कोविडच्या लसीचा बुस्टर डोस
पूनावाला यांनी कोविशिल्ड लसीचा बुस्टर डोस घेतला असे सांगितले आणि सर्वांचे Whatsapp बुस्टर डोस बाबतच्या बातम्यांनी भरून गेले. मात्र, बुस्टर डोस म्हणजे नक्की काय? एखाद्या लसीचा बुस्टर डोस कधी द्यायचा? या संदर्भात साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे यांनी केलेले विश्लेषण... नक्की वाचा;
पूनावाला यांनी कोविशिल्ड लसीचा बुस्टर डोस घेतला असे सांगितले आणि सर्वांचे वॉट्स अॅप बुस्टर डोस बाबतच्या बातम्यांनी भरून गेले. लस उपलब्ध झाली तेव्हापासूनच लसीचे बुस्टर कधी घ्यायचे. याविषयी अंदाज वर्तवले जात होते. कोणी सहा महिने, कोणी वर्ष असे अंदाज सांगत होते. कोणी सारखे बुस्टर घ्यावे लागणार या कारणासाठी लस घ्यायला तयार नव्हते.
सध्या अमेरिकेमध्ये फायझर लसीचा बुस्टर व तिसरा डोस दिले जाणार आहेत. आधी सीडीसी ने वृद्ध व ज्यांची इम्युनिटी कमकुवत आहे अश्या व्यक्तींना तिसरा डोस देण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सर्वांना बुस्टर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
हे बघून इतर देशातील जनतेला देखील तिसरा डोस घेण्याचे वेध लागले आहेत. याला भारत देखील अपवाद नाही. गम्मत म्हणजे जे आरोग्य कर्मचारी सुरुवातीला लस घेण्यास कचरत होते आणि लसीच्या परिणामांबाबत पुरेशी स्पष्टता नाही असे त्यांचे म्हणणे होते, तेच कर्मचारी बुस्टर डोस बाबत काहीही निरीक्षणे उपलब्ध नसताना देखील बुस्टर डोस घेण्यास अगदी उत्सुक आहेत. पुनावालाने स्वतः तिसरा डोस घेऊन या चर्चेला/इच्छेला चालना दिली आहे. आणि एक लस दुसऱ्या लसीपेक्षा श्रेष्ठ आहे या विश्वासामुळे काहीजण संमिश्र लसीकरण करण्यास देखील उत्सुक आहेत.
कोविड लसीच्या बुस्टर डोसविषयी आज थोडी माहिती घेवूया.
१. एखाद्या लसीचा बुस्टर डोस कधी द्यायचा याचा निर्णय कसा घेतला जातो?
लसीकरणानंतर ब्रेकथ्रू इन्फेक्शन ची संख्या व मुख्यतः आजाराच्या गंभीरतेचे प्रमाण जेव्हा वाढू लागते तेव्हा लसीमुळे मिळणारे संरक्षण कमी झाले आहे हे समजते. रक्तातील antibody चे प्रमाण मोजणे हा एक उपाय यासाठी असू शकतो. मात्र त्यासाठी antibody ची संरक्षक पातळी (titre) किती आहे हे माहित असायला हवे.
त्याच प्रमाणे रक्तातील antibodyची पातळी नेहमीसाठी स्थिर रहात नसते. तसे झाले असते तर जन्मापासून जेवढे जंतुसंसर्ग झाले तेवढ्या antibodies शरीरामध्ये विनाकारण निर्माण होत राहिल्या असत्या व शरीरातील प्रथिने वाया गेली असती. त्यामुळे वेळ जाईल तसे प्रत्येक antibody कमी होत जाते मात्र मेमरी सेल मुळे भविष्यामध्ये कधीही त्याच जंतूचे इन्फेक्शन झाले तर योग्य त्या antibody चे प्रमाण तातडीने वाढते व आपले संरक्षण होते.
त्यामुळे पुनावालाचे म्हणणे कि केवळ antibody कमी झाल्या आहेत म्हणून सहा महिन्याने बुस्टर घ्यायला हवे हे शास्त्रीय दृष्ट्या संयुक्तिक नाही. बुस्टर ची योग्य वेळ ठरवण्यासाठी स्टडीज केल्या गेल्या पाहिजेत.
सध्या उपलब्ध असणाऱ्या लसी संसर्ग टाळू शकत नाहीत तर केवळ गंभीर आजाराची शक्यता कमी करतात. म्हणून ब्रेक थ्रू इन्फेक्शन झाल्यास गंभीर आजाराचे प्रमाण सांगू शकेल असा डाटाबेस तयार करणे आवश्यक आहे.
२. WHO ने सध्या बुस्टरडोस द्यायची गरज नाही असे का म्हटले आहे?
वैश्विक साथ सुरु असताना केले जाणारे लसीकरण हे मुख्यतः साथ थांबवण्यासाठी केले जाते, ज्यामध्ये जास्तीत जास्त जनतेचे लसीकरण वेगाने पूर्ण करणे आवश्यक असते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा उपलब्ध लसींचा वापर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केला जाईल.
जे देश सध्या बुस्टर देण्याच्या विचारात आहेत त्या देशातील ६०% हून अधिक जनतेचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र जर जगातील इतर देशांमध्ये लसीकरण अतिशय अत्यल्प प्रमाणात झालेले असेल तर सर्व देशांसाठीचा धोका वाढत रहातो . ही बाब सर्व पुढारलेल्या देशांनी समजून घेणे आवश्यक आहे. सध्या प्रत्येक देश प्रामुख्याने केवळ आपल्यापुरता विचार करीत आहे .
WHO ने त्यांना जागतिक दृष्टीकोन व साथीच्या बाबतीमध्ये व्यापक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा ही महासाथ खूप अधिक काळासाठी सुरु राहील !
३. जगातील सर्व देशातील जनतेचे लसीकरण पुरेश्या प्रमाणात झाले नसेल तर सर्वांसाठी धोका कसा वाढतो?
सध्या साथ थांबवण्यासाठी लसीकरण हा उपाय उपलब्ध आहे आणि एकाहून अधिक लसी उपलब्ध आहेत. एकाच वेळी कोट्यावधी जनतेला प्रथमच लसीकरण केले जात आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तीला करोना संसर्गापासून संपूर्ण संरक्षण मिळत नाही. मात्र संसर्ग झाल्यास कोविड होण्याचा धोका साधारणत: ७०% ने कमी होतो. गंभीर आजार व मृत्यूचा धोका ९०% हून अधिक कमी होतो.
याहून महत्वाचे म्हणजे लसीकृत व्यक्तीच्या शरीरामध्ये करोनाची संख्या नियंत्रित रहाते आणि त्यामुळे म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन होण्याची शक्यता कमी होते. मात्र ज्या व्यक्तींनी अजून लस घेतलेली नाही त्यांच्यामध्ये संसर्ग झाल्यास आजार गंभीर होण्याचा धोका व त्यांच्या शरीरामधील करोनामध्ये म्युटेशन होण्याचा धोका बराच असतो.
असे म्युटेशन होताना एखाद्या व्हेरीयंट मध्ये इम्यून एस्केप म्हणजे रोग प्रतिबंधक शक्तीपासून बचाव करण्याची शक्ती आली तर मग आपण आतापर्यंत केलेले सर्व लसीकरण बिनकामाचे होऊ शकते. आपल्याला पुन्हा नव्या लसीसह सुरुवात करावी लागू शकते.
हा धोका देशांतर्गत किंवा बाहेरील देशांमधून देखील असू शकतो . म्हणून सर्व देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढायला हवे. आणि देशामधील जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यायला हवी.
४. बुस्टर डोस घेऊन स्वतःची सुरक्षा वाढवण्यास काय हरकत आहे?
लसीकरण करणे हे एखादे औषध घेण्याहून वेगळे असते. औषध घेतले कि औषध आपल्या शरीरामध्ये जाऊन काम करते आणि काही काळानंतर बाहेर टाकले जाते आणि औषधाचा परिणाम संपतो.
जेव्हा आपण लस घेतो तेव्हा लस केवळ एखादे antigen किंवा मृत अथवा अर्धमेले जंतू आपल्या शरीरात पोचवते. इम्युनिटी निर्माण करण्याचे काम आपले शरीर स्वतः करत असते. जंतू जरी शरीरातून नष्ट झाले तरी देखील त्यांचा परिणाम मात्र शरीरामध्ये रहातो आणि प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असल्याने परिणाम काही प्रमाणात वेगळे असू शकतात. बुस्टरनंतरच्या अवांछित परिणामांबाबत देखील अभ्यास व्हायला हवा. याबाबत स्वतः प्रयोग करणे योग्य होणार नाही.
त्यामुळे बुस्टर बाबत योग्य ते अभ्यास होऊन मार्गदर्शक तत्वे उपलब्ध झाल्यानंतर बुस्टरचा विचार करणे योग्य राहील. सध्या उपलब्ध असलेली कोणतीही लस संसर्गाचा धोका शून्य करू शकणार नाही. त्यासाठी घ्यावयाची काळजी दोन डोस नंतर घ्यायची आहे आणि बुस्टर नंतर देखील घ्यायची आहे. जर संसर्ग प्रतिबंधाचे नियम योग्य रीतीने पाळले तर लस गंभीर आजारापासून सुरक्षा देऊ शकते.
त्याच प्रमाणे उपलब्ध लसी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने बनलेलेल्या असल्याने सरसकट सर्व प्रकारांसाठी एकाच वेळी बुस्टरची गरज भासणार नाही. प्रत्येक लसीसाठी वेगळा नियम असू शकतो. डेल्टा विरुद्ध उपलब्ध लसी आजार टाळण्यामध्ये कमी प्रमाणात उपयुक्त असल्या तरी गंभीर आजार टाळू शकत आहेत. मात्र पुढील व्हेरीयंट बाबत असे घडेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे बुस्टर देताना नव्या व्हेरीयंट चा बुस्टर घेणे अधिक परिणामकारक ठरू शकेल. (फ्लूची लस दर वर्षी त्या त्या वेळी फैलावणाऱ्या व्हेरीयंट विरुद्धची असते.)
संमिश्र लसीचे बुस्टर देण्याबाबत देखील योग्य ते अभ्यास होणे आवश्यक आहे कारण लस दिल्यानंतरचे परिणाम अपरिवर्तनीय असतात. त्यामुळे ज्यांना संसर्गाचा व मृत्यूचा धोका अधिक आहे अश्या व्यक्तींनाच बुस्टर देण्याबाबत मार्गदर्शक नियमावली भविष्यामध्ये येऊ शकते. मात्र संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे. लसीकरण झाले किंवा बुस्टर घेतला म्हणून नियम पाळणे कमी केल्यास संसर्ग नक्कीच होईल.
५. मग बुस्टर बाबत नक्की काय करावे?
बुस्टर देण्या न देण्याबाबत अनेक पैलू आहेत. लसीचा प्रकार, बुस्टर दिल्यास मिळणारे वाढीव वैयक्तिक तसेच सामुदायिक फायदे, लसीची उपलब्धता, समाजातील लसीकरणाचे प्रमाण, फैलावणारे व्हेरीयंट आणि त्याविरुद्ध लस देऊ शकणारी वाढीव सुरक्षा, बुस्टर नंतर दिसणारे परिणाम, कोणत्या लसीचा बुस्टर घेतल्यास अधिक फायदा होईल, लस घेतली म्हणून नियम न पाळण्याची समाजातील वृत्ती (यामुळे लक्षणविहीन संसर्ग वाढून फैलाव रोखणे अवघड जाते), समाजातील मास्क वापराचे प्रमाण, निर्बंध शिथलीकरणाचे परिणाम इ.
बुस्टर देऊन केवळ काही लोकांना अधिक सुरक्षित करायचे कि उपलब्ध लस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून साथ थांबवण्याचा प्रयत्न करायचा हा निर्णय महत्वाचा असणार आहे. लसींचे उत्पादन वाढल्या खेरीज या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणे अवघड आहे.
याविषयी शास्त्रज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शक नियम उपलब्ध होईपर्यंत लसीचे दोन डोस झाल्यानंतर करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळल्यास करोना संसर्ग तर टळू शकतोच आणि जर झालाच संसर्ग तरीदेखील गंभीर आजार आपण टाळू शकतो. त्यामुळे सरसकट बुस्टर ऐवजी ठराविक गटांसाठी बुस्टर देणे अधिक परिणामकारक ठरेल.
चीन मध्ये असे ३ गट सुचवले गेले आहेत.
१. आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसोबत संबंध येणाऱ्या व्यक्ती,
२. वृद्ध व इम्युनिटी कमी असणाऱ्या व्यक्ती आणि
३. शिक्षण व नोकरीसाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती. प्रत्येक देश याबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकेल.
वैद्यकीय कर्मचाऱ्यासाठी देखील बुस्टर उपलब्ध करून देता येईल कारण त्यामुळे वैद्यकीय सेवा विनाखंड सुरु रहातील. लसीकरण हे अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी आहे. मुलभूत सुरक्षा करोना प्रतिबंध नियमांमध्ये आहे. नियम कसे पाळता येतील, स्वतःची जोखीम कशी कमी करता येईल याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास बुस्टर देखील परिणामकारक ठरणार नाही.
साथ थांबवून पुन्हा निवांत आयुष्य जगायचे असेल तर समाजाला एकजूट होऊन एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक निर्णयाचे फायदे तोटे लक्षात घेऊन सर्वात परिणामकारक निर्णय घ्यायला हवा. वैयक्तिक स्तरावर वैयक्तिक फायद्याचे निर्नाय घेऊन साथ थांबणार नाहीये. त्यामुळे बुस्टर बाबत नियमावली उपलब्ध होईपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंध नियमांचे पालन मनापासून करुया आणि निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करण्यासाठी सहाय्य करुया!
WHO चे बुस्टर बाबत statement : https://www.who.int/news/item/10-08-2021-interim-statement-on-covid-19-vaccine-booster-doses
चीन ची बातमी : https://www.globaltimes.cn/page/202108/1232651.shtml
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोग तज्ञ , मिरज.
(साभार @UHCGMCMIRAJ page)