Covid19: गर्दी टाळण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखा, पंतप्रधान मोदी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांची मागणी

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रासह ६ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांपुढे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.

Update: 2021-07-17 03:19 GMT

मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना लोकांची वाती गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. त्यासाठी धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण तयार करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

दुसऱ्या लाट अद्याप संपलेली नाही. रुग्ण संख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्राच नाही तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडताहेत, गर्दी करताहेत रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरु झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करते आहेच पण केंद्रीय पातळीवरून देखील आपल्याला काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

राज्याला जास्त डोस देण्याची मागणी

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मिळून ८ ते १० जिल्ह्यांमध्ये अद्यापही कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी नागरिकांना दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या ८७.९० लाख डोस इथे दिले आहेत. त्यामुळे जादाचे ३ कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

Tags:    

Similar News