Sero Survey: मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर एक समाधानकारक बातमी आली आहे.;
मुंबई : कोविड – १९ विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये लहान मुलांना अधिक बाधा होऊ शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. त्यांचा हा अंदाज पाहता मुंबई महानगरपालिकेने शहरातील लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड – १९च्या अँटीबॉडीज (Antibodies) विकसीत झाल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत अँटीबॉडीज असलेल्या लहान मुलांची संख्यादेखील जास्त आढळली आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना आणि बालकांना देखील कोविड – १९ विषाणूचा धोका पोहोचू शकतो, ही बाब लक्षात घेता, कोविडच्या दुसऱ्या लाटे दरम्यान लहान मुलांच्या सेरो सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार, १ एप्रिल २०२१ ते १५ जून २०२१ दरम्यान लहान मुलांचे सेरोलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नायर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय निदान प्रयोगशाळेत संयुक्तपणे रक्त नमुने विषयक सेरोलॉजिकल सर्वेक्षण केले गेले. वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चाचणी करण्याकरीता संपूर्ण मुंबईतून आलेल्या रक्त नमुन्यांमधून विभागनिहाय नमुने घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.
कसे करण्यात आले सर्वेक्षण
मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून एकूण २ हजार १७६ अनोळखी रक्त नमुने गोळा करण्यात आले. वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून हे नमुने गोळा करण्यात आले. यामध्ये महानगरपालिकेच्या आपली चिकित्सा वैद्यकीय प्रयोगशाळांच्या विविध शाखा आणि नायर रुग्णालय यांच्या माध्यमातून १ हजार २८३ आणि खासगी २ वैद्यकीय प्रयोगशाळातून ८९३ रक्त नमुने गोळा करण्यात आले. या रक्त नमुन्यांची आवश्यक प्राथमिक चाचणी केल्यानंतर अँटीबॉडीज संदर्भातील चाचणी करण्यासाठी हे सर्व रक्त नमुने कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव निदान वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.
सर्वेक्षणातील निष्कर्ष
1. मुंबईतील ५१.१८ टक्के बालकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. यापैकी, महानगरपालिकेच्या प्रयोगशाळातील ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळातील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली आहेत.
2. १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आली आहेत.
3. वयोगटानुसार विचार करता वयवर्ष १ ते ४ गटामध्ये ५१.०४ टक्के, ५ ते ९ वयोगटामध्ये ४७.३३ टक्के, १० ते १४ वयोगटामध्ये ५३.४३ टक्के, १५ ते १८ वयोगटामध्ये ५१.३९ टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळली आहेत. वय १ वर्ष ते १८ पेक्षा कमी या संपूर्ण वयोगटाचा विचार केल्यास ही सरासरी ५१.१८ टक्के इतकी होते.
4. विशेष म्हणजे यापूर्वी म्हणजे मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये वयवर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटात आढळलेल्या अँटीबॉडीजचा विचार केल्यास सुमारे ३९.०४ टक्के इतक्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळली होती. त्या तुलनेत आता अँटीबॉडीज असलेल्या मुलांची टक्केवारी वाढली आहे. याचाच दुसरा अर्थ असा आहे की, दुसऱ्या लाटे दरम्यानच १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील बालकांना कोविड – १९ विषाणूच्या संपर्कात आली होती.
5. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लहान मुले / बालक / नवजात बाळ यांना कोविड – १९ ची बाधा होऊ शकते, असा वैद्यकीय क्षेत्रातून अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, सदर सर्वेक्षणातील आढळलेली निष्कर्ष लक्षात घेतले तर, जवळपास ५० टक्के लहान मुलांना यापूर्वीच कोविडची बाधा झाल्याचे अथवा विषाणूच्या सान्निध्यात ते आल्याचे या अभ्यासातून दिसते.