कोराना महामारीला ३ वर्षे पूर्ण...पण त्याअगोदरची महामारी कोणती?
आजच्या दिवशी ३ वर्षापूर्वी WHO ने म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात कोविड-१९ या विषाणूची करोना महामारी म्हणून अधिकृत घोषणा केली. मात्र या अगोदर भारतात पहिली महामारी कोणती आली होती अणि तिचा सामना कसा करण्यात आला त्यावेळी भारतात नेमके काय घडले, याचा घेतलेला हा आढावा...
आजच्या दिवशी तीन वर्षापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेट्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी करोना ही महामारी जगभर पसरल्याचे घोषित केले होते. साथीच्या रोगापेक्षा महामारी हा रोग सर्वाधिक लोकांना प्रभावित करतो. एखाद्या खंडात किंवा देशात एखाद्या साथीचा उद्रेक झाल्यास त्या साथीला त्या देशात किंवा खंडात महामारी म्हणून घोषित केले जाते. आणि महामारीमध्ये मृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक असते. कोविड-१९ या महामारीने जगभरात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. याचा सर्वाधिक प्रभाव पडला तो भारतायांच्या जीवनावर...त्यांच्या जीवनात अनेक मुलभूत बदल घडून आले. लाखो लोक या महामारीमुळे ग्रस्त असल्याचे पाहायला मिळाले. असंख्य नागरिकांच्या जीवनात बदल पाहायला मिळाले. लोकांना अर्थिक फटका सहन करावा लागला.
कोविड-१९ ने आधुनिक भारताला खिळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र भारत या महामारीतून सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेवून आपली प्रगती करत आहे. १८५५ साली चीनच्या युनान प्रांतातून याची सुरवात झाली आणि जगभरात पसरलेली प्लेगच्या तिसऱ्या साथीने भारतात प्रवेश केला. ही भारतात आलेली पहिली सर्वात मोठी महामारी होती. तीन वर्षापूर्वी करोनाची सुरवात सुद्धा याच चीन प्रातांच्या वूहानधून झाली असल्याचे मानले जाते. WHO च्या एका अभ्यासक्रमानुसार १८५५ ते १९५९ असे दिर्घकाळ प्लेगच्या महामारीने जगाला छळले.
१९५९ सालापर्यत प्लेगचा मृत्यूदर हा दरवर्षी २०० ने खाली आल्यानंतर ही साथ संपत आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र जवळपास या १०० वर्षात जगभरातील १२ ते २५ दशलक्ष लोकांचा या महामारीमुळे मृत्यू झाला होता. त्यापैकी ७५ टक्के नागरिकांचे मृत्यू हे १८९६ नंतर झाल्याचे WHO च्या अहवालात सांगण्यात आले आहेत. मात्र हे मृत्यू ब्रिटीश अंमलाखाली असलेल्या भारतीय उपखंडात झाले होते. जगभरात पसरलेली पहिली महामारी म्हणून प्लेगचा उल्लेख आजही केला जातो. हाँगकाँग, त्यावेळचे बॉम्बे प्रांत, सॅन फ्रान्सिस्को, ग्लासगो आणि पोर्तो सारख्या शहरांमध्ये प्लेगचा मोठ्याप्रमाणात प्रसार झाला होता.
संक्रमीत उंदरापासून मानवांपर्यत 'यर्सिनिया पेस्टिस' या जिवाणूचा प्रसार होत असे आणि या रोगामुळे प्लेगची साथ पसरत असे. भारतात त्यावेळी प्लेगच्या साथीला 'बुबोनिक प्लेग' असे संबोधले जायचे. प्लेगबाधित पिसूचा मानवी शरीराला दंश झाल्यानंतर दंशाच्या जागी दूषित रक्त सोडले जायचे. यातून प्लेगचा जिवाणू शरीरात प्रवेश करत असे. या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर शरीराची मोठ्याप्रमाणात लाही-लाही किंवा दाह व्हायचा. तसेच फ्लूसारखी ताप-थंडी आणि डोकेदुखी अशी साधारण लक्षणे सुरवातीला दिसू लागायची. त्यानंतर काखेमध्ये तसेच जांघेमध्ये मोठी गाठ तयार व्हायची. आणि ती फुटल्यानंतर त्या गाठीतून पूमिश्रित स्त्राव बाहेर पडायचा आणि काही दिवसांतच रुग्णाचा मृत्यू व्हायचा.
जानेवारी १८९७ मध्ये जगातील शास्त्रज्ञांनी हा रोग उंदरापासून होत असल्याचे शोधून काढले. आणि त्यानंतर लोकांना याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात आला. मात्र या रोगावर संशोधन करण्यासाठी १८९६ ला खऱ्या अर्थाने सुरवात झाली होती. तोपर्यंत प्लेगच्या साथीने भारतात मोठ्याप्रमाणात आपले हातपाय पसरले होते आणि त्याने आपल्या विखळ्यात अनेकजणांना घेत अनेकांचे प्राण घेतले होते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील काही भागांत अतिशय कमी प्रमाणात प्लेगची साथ पसरु लागली होती. त्यानंतर मात्र अचानक एक दिवस या साथीचा उद्रेक पाहायला मिळाला. मात्र १९ व्या शतकात प्लेगपेक्षा कॉलराची साथ भारतीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.
प्लेग भारतात चिनच्या हाँगकाँगमधून समुद्रमार्गाने भारतात पसरली असल्याचे नंतर निष्पन्न झाले. भारतात १८९६ च्या आसपास प्लेगचा प्रवेश झाल्याचे पाहायला मिळाले. ब्रिटिश वसाहती असलेल्या कलकत्ता, बॉम्बे, कराची या मोठ्या बंदरामध्ये हाँगकाँगमधून जहाजांची ये-जा सुरु होती. त्यामुळे प्लेगचा प्रसार इथे मोठ्याप्रमाणात पाहायला मिळाला. मात्र ब्रिटिशानी तिथून येणाऱ्या जहाजांचे विलगीकरण करण्यास सुरवात केली. त्यानंतर कालांतराने प्लेगचा उद्रेक येथे कमी झाल्याचे पाहायला मिळाला. तर दुसरीकडे पुण्यात प्लेगची साथ मोठ्याप्रमाणात पसरली होती.
ब्रिटिशांना व्यापार आणि जगभरातील स्वत:च्या प्रतिमेच्या काळजीपोटी त्यांनी प्लेगच्या साथीची तिव्रता कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत प्लेगने जगाला विखळा घातला होता. प्लेगची साथ पसरण्यामध्ये धान्य व्यापारीसुद्धा तितकेच जबाबदार होते. धान्य कोठारामध्ये उंदरांची संख्या मोठ्याप्रमाणात असते. आणि त्यामुळे १८९७ च्या अखेरपर्यंत प्लेगचा प्रसार उत्तरेकडील राज्यातही परसला होता. पंजाब सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात प्लेगमुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. प्लेगमुळे १९०६ पर्यंत काही दशलक्ष लोकांचे मृत्यू झाले होते. त्यापैकी अर्धे मृत्यू एकट्या पंजाबमध्ये झाले होते.
भारतात १८९६ आणि १९२१ दरम्यान प्लेगच्या साथीचे आगमन झाल्यानंतर जवळपास १२ दशलक्ष भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले होते. भारताबाहेरील इतर देशात हीच संख्या जवळपास ३ दशलक्ष मृत्यू इतकी होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्लेगच्या निवारणासाठी बॉम्बे प्रांतात अनेकांची घरे उध्वस्त केली. आरोग्य तपासणी करण्यासाठी नागरिकांना सक्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व रेल्वे स्थानक आणि बंदरावर वैद्यकीय तपासणी सक्तीची करण्यात आली. याचा परिणाम हिंसाचार झाला आणि याच दरम्यान पुण्यात चाफेकर बंधूंनी वॉल्टर चार्लस रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.
प्लेगची साथ आटोक्यात येत नसल्याचे पाहून ब्रिटिश सरकारने 'साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा,१८९७' तयार केला. या कायद्याच्या जोरावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सक्तीने प्लेगवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न केला. हाच तो कायदा आहे जो करोना महामारीत सुद्धा लागू करण्यात आला होता. मात्र तोपर्यत या कायद्यात अनेक बदल आणि सुधारणा करण्यात आल्या होत्या. १९०० च्या शतकात ब्रिटिशांनी बळजबरीने संक्रमण रोखण्यााचे प्रयत्न बंद करुन त्याऐवजी त्यांनी रोगप्रतिबंधक लस टोचण्यावर अधिक भर दिला. पण लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. लसीकरणामुळे लैंगिक शक्ती नष्ट होते, त्यामुळे लोकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती.
भारतातील प्लेगची महामारी संपण्यासाठी जवळपास २० व्या शतकाचा मध्य उजाडला होता. तरी प्लेग पूर्णपणे भारतातून नष्ट झाला नव्हता. भारतासाठी हा मोठा वाईट काळ होता. मुंबईत असलेले रशियन-फ्रेंच विषाणुतज्ज्ञ वॉल्डेमार हाफकिन यांनी प्लेगवरील पहिली यशस्वी लस शोधून काढली. या लसीचा इतका प्रभाव पाहायला मिळाला की, प्लेगमुळे होणारे ८० टक्के मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आले होते. आणि ज्यावेळी मोठ्या प्रमाणात उंदीर मारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तेव्हा कुठे प्लेग महामारीचा प्रभाव हळहळू कमी झाल्याचे दिसून आले. २० व्या शतकात सुद्धा प्लेगचा प्रादुर्भाव हा कमीअधिक प्रमाणात दिसून येत होता.
१९९४ ला सूरतमध्ये प्लेगची साथ पसरली होती. त्यावेळी सूरतमधून तीन लाख लोकांनी इतर राज्यात पलायन केले होते. स्थानिक प्रशासनाने सूरतमध्ये वेळीच योग्य आरोग्य धोरण राबविल्यामुळे ही साथ नियंत्रणात आली होती. देशाच्या फाळणीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाल्याचे पाहायला मिळाले होते. १०० वर्षापूर्वी आलेली प्लेगची महामारी आणि गेल्या तीन वर्षापूर्वी जगभरात पसरलेली कोरोनाची महामारी यांनी जगाला आपली आरोग्य यंत्रणा किती सक्षम असणे गरजेचे आहे. हे दाखवून दिले. आपली आरोग्य यंत्रणा सक्षम नसेल तर आपण अशा महामारीचा सामना करु शकत नाही. हे सत्य आहे. हे दाखवून दिले.