मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने तिसऱ्या लाटेची शक्यता मांडत होते आणि राज्यातील जनतेला निर्बंध पाळण्याचे आवाहन करत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्याने कोरोना बाधितांची दोन आकडी संख्या पुन्हा गाठली आहे. ही धोक्याची घंटा असून जिल्हा नागपूर तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक आहे. अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री डॉ. नितीन राउत यांनी दिली.
नागपुर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येणार आहेत.
आढावा बैठकीत पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेवून सध्या मेडिकलमध्ये दोनशे खाटा कोविडसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपुर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
या बैठकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने आवश्यकता नसताना घराबाहेर पडत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी उत्सव, सण, कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी नियंत्रित करणे अत्यावश्यक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत. अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे. असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना त्यांनी केली. सध्या रात्री दहापर्यंत असलेल्या हॉटेल्सच्या वेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले.
प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.