Factcheck : मुंबईतून शाळकरी मुलांचे खरंच अपहरण झाले का?
मुंबईत मुलं चोरणारी टोळी सक्रीय़ झाल्याच्या ऑडिओ क्लीपने खळबळ उडाली आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लीप खरी आहे का, मुलांचे खरंच अपहरण झाले आहे का, याबाबत आता मुंबई पोलिसांनीच माहिती दिली आहे.
मुंबई, ठाण्यासह आसपासच्या भागात सध्या मुलांचे अपहऱण करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्याचे मेसेड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक ग्रुप्सवर एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून यामध्ये एक महिला कलाविद्या शाळेतून तीन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आल्याचे सांगत आहे, तसेच पालकांनी मुलांना शाळेत घेण्यासाठी लवकर पोहोचावे, असे आवाहन करत आहे. व्हॅनमधून येणारी एक टोळी मुलांचे तोंड दाबून त्यांना पळवून नेत आहे असेही या ऑडिओ क्लीपमध्ये सांगितले गेले आहे.
अंधेरीमधील एका पालकाचा असाच मेसेज देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या व्यक्तीच्या ११ वर्षांच्या मुलाचा हात धरुन कुणीतरी त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व सीसीटीव्ही तपासले पण त्यामध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त मिड डे ने दिले आहे.
अशा अफवांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना एकटं शाळेत पाठवयाचे का, ट्युशन आणि इतर क्लासेसला एकटे जाणाऱ्या मुलांना कसे सोडायचे असे अनेक सवाल पालक विचारु लागले आहेत.
पण आता यासर्व गदारोळावर मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईतून शाळकरी मुलांचे अपहरण झालेले नाही आणि व्हायरल झालेली ऑडिओ क्लीप ही फेक आहे, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मिड डेशी बोलताना केले आहे. तसेच मुंबईत मुलांचे अपहरण करणारी कोणतीही टोळी सक्रीय नाहीय, मुंबई पोलीस यावर लक्ष ठेवून आहेत, असेही विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावरील पोस्टची खात्री केल्यानंतर त्या फॉर्वर्ड कराव्या, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एखादा फोटो, एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ हे खरेच असतील असे नाही, तर अनेकवेळा व्हिडिओचा संदर्भ वेगळा असतो, किंवा ते मुद्दाम तयार करण्यात आलेला असतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.