COVID-19 Vaccine : Pfizerचा तिसरा बुस्टर डोस, डेल्टावर प्रभावी असल्याचा दावा
कोरोनाच्या डेल्टा व्हेरायन्टमुऴे सध्या सगळ्या जगाची चिंता वाढली आहे. पण आता यावर उपाय सापडल्याचा दावा Pfizer कंपनीने केला आहे.;
कोरोनोवरील अनेक लसींची निर्मिती जगभरात करण्यात आली आहे. तसेच लसीकरणालाही सर्वच देशांमध्ये वेग आला आहे. पण कोरोनाच्या बदलत्या रुपांमुळे संपूर्ण जगाच्या चिंतेत भर पडली आहे. यामध्ये डेल्टा व्हेरायन्ट हा सध्या सगळ्यात मोठा धोका समजला जातो आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लस या डेल्टा व्हरायंटवर उपयुक्त आहेत की नाही याबाबतचे निष्कर्ष अजून समोर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आली आहे.
कोरोनावरील लस निर्मिती करणाऱ्या Pfizer कंपनीने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे Pfizer कोरोनवरील लसीच्या तिसऱ्या बुस्टर डोसला मंजुरी देण्याची विनंती केली आहे. Pfizer and BioNTech यांनी केलल्या दाव्यानुसार लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी तिसरा बुस्टर डोस घेतला तर कोरोनाच्या विविध व्हेरायंटविरुद्ध मोठ्या प्रमाणात शरिरात प्रतिकारशक्ती निर्माण होते.
बुस्टर डोससंदर्भातील प्राथमिक संशोधनातून ही माहिती समोर आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. Pfizer ची लस 95 टक्के परिणामकारक असल्याने रुग्ण गंभीर होत नाहीत, तसेच ब्रिटन आणि इस्त्रायलमध्ये मध्ये ही लस घेतल्यानंतर 6 महिन्यांमध्ये नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार मायकेल डोलस्टेन यांनी दिली आहे. त्यामुळे आता कंपनीने तिसऱ्या बुस्टर डोससाठी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे यासंदर्भातील परवानगी मागितली आहे. कंपनीतर्फे तिसऱ्या डोसच्या निष्कर्षांची आणखी माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तिसऱ्या डोसमुळे कोरोनाच्या विविध रुपांविरुद्द लढण्यासाठी शरिरात अँटीबॉडीज अनेक पटींनी वाढल्याचे संशोधनातून समोर आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.