लस घ्या,गिफ्ट मिळवा: कोविड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापाऱ्याने लढवली अनोखी शक्कल

कोविड महामारीचं संकट अजूनही संपलेलं नाही. ओमिक्रॉन वेरीअंट जगभर पसरत असताना अजूनही लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही.सोलापूर जिल्ह्यात लस घ्या गिफ्ट मिळवा असा अनोखा उपक्रम राबवत असून त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे.. प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट;

Update: 2021-12-10 08:39 GMT

नागरिकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका आरोग्य विभाग, मोहोळ नगर परिषद,पत्रकार संघ व सिद्धनागेश उद्योग समूह यांनी अनोखी शक्कल लढवत लस घ्या,गिफ्ट मिळवा या उपक्रमाचे आयोजन केले आहे.या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शिबीर 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत चालणार आहे.या शिबिरात नागरिकांनी लस घेतल्यानंतर त्यांना कुपन देण्यात येत आहे.कुपन बंदिस्त पेटीत टाकले जात असून पेटी शिबीर संपल्यानंतर मोबाईल कॅमेऱ्याने शूट करत लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ पद्धतीने कुपन काढून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.या अनोख्या उपक्रमाला मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील,पोलीस निरीक्षक अशोक सायकर,नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.योगेश डोके,गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी भेट देऊन कौतुक केले.

प्रशासन लोकांच्या सेवेसाठी तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील

लसीकरण शिबिराला भेट दिल्यानंतर तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांनी बोलताना सांगितले की,प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी आहे.तहसिल कार्यालयात तालुक्यातील कामानिमित्त जनता येत असते.जनतेची अडवणूक करण्याचा मुळीच हेतू नाही.परंतु कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहेत.ओमीक्रोन या कोरोना विषाणूचा धोका वाढत असल्याने नागिकना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. लग्न सोहळे कमी लोकांच्या उपस्थित करण्यात यावेत.दुकानात काम करणाऱ्या व्यापारी व कामगारांनी लस घेतलेली असावी.लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्यावर कारवाई करण्यात येणार आहे.मोहोळ तहसिल कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मास्क व लसीचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.विना मास्क प्रवेश करणाऱ्या नागरिकांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी व आपली सुरक्षा जपावी.लस घ्या गिफ्ट मिळवा हा उपक्रम नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करणारा उपक्रम आहे.असे प्रशांत बेडसे-पाटील यांनी शिबीरस्थळी बोलताना सांगितले.





 

नागरीकांनी कोविडच्या नियमाचे पालन करावे यासाठी तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांनी तालुक्यात हे निर्बंध लावले आहेत.तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांनी 28 नोव्हेंबर रोजी कोरोनांच्या नियमासंबधी आदेश काढला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व मंगलकार्यालय,लॉन्स,चित्रपट, सभागृह मालक यांनी कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.सदरच्या कार्यक्रमासाठी 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.तालुक्यातील नागरिकांनी नेहमी मास्क परिधान करावे.जेथे शक्य असेल तेथे सामाजिक अंतर ठेवावे.साबणाने किंवा सँनिटायझरने हात स्वच्छ धुवावेत. हात न धुता नाक,डोळे,तोंड यांना हाताचा स्पर्श करणे टाळावा.खोकताना टिश्यू पेपर किंवा रुमलाचा वापर करावा.सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.कोणताही स्पर्श न करता नमस्कार व अभिवादन करावे.

कोवीड नियमाचे पालन न करणाऱ्यावर ही होणार कारवाई

कोवीड नियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.दुकानदार मंगलकार्यालय, लॉन्स,सभागृह याठिकाणी येणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान करणे आवश्यक आहे.मास्क नाही वापरल्यास दंड आकारण्यात येणार आहे.कर्तव्यात कसूर केल्याने संबंधित मालकांना 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.तसेच एखाद्या संस्थेने नियमाचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.तालुक्यातील सर्व दुकानदार मंगलकार्यालय, सभागृह,चित्रपट मालक यांच्याकडील कामगारांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावे.असे आदेशात म्हटले आहे.

लस घेणाऱ्या साठी फ्रीज,एलईडी,मिक्सर,कुकर अशी एक लाख रुपयांपर्यंतची देण्यात येणार बक्षिसे

लसीकरण शिबिराचे आयोजक बोलताना म्हणाले की,लसीकरणाच्या बाबतीत नागरिकांत अनेक गैरसमज पसरले आहेत.आपल्याला काहीतरी त्रास होईल या भीतीपोटी मोजकेच नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण शिबिरात सहभागी व्हावे,यासाठी सिद्धनागेश उद्योग समूह व मोहोळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लस घ्या, गिफ्ट मिळवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाला तालुका आरोग्य विभाग व मोहोळ नगर परिषदेचे सहकार्य लाभत आहे.नागरिकांना लसीकरणासाठी आकर्षित करण्यासाठी ही अनोखी पद्धत अवलंबली आहे.लस घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्राचे कुपण देण्यात येणार आहे.या लकी ड्रामध्ये फ्रीज,एलईडी, मिक्सर,कुकर अशी एक लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.आम्ही हे सर्व सामाजिक बांधिलकी म्हणून करीत आहोत.त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना ओमीक्रोनचा धोका कमी:मुख्याधिकारी योगेश डोके

गेल्या काही दिवसांपासून ओमीक्रोनचा धोका महाराष्ट्रासह भारतात वाढत आहे.संशोधना अंती असे सिद्ध झाले आहे की, ज्या व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत,त्या व्यक्तींना ओमीक्रोनचा धोका कमी प्रमाणात आहे.मोहोळ नगर परिषदेचा मुख्याधिकारी या नात्याने मोहोळ मधील नागरिकांना अवाहन करतो की,नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस लवकरात-लवकर घ्यावेत व प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती असे आवाहन मुख्याधिकारी योगेश डोके यांनी नागरिकांना केले आहे.

तालुक्यात 71 टक्केच लसीकरण : तालुका वैद्यकीय अधिकारी अरुण पाथरूटकर

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना तालुका वैद्यकीय अधिकारी अरुण पाथरूटकर यांनी सांगितले की,सिद्धनागेश उद्योग समूह व मोहोळ पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहोम आयोजित करण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यात आरोग्यधिकारी शितलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.मोहोळ तालुक्यामध्ये एकूण लोकसंख्या 3 लाख 3 हजार 37 आहे.त्यातील 18 वर्षाच्या पुढील 2 लाख 22 हजार 671 नागरिक लसीचे लाभार्थी आहेत.या सर्व नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेणे आवश्यक आहे.पहिल्या डोसचे लसीकरण तालुक्यात 71 टक्केच झाले आहे.तर द्वितीय डोसचे लसीकरण तालुक्यात फक्त 23 टक्केच झाले आहे.पूर्ण लसीकरणात लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे.नागरिकांना आवाहन करतो की, लसीकरण शिबीर सुरू असून त्यात नागरिकांनी लसीचा डोस घ्यावा.सिद्धनागेश उद्योग समूहाच्या मालकांनी लस घ्या गिफ्ट मिळवा ही अभिनव उपक्रम चालू केला आहे.यामध्ये नागरिकांना 4 प्रकारची बक्षिसे देण्यात येणार आहेत.जे नागरिक लस घेणार आहेत.त्यांना कुपण देण्यात येणार आहे. ही मोहीम 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत असणार आहे.ग्रामीण भागातील व मोहोळ शहरातील नागरिकांनी संपूर्ण कुटूंबाचे लसीकरण करून घ्यावे.कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हा एकच उपाय आहे.त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी.असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.




 

Full View

Tags:    

Similar News