इराण मध्ये दोन मिनिटाला एकाचा मृत्यू, तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार आहोत का?
जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. इरानमध्ये कोरोनाने दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. त्यामुळं कोरोनाचं संकट संपलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तयार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्या संदर्भात आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची संयुक्त बैठक पार पडली आहे.
काय झालं बैठकीत?
राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे पीएसए प्लांट महिनभरात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे. त्याच बरोबर ऑक्सिजन साठवणुक करण्याची क्षमता वाढवावी. अशा सूचना मंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या.
राज्यात सध्या सुमारे २००० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे ३५० पीएसए प्लांट असून त्यातील १४१ पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. राज्यातील ५० खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पीएसए प्लांट बसविण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील किती खासगी रुग्णालयांनी प्लांट बसविले आहेत. याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यावा. असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्धतेची क्षमता कळू शकेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
ऑक्सिजन प्लांट मधून गळती होऊ नये यासाठी उत्पादकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशा सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या आहेत.