देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. पण कोरोनाची तिसरी लाट टाळता येणे अशक्य आहे, असे Indian Medcal Association ने म्हटले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी आणि नागरिकांनी स्वत:हून काही निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असे आवाहनही IMAने केले आहे. IMAने एक पत्रक काढून हे आवाहन केल आहे. सर्व राज्य सरकारांनी आतापर्यंत कोरोनाविरोधात जसा लढा दिला आहे तो तसाच सुरू ठेवावा, त्यात कोणतीही नरमाई आणू नये असे IMA म्हटले आहे. पण जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण तसेच कोरोना संदर्भातल्या नियमांचे काटेकोर पालन केले तर तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करता येऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि वैद्यकीय क्षेत्राच्या अथक प्रयत्नांनी आपण दुसऱ्या लाटेमधऊन बाहेर पडत आहोत, असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे.
तिसरी लाट अटळ का?
जागतिक पातळीवरील पुरावे आणि कोणत्याही महामारीचा इतिहास पाहिला तर तिसरी लाट अटळ आहे, असे IMAने या पत्रकात म्हटले आहे. गेल्या दीड वर्षात एक गोष्ट सिद्ध झाली आहे की लसीकरण आणि नियमांचे पालन केले तर कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकतो. पण गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते आहे, असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे. अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारं आणि जनता कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता गर्दीचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. धार्मिक यात्रा, धार्मिक उत्सव, पर्यटन स्थळी प्रवास या गोष्टी पुढचे काही महिने नकोच असे आवाहन IMA केले आहे. अशाप्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये लोक लसीकरण झालेले नसताना आणि कोरोनाची कोणतेही नियम न पाळता जात असल्याने हे लोक तिसऱ्या लाटेला पोषक असे सुपरस्प्रेडर ठरण्याची भीती IMA ने व्यक्त केली आहे.
गर्दी टाळा अर्थव्यवस्था वाचवा
IMA ने आपल्या पत्रकात पुढे असेही म्हटले आहे की, कोरोनाबाधीत रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी जो खर्च लागतो त्या तुलनेत गर्दीचे कार्यक्रम रद्द करुन होणारा खर्च कमी आहे, त्याचा अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही. त्यामुळे पुढचे किमान तीन महिने कोरोनाच्या नियमांचे पालन केले तर तिसऱ्या लाटेवर आपल्याला मात करता येऊ शकते. तसेच आपल्या आसपासच्या जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होईल हे पाहणे देखील आपली जबाबदारी असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी गर्दीचे कोणतेही कार्यक्रम होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन IMA केले आहे.