विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे ?

Update: 2019-05-04 13:24 GMT

गेली चार वर्षे सत्ताधारी भाजपाला शिव्या देणा-या कॉंग्रेस राष्ट्रवादीचे विधानसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून पद सांभाळणा-या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद रिक्त झाले असून या पदावर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू असतानाच हे पद आता कॉंग्रेसकडे राहणार नाही, असे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केल्याने आता या पदावर आपसुकच राष्ट्रवादीचा दावा राहणार आहे.

लोकसभा निवडणूक उमेदवारीच्या नाट्यावरून कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने संतापून भाजपात गेलेल्या सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी अखेर विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा देवून राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यासह कॉंग्रेस हायकमांडवरही नाराजी व्यक्त केली. त्यांचा राजीनामा अद्याप अधिकृतरित्या मंजूर झाला नसला तरी आता हे पद रिक्त आहे.

या पदावर कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी चार ते पाच महिन्यांसाठी या पदावर काम करण्यास कुणी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नितेश राणे, कालिदास कोळंबकर आणि आता विखे पाटील यांनी पक्षाला जवळपास रामराम केल्याने सदस्यसंख्या ३ आमदारांनी घटणार आहे.

त्यातच तीन आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. जर हे आमदार निवडून आले तर ही संख्या आणखी तीनने घटणार असल्याने सदस्यासंख्या ३६ आमदारांवर येईल, अशा स्थितीत राष्ट्रवादीकडे ४१ सदस्यसंख्या असल्याने विरोधीपक्ष नेतेपदावर आपसुकच त्यांचा दावा राहणार आहे. तसे झाल्यास विरोधीपक्षनेते म्हणून एका अधिवेशनासाठी अजित पवार किंवा जयंत पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Similar News