्यांनी पादाक्रांत केल्या आणि देशभर आपले उदयोग उभारले.

अदानी यांचा थक्क करणारा उद्योगप्रवास

अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे शांतीलाल आणि शांती अदानी या जैन कुटुंबात झाला. त्यांना ७ भावंडे आहेत. गौतम अदानी यांचे आई-वडील गुजरातच्या उत्तरेकडील थाराड शहरातून स्थलांतरित झाले होते. वडील छोटे कापड व्यापारी होते. अहमदाबाद येथील शेठ चिमणलाल नगिनदास विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. गुजरात विद्यापीठात गौतम अदानी यांनी वाणिज्य शाखेतील पदवीसाठी प्रवेश घेतला, परंतु दुसऱ्या वर्षानंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि ते बाहेर पडले. किशोरवयात, अदानी महेंद्र ब्रदर्ससाठी डायमंड सॉर्टर म्हणून काम करण्यासाठी १९७८ मध्ये मुंबईत आले. १९८५ मध्ये त्यांनी लघुउद्योगांसाठी प्राथमिक पॉलिमर आयात करण्यास सुरुवात केली. १९८८ मध्ये, अदानी यांनी अदानी एक्सपोर्ट्सची स्थापना केली, जी आता अदानी एंटरप्रायझेस म्हणून ओळखली जाते. ही कंपनी कृषी आणि उर्जा वस्तूंचे व्यवहार करते. १९९१ मध्ये, आर्थिक उदारीकरणाची धोरणे त्यांच्या कंपनीसाठी अनुकूल ठरली आणि त्यांनी धातू, कापड आणि कृषी उत्पादनांच्या व्यापारात व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली.

मोदींही याच काळात गुजरात मध्ये होते

सप्टेंबर 1950 मध्ये उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा गावात श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला आणि त्यांनी 1967 मध्ये गुजरातमधील पूरग्रस्तांची सेवा केली. उत्कृष्ट संघटनात्मक क्षमता असल्यामुळे मोदींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये काम केले आणि गुजरातमधील विविध सामाजिक-राजकीय चळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावली. मोदींनी 1987 मध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये प्रवेश केल. 1995 मध्ये गुजरातमध्ये पक्षाला बहुमत मिळाले आणि मोदी झपाट्याने वर आले. एका वर्षातच त्यांची गुजरात युनिटच्या सरचिटणीसपदी उन्नती झाली. 1988 ते 1995 दरम्यान , नरेंद्र मोदी हे एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळखले जात होते ज्यांनी गुजरात भाजपला राज्याचा सत्ताधारी पक्ष बनवण्यासाठी आवश्यक पाया यशस्वीपणे मिळवला होता. पक्षाला राजकीय फायदा मिळू लागला आणि एप्रिल 1990 मध्ये केंद्रात युतीचे सरकार स्थापन केले. ही भागीदारी काही महिन्यांतच तुटली, परंतु 1995 मध्ये गुजरातमध्ये भाजप स्वबळावर दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर आला. तेव्हापासून, गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. 1995 मध्ये , त्यांची पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना भारतातील पाच प्रमुख राज्यांचा कार्यभार देण्यात आला . मात्र त्यांचे सर्वाधिक लक्ष गुजरातकडेच होते . 1998 मध्ये, त्यांना सरचिटणीस (संघटना) म्हणून बढती देण्यात आली, ते ऑक्टोबर 2001 पर्यंत ते पदावर होते, त्यानंतर त्यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

अदानीना एकामागोमाग एक कंत्राटे मिळत गेली

१९९४ मध्ये, गुजरात सरकारने मुंद्रा बंदराच्या व्यवस्थापकीय आउटसोर्सिंगची घोषणा केली आणि १९९५ मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आल्यावर अदानीना ते कंत्राट मिळाले. त्यात मोदीं दिल्लीत महत्वाच्या भाजप सरचिटणीस पदावर कार्यरत होते आणि केंद्रातही भाजपची सत्ता थोड्या कालावधीसाठी आली होती. अदानी यांनी १९९५ मध्ये पहिली जेटी उभारली. मुंद्रा बंदर आणि विशेष आर्थिक क्षेत्राद्वारे संचालित, ऑपरेशन्स अदानी पोर्ट्स आणि SEZ मध्ये हस्तांतरित करण्यात आल्या. मुंद्रा बंदर हे भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठे बंदर झाले, ज्याची दरवर्षी सुमारे २१० दशलक्ष टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे. १९९६ मध्ये, अदानी समूहाची उर्जा व्यवसाय शाखा, अदानी पॉवर, अदानी यांनी स्थापन केली. अदानी पॉवरकडे ४६२०MW क्षमतेचे औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत, जे देशातील सर्वात मोठे खाजगी औष्णिक वीज उत्पादक आहे. २००६ मध्ये अदानी यांनी वीज निर्मिती व्यवसायात प्रवेश केला. २००९ ते २०१२ पर्यंत, त्यांनी ऑस्ट्रेलियातील अॅबॉट पॉइंट पोर्ट आणि क्वीन्सलँडमधील कार्माइकल कोळसा खाण विकत घेतली. मे २०२० मध्ये, अदानी समूहाने US$६ अब्ज किमतीची जगातील सर्वात मोठी सौर बोली जिंकली. ८०००MW पॉवर प्लांट प्रकल्प अदानी ग्रीन द्वारे हाती घेतला. सप्टेंबर २०२० मध्ये, अदानी यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ७४% हिस्सा विकत घेतला, जो दिल्लीनंतर भारतातील दुसरा सर्वात व्यस्त विमानतळ आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये, ते मुकेश अंबानींना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

अदानी फाऊंडेशन द्वारे देशभर कार्य आणि कार्यालये

अदानी यांनी आपल्या कंपन्या आणि उद्योग वाढवण्यासोबतच अदानी फाउंडेशन नावाने सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि त्या निमित्ताने अदानी समूहामार्फत मोठ्या प्रमाणात निधी दिला. १९९६ मध्ये या अदानी फाउंडेश्नाची स्थापना झाली. गुजरात व्यतिरिक्त, फाऊंडेशन महाराष्ट्र, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये कार्यरत आहे. मार्च २०२० मध्ये याच अदानी फाउंडेशनने १०० कोटी (US$२२.२ दशलक्ष) कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी, पीएम केअर्स फंडला दिले होते. गुजरात सीएम रिलीफ फंडात ५ कोटी (US$१.११ दशलक्ष) आणि महाराष्ट्र CM रिलीफ फंडात १ कोटी (US$२,२२,०००)चे योगदान देण्यात आले. अदानी समूहाने सौदी अरेबियातील दमाम ते गुजरातमधील मुंद्रा येथे ८० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेल्या चार ISOक्रायोजेनिक टाक्या आयात केल्या. समूहाने लिंडे सौदी अरेबियाकडून ५००० वैद्यकीय दर्जाचे ऑक्सिजन सिलिंडर देखील मिळवले. अदानी समूह गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात जिथे जिथे गरज असेल तिथे दररोज वैद्यकीय ऑक्सिजनसह १५०० सिलिंडर पुरवठा करत होती.

जगभरात उद्योग 1995 ते 2022 अवघ्या 27 वर्षात !

अदानी यांनी अवघ्या 27 वर्षात जगभर व्यवसाय वाढवला . त्यांचे टप्पे पाहिले तर आश्चर्य वाटतं. 1995 : भारत औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणासाठी वेग वाढत असल्याने चांगल्या विकसित पोर्ट्सची मागणी झाली. ही आवश्यकता लक्षात घेऊन अदानी ग्रुपने पोर्ट डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये प्रवेश केला. मुंद्रा पोर्ट प्रकल्प अदानी ग्रुपची ओळख टिकवणारा भारताचा सर्वात मोठा खासगी पोर्ट बनला. 1996 : मुंद्रा पोर्ट प्रकल्प हा कंपनीसाठी महत्त्वपूर्ण माईलस्टोन होता आणि भारतातील खासगी पोर्ट विकासाचा नवीन युग म्हणून ओळखला गेला . 1998 : अदानी ग्रुपने या वर्षी अदानी पॉवर लिमिटेड स्थापित केले, कंपनीने भारताच्या वीज क्षेत्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली, 2001 : अदानी ग्रुपने कृषी व्यवसाय क्षेत्रात विस्तार करण्याचा निर्णय घेतला, अदानी विलमार लिमिटेड स्थापित केली. कृषी व्यवसाय क्षेत्राची मागणी आणि वाढीची क्षमता यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेतला. अदानी विलमारची स्थापना अदानी ग्रुपला खाद्य तेल व्यवसायात प्रवेश देऊन गेली. 2002 : अदानी एंटरप्राईजेस, अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी, सार्वजनिकरित्या व्यापार केलेली कंपनी बनली, ज्यामुळे त्यांच्या प्रवासात महत्त्वपूर्ण टप्प्याची निर्मिती झाली.. 2006 : मुंद्रा विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) यशस्वीरित्या बांधण्याद्वारे आणि अंमलबजावणी करून, अदानी ग्रुपने गुजरातच्या पायाभूत सुविधा विकास आणि औद्योगिक विकासासाठी आपले योगदान द्यायला सुरुवात केली . 2008 : अदानी पोर्ट्स आणि सेझ लिमिटेड (APSEZ) ची स्थापना ही अदानी ग्रुपच्या कालावधीमध्ये आणखी एक प्रमुख कामगिरी ठरली. 2009 : अदानी ग्रुपच्या क्षमता आणि शक्तीविषयी प्रदर्शित करणारी एक उल्लेखनीय कामगिरी, अदानी पॉवर भारतातील सर्वात मोठी खासगी थर्मल पॉवर उत्पादक झाली . 2011 : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नूतनीकरणीय ऊर्जावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करत अदानी ग्रुपने अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड स्थापित केली . यामुळे ग्रुपने नूतनीकरणीय ऊर्जा बाजारपेठेत प्रवेश केला. 2013 : शाश्वत वीज क्षेत्रात आपली क्षमता प्रदर्शित करून, अदानीने गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठ्या एकल-क्षेत्रातील सूर्यप्रकाश-आधारित वीज प्रकल्पावर कार्य करण्यास सुरुवात केली. 2015 : अदानी ग्रुपने ओडिशामध्ये धमरा पोर्ट प्राप्त करून आपल्या पोर्ट ऑपरेशन्सचा विस्तार केला. 2017 : अदानी ग्रुप अदानी ट्रान्समिशनसह भारतातील सर्वात मोठी खासगी वीज प्रसारण कंपनी बनली. 2018 : अदानी समूहाचा सौर उत्पादन कक्ष भारतातील सौर पॅनेल्स आणि सौर सेल्सचा सर्वात मोठा उत्पादक बनला. 2019 : अदानी ग्रुपने परदेशात प्रवेश केला, ऑस्ट्रेलियाच्या कार्मिकेल कोल माईन आणि रेल प्रकल्पात गुंतवणूक केली. यामुळे ग्रुपची पहिली महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय गुंतवणूक झाली. भारताबाहेर मोठ्या प्रमाणात, जटिल प्रकल्प हाती घेण्याच्या अदानी ग्रुपच्या क्षमतेबद्दलही या प्रकल्पाने ठसा उमटवला. 2020 : अदानी ग्रुप मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये $100 अब्ज गुंतवणूक करणारी तिसरी भारतीय कंपनी बनली. 2021 : पर्यावरण अनुकूल शक्तीसमोर दायित्वानंतर, अदानी समूहाने तमिळनाडू, भारतातील जगातील सर्वात विशाल सन-ओरिएंटेड पॉवर प्लांटची निर्मिती केली. 2022 : अदानी समूहाने भारताच्या आर्थिक वाढीस महत्त्वपूर्ण हातभार लावला आणि अदानी ग्रुपला अष्टपैलू आणि गतिशील समूह म्हणून स्थापित केले.

अदानी यांच्यावर कर्ज किती आणि भारतातील कोणत्या बँकांचे ?

जागतिक ब्रोकरेज फर्म सीएसएलआर (CSLR) नुसार, अदानी समूहावर एकूण 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जामध्ये भारतीय बँकांचा वाटा 40 टक्क्यांहून कमी म्हणजेच 80 हजार कोटी इतका आहे. यामध्ये खाजगी बँकांकडून घेतलेल्या कर्जाची टक्केवारी 10 टक्यांपेक्षा कमी आहे. झेफेरीन या जागतिक कंपनीच्या म्हणण्यानुसार, बँकांनी अदानी समूहाला दिलेले कर्ज विहित मर्यादेत आहे. विशेष म्हणजे अदानी समूहावरील कर्जाची रक्कम अवघ्या तीन वर्षांत दुप्पट झाली आहे. अदानी समूहाच्या दोन कंपन्या, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स व स्पेशल इकॉनॉमिक झोनचे मार्चमध्ये सुमारे 50 अब्ज रुपये किंवा 605 दशलक्ष डॉलर किमतीचे व्यावसायिक पेपर मॅच्युअर होणार होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी समूह त्यांना आगाऊ पैसे देण्यास बांधील होता. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाने कर्ज घेण्यासाठी सर्व कर्ज पर्यायांचा (व्यावसायिक कागद, रोखे, अल्प-मुदतीचे बाँड आणि स्टॉक्सवरील कर्ज) वापर केला. या मुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. अदानी समूह कमर्शिअल पेपरच्या कर्जाची परतफेड करण्याची योजना बनवत आहे जे त्वरित पूर्ण केले जाईल. या सोबतच कंपनीने म्हटले आहे की, ती प्रायव्हेट प्लेसमेंट, प्रायव्हेट इक्विटी किंवा इतर माध्यमातून भांडवल उभारून बाँडची परतफेड करेल. विशेष म्हणजे, जून 2024 च्या शेवटी अदानी ग्रीन एनर्जीचा एक बाँड येणार आहे. बाजाराचा मूड मुख्यत्वे या बाँडवर तसेच कंपनीच्या पतपात्रतेवर अवलंबून असेल. म्हणजे त्यातही भारतातीलच गुंतवणूकदार गुंतवणूक करणार आहेत. निर्धारित कालावधीपूर्वी शेअर्सच्या बदल्यात कर्ज परत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले. त्यामुळेच अदानी समूहाच्या वतीने अल्पमुदतीच्या कमर्शियल पेपर लोनसाठी खासगी फायनान्सरशी चर्चा सुरू आहे. कुठूनतरी काही संसाधनांची व्यवस्था केली तर अदानी समूह आपले कर्ज फेडू शकेल, असे त्यांना सांगितले जात आहे. अदानी समूह प्रमुख बँकांना बोलतो आहे की तुम्ही सर्व बाँडधारकांशी बोला आणि त्यांना पटवून द्या की अदानी समूहाकडे पैसे/संसाधने आहेत, ज्याद्वारे ते पैसे परत करतील. विशेष म्हणजे, अदानी समूह आपल्या खाजगी क्रेडिट आणि कॅशफ्लोद्वारे कर्जाची त्वरित परतफेड करण्याचा प्रयत्न करेल. अदानी एंटरप्रायझेसने नवीन रस्ते प्रकल्पांवरील भांडवली खर्च गोठवला आहे. उदाहरणार्थ, अदानी समूहाने डीबी पॉवर करार रद्द केला. अदानी समूह सध्या कोणत्याही नवीन प्रकल्पात गुंतवणूक करणार नाही. याशिवाय सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमधील भांडवली खर्चही कमी केला जाईल. उत्तर प्रदेशातील मेरठ-प्रयागराजमधील 464 किमीचा गंगा एक्सप्रेसवे प्रकल्प मात्र थांबवला जाणार नसून तो पूर्ण केला जाईल, असे समूहाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

धारावी प्रकल्प अदानी पूर्ण कसा करणार ?

गौतम अदानी यांच्या मालकीच्या समूहाने 2022 च्या उत्तरार्धात धारावीच्या पुनर्विकासासाठी सरकारी करार जिंकला आणि मार्चमध्ये सुमारे 600 एकर दाट परिसराचे सर्वेक्षण सुरू करेल. महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये 259 हेक्टरचा धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाच्या एका फर्मला औपचारिकपणे बहाल केला. अदानी समूह या भागाचा पुनर्विकास करण्याच्या सरकारी कराराचा भाग म्हणून धारावीचे मॅपिंग सुरू करेल. पुढील सात वर्षांत $3 अब्जचा प्रकल्प पूर्ण करण्याची समूहाची योजना आहे. 5 हजार 69 कोटी रुपयांची बोली लावून अदानी समुहाने हा प्रकल्प मिळवला. पण तो पूर्ण करण्यासाठी अदानी कडे पैसे आहेत का? आधीच कर्जबाजारी असलेल्या अदानी समूहाचे कर्ज २०१९ पासून सातत्याने वाढत आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात अदानीच्या कर्जात सुमारे २१ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात अदानी समूहाच्या कर्जात मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात अदानीच्या कर्जात सुमारे २१ टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी जागतिक बँकांचे या कर्जातील प्रमाण एक तृतीयांश इतके वाढले आहे. मार्चअखेर अदानी समूहाच्या कर्जांपैकी २९ टक्के कर्जे हे जागतिक बँकांकडून होते. अदानी समूहाच्या ७ सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्च २०२३ पर्यंत २०.७ टक्क्यांनी वाढून २.३ लाख कोटी रुपये (२८ अब्ज डॉलर) झाले आहे. अदानी समूहाच्या कर्जामध्ये बाँड्सचा वाटा ३९ टक्के आहे. २०१६ मध्ये तो १४ टक्के होता. त्याच वेळी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने अदानी समूहाला सुमारे २७० अब्ज रुपये (३.३ अब्ज डॉलर) कर्ज दिले आहे. एसबीआयच्या अध्यक्षांनी फेब्रुवारीमध्ये ही माहिती दिली होती. गौतम अदानींचा हा समूह खूप वेगाने विस्तारला. ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमधील व्यावसायिक हितसंबंधांसह ते जागतिक स्तरावरही आपली पोहोच वाढवत आहे. पण जेव्हा कोणी खूप वेगाने प्रगती करतो तेव्हा शंका मनात डोकावू लागतात. छाननी वाढते. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला याचा सामना करावा लागला. मात्र, अदानी समूहाने हे आरोप साफ फेटाळून लावले. पण गुंतवणूकदारांचा विश्वास कुठे बसणार होता. काही दिवसांतच अदानींच्या कंपन्यांचे १०० अब्ज डॉलर्स बुडाले. अदानी यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेअर्सच्या तारणावर घेतलेल्या कर्जाची मुदतीआधीच परतफेड केली. तरीही, समूहाचे शेअर्स आणि डॉलर बाँड्स अद्याप सावरले नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अदानी यांचे भारतातील भवितव्य कसे असेल याबाबत चिंतायुक्त भीती निर्माण होते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

@ अॅड. हर्षल प्रधान

( लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत .)

Tags:    

Similar News