नियम पाळा, नाही तर पुन्हा लॉकडाऊन अटळ
महाराष्ट्रात कोरोना चे संकट कमी होत असताना पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अतिउत्साही लोकांच्या निष्काळजीपणाला आवर घालून नियम पाळायला हवेत, याची आठवण आज सामना संपादकीय मधून देण्यात आली आहे.;
महाराष्ट्रात कोरोनाचा भस्मासुर पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. हे चित्र चिंताजनक आणि गंभीर आहे. मुंबईसह राज्यभरात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असे सुखद चित्र निर्माण झाले होते. दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली होती. मात्र आता ती पुन्हा वाढू लागली आहे. सोमवारी एकाच दिवसात राज्यात 3 हजार 365 नवीन कोरोना बाधित आढळले. 23 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतही परिस्थिती वेगळी नाही. 300 ते 325 एवढी खाली आलेली कोरोनाग्रस्तांची दैनंदिन संख्या गेल्या आठवडय़ापासून चढत्या भाजणीने वाढू लागली आहे. एका आठवडय़ात हा आकडा दुप्पट म्हणजे सहाशेपर्यंत नोंदविला जात आहे.
म्हणजे महाराष्ट्रात रोज चार हजारांच्या तर मुंबईत सहाशेच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची भर पडत आहे. त्यामुळेच राज्य सरकारला कोरोना नियम आणि निर्बंधांची जाणीव जनतेला पुन्हा एकदा कठोर शब्दांत करून देणे भाग पडले आहे. नियम पाळा, नाही तर पुन्हा लॉक डाऊन अटळ ठरेल, असा इशारा तर खुद्द राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिला आहे. तो जनतेनेही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. लॉक डाऊन हा सर्वात शेवटचाच पर्याय आहे हे खरेच, पण तो लागू करण्याची वेळ सरकारवर येणार नाही याची जबाबदारी जनतेचीदेखील आहेच. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट
मुंबई-महाराष्ट्रात येऊ द्यायची की तिला थोपवायचे याचा विचार जनतेलाही गंभीरपणे करावा लागेल. कोरोनाच्या एका लाटेचा तडाखा सर्वांनीच अनुभवला आहे. त्याचे मानवी आरोग्यावर, कुटुंब व्यवस्थेवर झालेले गंभीर परिणामही पाहिले आहेत. देशाची आणि जनतेची आर्थिक घडी कशी विस्कटली, ती अद्यापि कशी सावरली गेलेली नाही हे सर्वांना माहीत आहे. अपरिहार्य लॉक डाऊनचे 'ऑफ्टर शॉक्स' आजही सगळे सहन करीतच आहेत. सुदैवाने कोरोना संकटावर एकमात्र उपाय असलेली लसदेखील आता उपलब्ध झाली आहे. या लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला आहे.
आता दुसऱया टप्प्याची सुरुवात होण्याची वेळ आहे. मात्र अशा वेळी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढू लागली आणि कोरोनाच्या दुसऱया लाटेचे वादळ घोंघावू लागले तर कसे व्हायचे? सरकारी प्रयत्न आणि जनतेने घेतलेली खबरदारी या दोन्ही गोष्टींची परिणामकारक अंमलबजावणी राज्यात झाल्यानेच कोरोना आटोक्यात येऊ शकला आहे. मात्र कोरोना निर्बंधांचे जोखड भिरकावून द्यावे असा त्याचा अर्थ नाही. त्यातून कोरोनाचे भूत पुन्हा मानगुटीवर बसल्याशिवाय कसे राहील? निर्बंध पाळले तर कोरोना दूर राहतो, निर्बंधांची ऐशी की तैशी झाली की तो हल्ला करतो हे साधे गणित आहे. कोरोनाचे आटोक्यात येणे आणि आता त्याने पुन्हा डोके वर काढणे या दोन्ही अनुभवांचा विचार जनतेने गंभीरपणे करायला हवा.
पुन्हा यात नवे ओझे काहीच पेलायचे नाही. जी खबरदारी आपण सर्व मागील दहा- अकरा महिन्यांपासून घेत आलो आहोत. त्याचेच पालन कसोशीने करावयाचे इतकेच. कोरोना कमी झाला, त्याचे हायसे वाटणे समजण्यासारखे आहे. आधी असलेली त्याची प्रचंड भीती काही प्रमाणात कमी झाली, यातही फार वावगे नाही. मात्र त्यामुळे अनेकांच्या वागण्या-बोलण्यात जो सैलपणा आला आहे, कोरोना नियम आणि निर्बंधांबाबत जी ढिलाई आली आहे. त्याला चाप लावावाच लागेल. बहुसंख्य जनता आजही कोरोना निर्बंधांचे पालन करीत आहेच, प्रश्न आहे तो काही बेपर्वा जनांचा. त्यांच्या बेपर्वाईमुळेच मुंबई-महाराष्ट्रात जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते ती काय, अशी भीती निर्माण झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या झपाटय़ाने वाढणाऱया संख्येने याच धोक्याचा इशारा दिला आहे.
त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कोरोनाच्या आव्हानाला तोंड देत आपण 'पुनश्च हरिओम'चा नारा दिला. लॉक डाऊनमुळे झालेले नुकसान टप्प्याटप्प्याने 'अनलॉक' केल्याने भरून निघत आहे. अशा वेळी केवळ काही अतिउत्साही मंडळींच्या निष्काळजीपणामुळे 'पुन्हा कोरोना'चे भय निर्माण होऊ नये. सरकार आपल्या परीने योग्य उपाययोजना करीतच आहे, जनतेनेही बेफिकिरी टाळायला हवी. आवश्यक खबरदारी कटाक्षाने घ्यायला हवी. कोरोनाने पुन्हा वर काढलेले डोके पूर्णपणे ठेचण्यासाठी एवढे करावेच लागेल. तेवढी खबरदारी घेण्याची हीच योग्य वेळ आहे असं सामना संपादकीय मधून स्पष्ट करण्यात आला आहे.