#Coronavaccine : आणखी एक भारतीय लस तयार, 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठीही उपयुक्त
कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने आता देशात जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे येत आहेत. त्यामुळेच कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींसोबतच सरकारने रशियाची स्पुटनिक आणि अमेरिकेतील मॉडर्ना लसींना भारतात परवानगी दिली आहे.
त्याचबरोबर आता भारतात आणखी एक म्हणजेच पाचवी लस लवकरच येण्याची शक्यता आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी असलेल्या Zydus Cadila ने कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी देशाच्या औषध महानियंत्रकांकडे (DCGI) मागितली आहे. ZYCOV-D असे या लसीचे नाव आहे. Zydus Cadila कंपनीतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. वर्षाला 12 कोटी लसींची निर्मिती केली जाणार असल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. या लसीला मान्यता मिळाली तर ती भारतात कोरोनावर दिली जाणारी पाचवी लस ठरणार आहे.
Zydus Cadila कंपनीने या लसीच्या तिसऱ्या चाचणीनंतर ही परवानगी मागितली आहे. कंपनीतर्फे देशभरातील सुमारे 28 हजार स्वयंसेवकांवर याची चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्वयंसेवकांपैकी 1 हजार स्वयंसेवक हे 12 ते 18 वर्षांच्या आतील होते. त्यामुळे या लसीला मान्यता मिळाल्यास 12 ते 18 वर्षांच्या आतील मुलांनाही ही लस देता येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लहान मुलांसाठीची ही पहिली भारतीय लस ठरु शकते.