अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला होणार आहे. त्यासाठी देशभरातून काही व्हीआयपींना निमंत्रण देण्यात येणार आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजीद मेमन यांनी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये अशी भूमिका घेतली आहे. मेमन यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे.
“राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटामुळे सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून उद्धव ठाकरे वैयक्तिकरित्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. पण एका धर्मनिरपेक्ष सरकारचे प्रमुख म्हणून धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणे त्यांनी टाळावे” असे आवाहन मेमन यांनी ट्विटमधून केले आहे.
Uddhav Thakrey is among invitees for bhoomi pujan of Ram Temple. He may participate respecting Covid 19 restrictions in his personal capacity. The head of a secular democracy should refrain from promoting a particular religious activity..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आता संकटाच्या काळात राम मंदिरापेक्षा कोरोना आणि त्यानंतर आर्थिक संकटाकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर माजीद मेमन यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री अयोध्येत जातील असे एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. “ अयोध्या राम मंदिराबाबत शिवसेनेचं भावनिक, धार्मिक आणि राष्ट्रीय नातं आहे. राम मंदिराच्या निर्माणामध्ये शिवसेनेचं कार्य मोठं असल्याने उद्धव ठाकरे भूमिपूजनाला जाणार आहेत” असं राऊत यांनी सांगितल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
हे ही वाचा..
“मग कोरोना कशामुळे जाणार?” राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली
अयोध्या : रामलल्लाची मूर्ती हलवली राम मंदिरासाठी पहिलं पाऊल
राम मंदिराच्या ठिकाणी बौद्ध मंदिर होतं – रामदास आठवले
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सहभागी आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निमंत्रण आल्यास काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.