विषाणूच्या नव्या अवताराचे नवे आव्हान: मुख्यमंत्री
कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.;
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते.
याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सूचना स्वीकारल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला कुणाचीही रोजीरोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने हि साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊत यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावे.
आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र – करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई आयसीयुचा उपयोग कसा करता येईल तेही पाहतो आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पाहावा व वस्तुस्थिती मांडावी.
या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर, टेलीमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे, वारंवार जनतेशी संवाद साधणे अशा विविध सूचना देण्यात आल्या.