कोविडकाळातील केदार – भाग ४
A Travelogue on Exploring the Magic of Kedarnath
सोमवार, तारीख २१ सप्टेंबर २०२०. माझ्या कोविड काळातील केदारनाथ यात्रेचा तिसरा आणि सर्वात महत्वाचा दिवस. 'ज्याच साठी केला होता अट्टाहास' त्या केदारनाथाचे दर्शन आज होणार होते. तथापि त्यासाठी अजूनही सोनप्रयाग ते गौरीकुंड हा पाच किलोमीटर आणि गौरीकुंड ते केदारनाथ हा साडे सोळा किलोमीटर अंतराचा प्रवास पार पाडायचा होता.
पहाटे पाच वाजता मोबाईल मध्ये लावलेला गजर वाजला. खरं तर त्या आधीच अर्धा तास मला जाग आलेली होती. केदारनाथ दर्शनाची उत्सुकता तर होतीच. शिवाय हेल्मेटचे काय? हा प्रश्न देखील डोक्यात घोळत होता. हॉटेलखाली गजबज आणि लगबग सुरू झाली होती. रात्री उशीरा आलेले लोक त्यांचा रजिस्ट्रेशनचा सोपस्कार आटोपण्यासाठी लायनीत उभे होते.
खेचरवाले आपली खेचरे गौरीकुंडच्या दिशेने हाकवत नेत होते. त्यांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांचे आवाज पहाटेच्या वेळेस कानांना सुखावत होते. पलंगावरून उतरून आन्हिके उरकण्यासाठी बाथरूम कडे जातानाच आपले खांदे, मांड्या आदी अवयव दुखत असल्याचे लक्षात आले. कंबर देखील धरली होती. हा सगळा कालच्या त्या शेवटच्या तीस किलोमीटर रस्त्याचा प्रताप होता. अर्थात काहीही झाले तरी केदारनाथाला जायचे होतेच. गिझर लावला आणि चांगल्यापैकी गरम झालेल्या पाण्याचे चार पाच तांबे कंबरेवर ओतले. खांदे आणि मांड्यांना देखील चांगला शेक दिला. तेवढ्याने थोडं बरं वाटलं. दार उघडून बाहेरचा कानोसा घेतला. वातावरणात फारशी थंडी नव्हती म्हणून सिक्स पॉकेट्स वाली बर्म्युडा घालून वर टी शर्ट चढवला आणि त्यावर जॅकेट घातले.
जसजसे तुम्ही चालायला लागता तसतशी अंगात उष्णता वाढून नंतर चक्क गरम व्हायला लागते. सोबतच्या छोट्या सॅक मध्ये एक टी शर्ट, टॉवेल, track pant, रुमाल, पाण्याची छोटी बाटली, क्रोसिन, टोपी, कानटोपी, गॉगल असे फक्त एका दिवसासाठी आवश्यक तेवढे सामान भरले. बाकीच्या सामानाने भरलेली दुसरी सॅक मी हॉटेलच्या क्लोक रूम मध्ये ठेवणार होतो. पायात शूज चढवून खोलीबाहेर पडलो तेव्हा पावणेसहा वाजले होते.
अंग चांगलेच दुखत होते. खाली जाण्यासाठी जिना उतरताना चालायलाही त्रास होत होता. तब्बल साडेसोळा किलोमीटरची चढण बाकी होती. डोक्यात हेल्मेटची काळजी होतीच. पार्किंग लॉट मधून हॉटेलात येताना हेल्मेट आणल्याचे पक्के आठवत होते. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून पुन्हा समोरच असलेल्या पार्किंग लॉट मध्ये गेलो. तिथे पैसे गोळा करणाऱ्या माणसाला काल इथे एक हेल्मेट मिळाले का म्हणून चौकशी केली तर त्याने सांगितले की, एक काळे हेल्मेट काल दुपारी मिळाले होते. आम्ही ते उचलून ऑफिस मध्ये ठेवले होते. कोणीही ते न्यायला आले नाही. रात्री अकरा वाजता एका बाईकस्वाराच्या हेल्मेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याने विनंती केल्याने आम्ही त्याला ते देऊन टाकले. माझा चेहेरा खर्रकन उतरला.
काय बोलायचे यांना? बोलण्यात अर्थच नव्हता. आपण हेल्मेट विसरलो आणि त्यात आपल्या स्मरणशक्तीवर फाजील विश्वास ठेवून काल रात्रीपर्यंत यांना विचारायला आलो नाही ही आपली चूक. 'ठीक है' म्हणून जायला वळलो. तेवढ्यात त्या माणसाने पुन्हा हाक मारली. मागे वळून पाहिले तर त्याच्या चेहेऱ्यावर मिश्कील हास्य होते. म्हणाला,
'साब, आपका हेल्मेट हमारे पास सुरक्षित है. हमने कल शामको ही उसे उठाके ऑफीसमे रख दिया था. आपने उसे बाईक पर ही रख्खा था. यहां उत्तराखंड मे आपकी वस्तू अगर गुम हो जाय तो वो कही नही जाती'
त्याने त्याच्या माणसाला हेल्मेट आणायला पिटाळले. माझा जीव भांड्यात पडला. मनावरचा ताण अचानक पूर्णपणे हलका झाला. मी त्या माणसाचे दहा वेळा तरी आभार मानले आणि विजयी मुद्रेने हेल्मेट घेऊन हॉटेलवर परतलो. तिथल्या क्लोक रूम मध्ये एक सॅक आणि हेल्मेट ठेवले.
एव्हाना माझ्या मांड्या आणि खांदे चांगलेच दुखत होते. चालताना त्रास होत होता. काल भेटलेला हॉटेल मालक हॉटेलखाली भेटला. त्याने माझी अवस्था बघून मला सरळ घोडा (खेचर) करून केदारनाथला जाण्याचा सल्ला दिला. मी जरा टाळंटाळ करत होतो. पण त्याचे म्हणणे पडले, 'देखो साब केदारनाथजी के ठीक से दर्शन करना ज्यादा जरूरी है. आप कैसे उसके दरबार तक पहुंचते हो ये चीज कोई मायने नही रखती.
मला त्याचा फंडा पटला. लगेच एका घोडेवाल्याशी भावाची घासाघीस करून फक्त वर जाण्यासाठी अठराशे रुपयाला सौदा पटवला. तिथला सरकारी दर पंचवीसशे रुपये आहे. परंतू सध्या या कोविडकाळात अजिबात धंदा नसल्याने कमी भावात घोडेवाले तयार होतात. सोनप्रयाग वरून पाच किलोमीटर वरच्या गौरीकुंडला जाण्यासाठी टॅक्सीजची रांग लागलेली असते. माणशी चाळीस चाळीस रुपये या दराने ते नेतात. एका टॅक्सीत आठ नऊ माणसे कोंबून Social Distancing ला रीतसर घोडे लावले जातात. दहा मिनिटांत गौरीकुंडला पोहोचलो. घोडेवाला दुसऱ्या टॅक्सीने मागून आला.
टॅक्सीमधून उतरून पंधरा वीस मिनिटे गौरीकुंडच्या बाजारातून घोडा (खेचर) तळाकडे जावे लागते. तेथून आपली घोडेस्वारी सुरू होते. माझ्या घोडेवाल्याकडे माझ्यासकट तीन गिऱ्हाईके होती. म्हणजे तो एकटा तीन घोड्यांना सांभाळणार होता. माझ्या घोड्याचे नाव होते 'मच्छर'. स्वाराला त्रास होवू नये म्हणून मच्छराच्या खोगीरावर जाड घोंगडे टाकलेले होते. बाईकवर बसण्याचा सराव असल्याने मला घोड्यावर बसण्याचा त्रास होणार नाही असा माझा अंदाज होता. जो पुढे खरा ठरला.
घोडेवाल्याने इशारा केल्यावर मी रिकिबीत पाय अडकवून बाईक प्रमाणे घोड्यावर टांग टाकून चढलो. एकदम इतिहासात शिरल्यासारखे वाटले. काही क्षण मी स्वत:ला पाठीला ढाल आणि कंबरेला तलवार बांधून 'हर हर महादेव' म्हणत शत्रूवर तुटून पडणाऱ्या मावळ्याच्या जागी पाहिले. तेवढ्यात कंबर दुखत असल्याचे लक्षात आल्याने मी त्वरेने मावळ्याच्या भूमिकेतून वर्तमानात आलो आणि पाठीवरच्या सॅक मधून क्रोसिन काढून गिळली. एव्हाना घोडेवाल्याने दिल्लीहून आलेल्या त्याच्या दोन गिऱ्हाईकांना दोन घोड्यांवर बसविले आणि बरोब्बर सात वाजता 'बम भोले'ची गर्जना करून आम्ही कूच करण्यास सुरुवात केली.
इतका वेळ घोड्यावर बसण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. आपण सिनेमात बघतो तशी 'चल धन्नो' वाली घोडेस्वारी इथे होत नाही. हे घोडे मंद चालीने चालत राहतात. ते या रस्त्यावरून रोजच्या रोज वरखाली करून इतके तयार झालेले आहेत की खरं तर त्यांना घोडेवाल्याने सोबत येण्याची गरजच नाही. ते एकटे सुद्धा स्वाराला केदारनाथ पर्यंत नेऊ शकतात. आमचे तीन घोडे एकामागून एक लायनीत चालले होते.
गंमत म्हणजे त्यांच्यातही एकमेकावर कुरघोडी करण्याची इर्षा असते. एक नंबरला चाललेला घोडा मागच्या घोड्यांना अजिबात पुढे जाऊ देत नाही. घोड्यावरचा प्रवास मला तरी अजिबात त्रासदायक वाटला नाही. दगडांनी बांधलेल्या ओबडधोबड रस्त्यावरून घोडा संथ गतीने एका लयीत चढ चढत होता. एका बाजूला गर्द झाडी असलेला डोंगर आणि दुसरीकडे दरीतून खळाळत वाहणारी मंदाकिनी नदी हे दृश्य आता पुढचे किमान दहा किलोमीटर तसेच राहणार होते.
दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरे आपल्याला खुणावत आमंत्रण देतात. एखादं किलोमीटर गेल्यावर वाटेवरच कोसळणारा धबधबा लागला. त्याखाली भिजून पुढे गेलो. साधारण दर एका किलोमीटर अंतरावर विश्रांतीसाठी बाके ठेवलेली आहेत. पाण्यासाठी जागोजागी व्यवस्था आहे. Rain Shelters बांधलेली आहेत. चार पाच ठिकाणी चहा, कॉफी, लिंबू पाणी, पराठा, मॅगी, चाऊमीन वगैरे मिळण्याची उत्तम सोय आहे.
घोडे गौरीकुंडहून चढ चढायला सुरुवात करतात. ते सरळ सहा किमी वरच्या भीमबली या जागेपर्यंत जातात. इथे येईपर्यंत साधारण दीड तास लागतो. भीमबली येथे घोड्यांना गूळ चण्याचा तोबरा दिला जातो. आम्ही देखील येथे पराठा खाल्ला. संपूर्ण उत्तर भारतातील पराठा चांगला जाडजूड असतो. एक खाल्ला तरी पोट भरते. घोड्याबरोबर चालणाऱ्या घोडेवाल्यांनी देखील येथे खाऊन घेतले. रोज सकाळी साडेसोळा किमी चढून संध्याकाळी पुन्हा तेवढेच अंतर कापून खाली येणाऱ्या या घोडेवाल्यांच्या शारीरिक कणखरपणाचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही.
आमच्या घोडेवाल्याचे नाव 'धर्मेंद्र' होते. दिसायलाही तो सिनेमातल्या धर्मेंद्र सारखा गोरापान आणि देखणा होता. फक्त उंचीला थोडा कमी. एखाद्या 'नंदा'ला त्याच्या हाती लगाम असलेल्या घोड्यावरून जाताना 'एक था गुल और एक थी बुलबुल' गाणे आठवले असेल तर अजिबात नवल वाटायचे कारण नाही. माणूस प्रेमात पडले की शशी कपूरच्या जागी घोडेवाला धर्मेंद्र दिसायला कितीसा वेळ लागतो?
भीमबलीहून पुढे गेल्यावर लगेच दरी ओलांडणारा पूल लागतो. या पुलावरून दिसणारे दृश्य केवळ अलौकिक आहे. निसर्गाने इथे सौंदर्याची अक्षरश: उधळण केली आहे. पुलावरून पलीकडे गेल्यावर खड्या चढणीला प्रारंभ होतो. येथून पुढचे दहा किलोमीटर घोड्याचाही घाम काढणारे आहेत. माणसाचे तर सोडूनच द्या. आता आपण केदार खोऱ्याच्या डाव्या अंगाला आलेलो असतो. दरीतून फुसांडत वाहणारी मंदाकिनीची गाज सतत आपल्या कानी पडत असते. घोडा या चढणीला कधी कधी दरीच्या बाजूला रस्त्याच्या इतक्या कडेला जातो की स्वाराची हवा टाईट होते.
स्त्री वर्गाच्या किंकाळ्या उमटतात. घोडेवाल्यांना हे नित्याचे असल्याने ताबडतोब नुसत्या तोंडच्या इशाऱ्याने ते घोड्यांना लायनीवर आणतात. समोरून केदारनाथाचे दर्शन घेऊन परत येणारे लोक उतरत असतात. एकमेकांना उद्देशून बम भोले, हर हर महादेव, जय केदारनाथ चा गजर सतत सुरू असतो.
२०१२ साली केदारनाथला झालेल्या ढगफुटीनंतर हा रस्ता नव्याने बांधण्यात आलाय. त्या आधीचा जुना रस्ता आपल्याला दरी पलीकडील डोंगरात सतत दिसत असतो. त्या रस्त्याचा चढ तुलनेने खूप कमी होता असे सांगतात. लोक सहज चढून जात असत. या नवीन रस्ता दगडी असून ओबडधोबड आहे. त्याचा चढ भयंकर दमणूक करणारा आहे. या रस्त्यामुळे चार पाच किमीची चाल वाढलीय. शिवाय या रस्त्याला मध्ये पायऱ्या लावलेल्या असल्याने चाल अधिकच कठीण होते.
त्यामुळे उत्तम फिटनेस असलेल्या माणसालाही हल्ली केदारनाथ पर्यंत पोहोचण्यास किमान सहा सात तास लागतात (रोजचा सराव असलेले घोडेवाले हा अपवाद). या चढणीवर कधी कधी आपल्यालाच घोड्यांची दया येते. मी तर तिथेच केदारनाथाला सांगितले की बाबा रे, मला पुढचा जन्म झुरळाचा दिलास तरी चालेल पण खेचराचा देऊ नकोस.
क्रमश: