स्तनपान करताना दूध कमी येतं का? जाणून घ्या
नव्याने आई होणाऱ्या महिलांना प्रसुतीनंतर अनेक प्रश्न मनात येतात. कधी कधी स्तनाग्रातून दूध कमी येतं. तर कधी बाळ दूध कमी पितं. तर कधी कधी बाळ अजिबात दूध पित नाही. बाळाचे पोट त्या दुधाने भरतं की नाही, हे आईनं कसं ओळखावं? स्तनाला दूध कमी येण्याची लक्षणे? दूध कमी येण्याची कारणे? दूध अगदी चांगलं येण्यासाठी काय करावे? जाणून घ्या एका क्लिकवर…
महिलांच्या आयुष्यातील सुंदर दिवस म्हणजे आई होणं. मातृत्व लाभल्यानंतर महिलांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पण, ती आव्हाने पचवण्याची ताकददेखील त्यांच्यात असते. उदाहरणार्थ, थकवा येणे ॲनिमिया, बाळाला अंगावरचं दूध कमी येणे किंवा पूर्णत: न येणे अशा समस्या उद्भवतात.
आजकाल बहुतांशी महिलांमध्ये बाळाला दूध कमी येणे किंवा पूर्णत: न येणे अशी समस्या उद्भवतेय. कधी घाबरूनदेखील दूध मागे जातं अर्थातचं स्तनाग्रातून ते ओघळत नाही, असं म्हटलं जातं. तर आपण याविषयीची कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.
नव्याने आई होणाऱ्या महिलांना प्रसुतीनंतर अनेक प्रश्न मनात येतात. किंवा अनेक गोष्टींची भीती असते. कधी कधी स्तनाग्रातून दूध कमी येतं. तर कधी बाळ दूध कमी पितं. तर कधी कधी बाळ अजिबात दूध पित नाही. बाळाचे पोट त्या दुधाने भरतं की नाही, हे आईनं कसं ओळखावं? दूध कमी का येतं किंवा अजिबात का येत नाही. मग यासाठी काय करावं? या सर्व गोष्टींचा ऊहापोह इथे घेतला आहे.
प्रसुती झाल्यानंतर आईला दूध येणं हे निसर्गाने दिलेलं वरदानचं आहे. बाळ जन्मल्यानंतर एक किंवा दोन तासांनी बाळाला जवळ घेऊन स्तनपान करणं खूप महत्त्वाचं आहे.
स्तनाला दूध कमी येण्याची लक्षणे?
असं म्हटलं जातं की, कधी कधी घाबरल्यामुळे आईला दूध येत नाही. ते मागे जातं. तर कधी कधी स्तनाग्रांमधून दूध ओघळत नाही. स्तन कमी भरलेले वाटतात. स्तन दाबून दूध बाहेर काढावं लागतं. बाळाच पोट भरत नसेल तर ते सारखं रडतंही. बाळ शी करत नसेल, शू व्यवस्थित करत नसेल तर दूध कमी येत असल्याचं लक्षण आहे.
बाळाला पाण्याची पुरेशी मात्रा ही आईच्या दुधातून शमवली जाते. बाळ सहा महिन्यांचे होऊपर्यंत आईचं अंगावरील दुधातून बाळाची पाण्याची गरज भागत असते. जर पुरेसं दूध मिळत नसेल तर बाळ नियमित लघवी करत नाही. नवजात बाळ दिवसातून ९ ते १० वेळेला लघवी करतं. पण, त्यापेक्षा जर कमी वेळेला असा प्रकार होत नसेल तर बाळाला पुरेसं दूध मिळत नसल्याचं समजावं.
आईने बाळाच्या वजनाकडेही लक्ष द्यावं. बाळाला पुरेसं दूध मिळत असेल तर बाळाचे वजन वाढलेलं दिसेल. नाही तर बाळ बारीक होतं. वजनदेखील वाढत नाही.
प्रसुतीनंतर आईने पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं आहे. आईच्या दुधातूनचं पौष्टिक घटक बाळाच्या शरीरात जाणार आहेत. त्यामुळे सिझेरियन झालेल्या महिलांना प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी लागेल.
दूध कमी येण्याची कारणे?
बाळ झाल्यानंतर आयुष्यातील नवा काळ सुरू होतो. प्रसुती आधी फार काही काळजी वाटत नाही. पण, प्रसुती जवळ जवळ येताचं किवा त्यानंतर जबाबदारी वाढते. पुढे कसं होईल, काय होईल? बाळाचा नीट सांभाळ होईल का? काय होईल याचा विचार सुरू होतो.
अगदी ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतरदेखील काही महिला प्रचंड घाबरलेल्या असतात. कळ येण्याचं इंजेक्शन दिल्यानंतर ते प्रससुती होईपर्यंतचा काळ वेदनादायी असतो. त्याचाही परिणाम शरिरावर होतो. बाळ झाल्यानंतर कधी कधी निराशादेखील येते.
बाऴाच्या जन्मावेळी अतिटेन्शन घेतले असेल तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. याचा परिणाम आईच्या दुधावर होऊ शकतो. आईला ॲनिमिया असल्यास, थायरॉईडची समस्या असल्यानंतर, मधुमेहाचा त्रास असेल तर, प्रसुतीवेळी रक्तस्त्राव झाल्यास दुधावरही परिणाम होतो.
लठ्ठपणामुळे दूध निर्मितीची प्रक्रिया होत नाही. तसेच धुम्रपानामुळेही दुधाचा पुरवठा होत नाही. औषधांचा अतिरिक्त वापरामुळेही दूध पुरवठ्यात अडचणी येतात. काही डॉक्टरांच्या मते, सिझेरियन झाल्यानंतर सुरुवातीला १५ दिवस किंवा महिनाभर आईला दूध कमी येतं. हे त्या आईच्या क्षमतेवर अवलंबून आहे.
दूध अगदी चांगलं येण्यासाठी काय करावे?
सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर दूध चांगलं येण्यासाठी औषधे देऊ शकतात. बाळ जरी दूध पित नसले तरी ब्रेस्ट फिंडींग इंजेक्शन किंवा पंपने दूध काढून ते बाळाला चमचाने पाजता येईल. पण, ब्रेस्टमधील दूध काढणं महत्त्वाचं आहे.
शरीराला पौष्टीक घटक मिळण्यासाठी संतुलित आहार घेणं अतिशय गरजेचं आहे. यामध्ये पालक, ओट्स, फळे, लोह वाढवणारे पदार्थ, मेथ्या, हळीव, डिंकाचे लाडू, सुका मेवा, बडीशेप आदी पदार्थांचा यामध्ये समावेश आहे. आईला भावनिक पातळीवर दिलासा, समर्थन देणं गरजेचं आहे.
प्रसुतीनंतर ३ महिने शरीराला आराम द्यावा लागेल. मग, ते नॉर्मल असो वा सिझेरियन डिलिव्हरी. अधिकीधिक रेस्ट घेणे आणि तणावरहित असणे, हे स्तनपान करण्याची यशस्वी वाटचाल आहे.
संकलन - साहेबराव माने. पुणे.