कोरोना विषाणूच्या सातत्याने होणाऱ्या म्युटेशनमुळे कोरोनाविरोधातली लढाई कठीण होत आहे. कोरोनाचे नवे म्युटेशन डेल्टा प्लस हा सर्वाधिक धोकेदायक असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव, रत्नागिरीसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने आता तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहे. राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यापैकी केवळ एका 80 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तेसुद्धा कोमॉर्बिड होते.
त्यामुळे नागरिकांनी काळजी न करता कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लागण झालेल्या 21 रुग्णांपैकी कुणाचे लसीकरण झाले होते का, लसीकरणानंतरही कुणाला लागण झाली आहे का याची माहिती अद्याप मिळालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. रुग्ण जास्त नसले तरी शोध सुरु आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यामधले १०० नमुने घेऊन त्यांचा अभ्यास केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुन्हा लॉकडाऊन होऊ शकते का याबद्दल मात्र टोपे यांनी माहिती दिलेली नाही, पण नागरिकांनी खबरदारी पाळला नाही तर अडचणी वाढू शकतात असे सांगत संकेत मात्र दिले आहेत.
कोरोनाचा नवा अवतार डेल्टा प्लस का धोकादायक आहे?
1. डेल्टा प्लसचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरतो
2. डेल्टा प्लसचे परिणाम फुफ्फुसांवर खूप जास्त प्रमाणात होतात.
3. डेल्टा प्लसची लागण झाल्यास शरिरात अँटीबॉडी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.
या सर्व परिस्थितीचा विचार करता राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निर्बंध शिथिल करताना ज्या लेव्हल ठरवण्यात आल्या आहेत आणि जे निकष ठरवण्यात आले आहेत, त्याबद्दलचे सुधारित आदेशही सरकारने जारी केले आहेत.