Covid Vaccine- दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचा डोस घेतल्यास अधिक फायदा, ऑक्सफर्डचे संशोधन

Update: 2021-06-29 02:34 GMT

कोरोनावरील लसीकरणाला संपूर्ण जगात वेग आलेला आहे. यातच आता दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे डोस घेतले तर त्याचा अधिक फायदा होऊ शकतो का यावर संशोधन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. एकाच कंपनीच्या लसीचे डोस घेण्याऐवजी AstraZeneca आणि Pfizer या लसींचे डोस घेतल्यास त्यामुळे प्रतिकारशक्ती अधिक वाढते, असा निष्कर्ष ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञानी केलेल्या संशोधनातून समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 4 आठवड्यांच्या अंतराने AstraZeneca आणि Pfizer या लसीचे एकेक डोस दिल्यानंतर कोरोनाविरोधात शरिरात अधिक अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नियतकालिकाच्या वेबसाईटवर यासंदर्भातले माहिती देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि या संशोधनाचे प्रमुख प्रा. मॅथ्यू स्नेप यांनी सांगितले की AstraZeneca आणि Pfizer या दोन वेगळ्या लसींचे एकेक डोस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती चांगली वाढली आहे. तसेच या दोन लसींमध्ये 4 आठवड्यांचे अंतर ठेवण्यात आले होते. त्यामुळे इथून पुढच्या काळात जगभरात लसीकरण करताना या दोन लसींचा वापर करता येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

Tags:    

Similar News