हे वागणं 'सेक्युलर' नव्हे, संजय राऊतांचे काँग्रेसला चिमटे
औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केला आहे. पण शिवसेना मात्र नामांतरावर ठाम आहे. संजय राऊत यांना आपल्या सामनामधल्या रोखठोख या स्तंभामधून काँग्रेसला जोरदार चिमटे काढले आहेत. यामुळे महाविकास आघाडीत नामांतरावरुन मतभेद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
औरंगाबाद किंवा उस्मानाबादच्या नामांतराच्या मुद्द्याला आपण महत्त्व देत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे तसेच या मुद्दयावरुन सरकारमध्ये मतभेदसुद्धा नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसला चिमटे काढत इतिहासाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.
संजय राऊत यांनी काय म्हटले आहे ते पाहूया...
"औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारातच छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढय़ाचे नेतृत्व आधी छत्रपती शिवाजीराजांनी व नंतर छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यामुळे सच्च्या मर्हारटी व कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचे कारण नाही. मराठवाडय़ातील सरकारी कागदोपत्री 'औरंगाबाद' नामे असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे 'सेक्युलर' पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल.
म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोध करणारे उपस्थित करीत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच. औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे अजिबात नव्हता. तो मोगल शासक आणि आक्रमक होता. बाबराने जे अयोध्येत केले तेच औरंगजेब महाराष्ट्रात करीत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. औरंगजेबाच्या आदेशावरून महाराष्ट्राचे राजे छत्रपती संभाजी यांना मोगल सरदारांनी हाल हाल करून मारले व त्यांचा छिन्नविच्छिन्न देह पुण्याजवळच्या रस्त्यावर बेवारस अवस्थेत फेकून दिला. त्या प्रसंगाचे वर्णन असे करण्यात आले आहे
तो मर्हावटा, शीख, जाट, रजपूत सगळय़ांचा द्वेष करीत होता. त्याचे संबंध इराण, बुखारा, मक्का, बाल्ख या प्रांतांतील मुसलमान राजांशी होते. त्याला सर्व हिंदू राजांना खतम करून धर्माच्या आधारावर स्वतःची बादशाही निर्माण करायची होती, पण छत्रपती शिवाजीराजांसारखे मोजके योद्धे औरंगजेबाला स्वस्थता लाभू देत नव्हते.
इतिहास पुन्हा वाचा-
महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा 'सेक्युलर' वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता.
औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं 'सेक्युलर' नव्हे!