कोरोना महाराष्ट्रातच का ?
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातच कोरोना का पसरतोय, कोरोनाचे नियम इतर राज्यांमध्येही पाळण्यात आले नाहीत, तरीही तिथे रुग्णवाढीचे प्रमाण कमी कसे, यासर्व प्रश्नांची उत्तरे देणारा डॉ. प्रदीप आवटे यांचा लेख....;
सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोविड १९ आजाराची दुसरी लाट आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रात रुग्ण वाढ मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. निव्वळ रुग्णसंख्येच्या आकडयांकडे पाहिले तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, हे स्पष्ट दिसून येते. देशातील एकूण १ कोटी २२ लाख रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे २८ लाखांहूनही अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर सर्वांच्याच मनातील प्रश्न आहे की असे का? करोना महाराष्ट्रातच का ?
लोकांचा हलगर्जीपणा, मास्क न वापरणे, गर्दी करणे हे तर सर्वत्रच घडते आहे, महाराष्ट्रच त्याला अपवाद नाही. मग असे का ?
लोकसंख्या आणि शहरीकरण
यातील अर्थातच पहिले कारण आहे लोकसंख्येचे ! लोकसंख्येनुसार महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या खालोखाल सर्वाधिक लोकसंख्या ही महाराष्ट्राची आहे, त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळणे स्वाभाविक आहे.
पण मग देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये कोराना रुग्णांची संख्या महाराष्ट्रपेक्षा कमी कशी काय, याचे उत्तर अर्थातच वेगळे आहे. आपण पाहतो आहोत की, मुळात करोना रुग्णांची संख्या ही अधिकाधिक शहरी भागात दिसून येते आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्ण संख्येपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे केवळ मुंबई-ठाणे, पुणे आणि नागपूर या चार महानगरांमध्ये एकवटलेले आहेत, याचा अर्थ कोणत्याही भूप्रदेशाचे शहरीकरणाचे प्रमाण या आजाराच्या प्रसाराकरता अधिक महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेला प्रांत आहे. केरळ , तामिळनाडू वगळता इतर कोणत्याही राज्यात महाराष्ट्राएवढे ( सुमारे ५० टक्के) शहरीकरण झालेले नाही. देशातील जी सर्वाधिक लोकसंख्येची पाच राज्ये आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, प. बंगाल आणि मध्य प्रदेश यांचा समावेश होतो. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शहरीकरणाचे प्रमाण अवघे २२ टक्के आणि ११ टक्के असे आहे. प. बंगाल आणि मध्य प्रदेशातही जवळपास ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आहे. अधिक विकसित आणि शहरीकरण अधिक असलेल्या देशांमध्ये करोना अधिक प्रमाणात वाढताना आपण जगभरातही पाहतो आहोत. २० कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशपेक्षा दोन अडीच कोटीच्या दिल्लीमध्ये करोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत, ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. शहरीकरणासोबत वाढणारी लोकसंख्येची घनता हे याचे मूळ कारण आहे.
कोणत्याही राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाख लोकसंख्येमागे किती जणांना कोविड १९ ची बाधा झाली आहे, हे पाहिले तर महाराष्ट्रापेक्षा गोवा, दिल्ली , केरळ या ठिकाणी हे प्रमाण अधिक असल्याचे खालील आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.
दर दहा लाख लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण
१) गोवा - ३७,६८७
२) लडाख -३४,५३५
३) दिल्ली - ३३,४३२
४) केरळ - ३२,१०६
५) पुदूचेरी- २७,५७१
६) महाराष्ट्र - २३,०२८
या आकडेवारीवरुन करोना केवळ महाराष्ट्रात नाही तर तो इतरही राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर आहे, हे स्पष्ट होते.
अर्थात आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, शहरीकरण एकटे नसते. औद्योगिक विकास, शिक्षण – नोकरीच्या निमित्ताने राज्यात मोठया प्रमाणावर होणारे स्थलांतर , त्यामुळे निर्माण होणारा परवडणा-या घरांचा प्रश्न असे सारे मुद्दे करोनाच्या प्रसाराला हातभार लावत असतात. शहरे ज्या वेगात वाढतात त्या वेगात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था विस्तारत नाहीत. ही कमतरता कोविड महामारीच्या काळात प्रकर्षाने उघडी पडते.
प्रभावी सर्वेक्षण व्यवस्था
कोणत्याही राज्याची रोग सर्वेक्षण व्यवस्था जेवढी प्रभावी तेवढी त्या राज्याची रुग्ण शोधण्याची क्षमता अधिक असते. मागील दहा वर्षाचा स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू यासारख्या आजारांचा इतिहास जरी आपण पाह्यला तरी महाराष्ट्राने नेहमी सर्वाधिक किंवा जास्तीत जास्त रुग्ण नोंदविल्याचे आपल्या लक्षात येईल. प्रभावी आणि पारदर्शक सर्वेक्षणामुळे केरळ सारख्या लोकसंख्येच्या तुलनेत देशात १३ व्या क्रमांकावर असलेल्या राज्याने देखील देशात महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक म्हणजे सव्वा अकरा लाख रुग्ण नोंदविले आहेत. बाल मृत्यू, माता मृत्यू या सारख्या आरोग्य विषयक निर्देशांकात केरळची आकडेवारी युरोपियन देशांची बरोबरी करणारी आहे. सक्षम सर्वेक्षण व्यवस्थेमुळे या राज्यानेही महाराष्ट्राप्रमाणेच सर्वाधिक रुग्ण नोंदविले आहेत. शास्त्रीय भाषेत याला ' रिपोर्टींग बायस' म्हणतात. महाराष्ट्रात मार्च अखेर सुमारे २ कोटी जणांची करोना तपासणी झाली आहे. राज्याची लोकसंख्या लक्षात घेतली तर राज्यातील प्रत्येक सहावा माणूस करोनासाठी टेस्ट झाला आहे, असा याचा अर्थ होतो. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या महानगरांमध्ये हे प्रमाण अजून जास्त आहे.
हवामान, विषाणूमध्ये होणारे म्युटेशन अशी इतर कारणेही करोना वाढीसाठी महत्वाची आहेत. कोविडची पहिली लाट, त्यानंतरची ही दुसरी लाट. या सा-या लाटा सुखसमृध्दीचा आपला किनारा साफ करत आपल्याला अधिकाधिक हवालदिल करत आहेत. ही प्रत्येक लाट आपल्याला सार्वजनिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यासाठी ओरडून सांगते आहे. विशेषतः वाढत्या शहरीकरणासोबत प्रत्येक शहरी भागात सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करणे , ही काळाची गरज आहे. आकडेवारीने आपण हवे ते सिध्द करु शकतो. पण करोना सारख्या संकटाला तोंड देण्यासाठी केवळ आकडेवारी पुरेशी नसते त्या आकडेवारीतून उगवून येणारे निष्कर्ष लक्षात घेऊन त्यांच्या आधारे भविष्याची कृतीयोजना ठरवणे अत्यंत आवश्यक आहे.
डॉ. प्रदीप आवटे.
(लेखातील आकडेवारी ३१ मार्चनुसार आहे.)