राज्यात कुठे सापडला कोरोनाच्या नव्या विषाणूचा रुग्ण ? जे एन-1 नव्या विषाणूमुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर
नाताळ, नवीन वर्षानिमित्त गोव्याला जाताय,जरा सावधान ?
महाराष्ट्रात नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त पर्यटनाला जाण्याचा बेत आखणाऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल, आता नेमकी काळजी कोणती घ्यायची?. कोरोना काळ संपून तर जमाना झालाय. आणि येणारे कोरोना विषाणू तर जीवाला धोकादायकही नाही. आता करू द्या कि थोडी मस्ती. पण तसं नाहीये. मजा मस्ती तर करायचीच आहे,मात्र थोडी काळजी घेतली तर बिघडलं कुठे? हो पण जिथे जाणार आहात तिथे तर गर्दी असेल ना ?
गर्दीत तुम्हाला भेटू शकतो कोरोनाचा नवा विषाणू जे एन-1 कोरोनाचा नवीन व्हेरिएंट जेएन.1 सापडलाय सिंधुदुर्ग जिल्हयात. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलीय.
महाराष्ट्र सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या या नव्या विषाणूने जागतिक आरोग्य संघटनेच्या चिंता वाढवली आहेच पण अनेक देशांमध्ये आरोग्य यंत्रणांचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत. जेएन.1 चा भारतातही शिरकाव झाला आहे. केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह भारतातल्या अनेक राज्यांमध्ये जेएन.1 बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सर्वाधिक जेएन.1 बाधित रुग्ण गोव्यात आढळले असून गोवा राज्य सरकारनं त्याची सर्वात जास्त धास्ती घेतली आहे.कारण नव्या वर्षानिमित्त पर्यटकांची गर्दी त्यांच्याच राज्यात जमणार आहे. गोव्यात आतापर्यंत जेएन.1 बाधित19 रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखालील राज्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेत देशभरातील परिस्थितीची माहिती घेतली गेली. राज्य सरकारांनी कोव्हिड-19 च्या रुग्णांची वाढती संख्या, लक्षणे, आजाराची गंभीरता यावर लक्ष ठेवून, सार्वजनिक आरोग्याच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे मांडवीय यांनी सांगितले. केरळ, महाराष्ट्र, झारखंड आणि कर्नाटक या राज्यांत दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ नोंदवली जात असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
गोव्यातल्या रुग्णांमध्ये कोणती आढळली लक्षणं?
गोव्यातल्या सर्व रुग्णांमध्ये खोकला आणि सर्दीची लक्षणं पाहायला मिळाली आहेत. अनेक रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल न करता केवळ सात दिवस विलगीकरण कक्षात ठेवून बरे झाले आहेत. तसेच या रुग्णांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर सुद्धा आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवून आहोत.
महाराष्ट्रातही आढळला जेएन.1 चा रुग्ण
केरळमधल्या थिरूवअनंतपुरम येथील काराकुलम येथे 8 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन.1’ विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘जेएन.1’चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन.१’ या करोनाच्यानवीन उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.अमेरिकेत 8 डिसेंबरला पहिला रुग्ण आढळला.
यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एन्ड प्रिवेंशननं या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ८ डिसेंबरपर्यंत अमेरिकेत वाढलेल्या १५ ते २९ टक्के कोरोना रुग्णांसाठी व्हेरिएंट जेएन 1 जबाबदार आहे. जेएन 1 पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात आढळला. मागील आठवड्यात चीनमध्ये कोरोनाच्या या व्हेरिएंटचे ७ रुग्ण सापडले आहेत.कोरोनाच्या महामारीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्या विषाणूने डोकं वर काढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाली आहे.जे एन 1 या नव्या विषाणूचा रुग्ण सिंधुदुर्गात आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळते.मात्र, हा रुग्ण पूर्णपणे बरा असून कुणी घाबरून जाऊ नये असे आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
WHO चे म्हणणे काय आहे ?
कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट जेएन 1 ला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट'च्या यादीत टाकले आहे.वाढत्या थंडीच्या दिवसात ‘जेएन.1’व्हेरिएंटच्या संक्रमणाचा धोका बळावला आहे. परंतु या व्हेरिएंटमुळे लोकांना फारसे नुकसान होणार नाही असंही WHO ने स्पष्ट सांगितले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जेएन 1 आरोग्यासाठी धोकादायक नसून सध्या अस्तित्वात असलेली व्हॅक्सिन यापासून संरक्षण करण्यास सक्षम असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्याचसोबत WHO ने लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात म्हटलं आहे की, लोकांनी गर्दीच्या, बंद किंवा खराब हवेच्या ठिकाणी मास्क घालावे. तसेच शक्यतोवर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा. आरोग्य कर्मचारी आणि मेडिकल संबंधित लोकांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्क परिधान करावे. पीपीई किट घालून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करा. व्हेंटिलेटरची सुविधा गरजेनुसार उपलब्ध करून ठेवा असं सांगण्यात आले आहे.