केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ ; नियोजनाअभावी नागरिक त्रस्त
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर कुपन वाटपात वसीलेबाजी होत असल्याचा आरोप करत नागरिकांचा एकच गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ लसीकरण केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांच्या मधस्थीनंतर वातावरण शांत झाले.;
कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आज दोन लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होतं. आज सकाळपासूनच दोन्ही लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा होत्या. मात्र, महापालिकेकडून नियोजनाचा अभाव या ठिकाणी दिसून आला. नागरिकांनी रात्री अकरा वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र, नियोजनाअभावी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
पहिल्या व दुसरे डोसचे दीड हजार कुपन वाटल्यानंतर कुपन वाटप बंद करण्यात आले. त्यामुळे आठ तास ताटकळत उभे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत लसीकरण केंद्रात एकच गोंधळ घातला. शेकडोंच्या संख्येने नागरिक अत्रे रंग मंदिरात जमा झाले होते.
रांगेत असलेल्या दोनशे नागरिकांना देखील कुपन दिले नसताना बाराशे कुपन संपतात कसे, उर्वरित कुपन परस्पर वाटले जातात का? ज्यांचा वशिला आहे त्यांनाच लस मिळते का? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ घातला.दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण शांत झाले.
दरम्यान महानगरपालिकेने लसीचा तुटवडा असल्याचे सांगत जेवढ्या लसी येतील त्याची फलकावर माहिती देणार असल्याचे सांगून नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन मुख्य आरोग्य अधिकारी अश्विनी पाटील यांनी केले.