राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.
सध्याच्या कोरोनाच्या संकट काळामध्ये पोलीस विभाग अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. पण पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील १००% टक्के रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस शिपाई गट-क संवर्गातील २०१९ या भरती वर्षात रिक्त असलेली ५ हजार २९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनाम्यांमुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण सहा हजार ७२६ पदे, त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०० हून अधिक, अशी एकूण १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत.
हे ही वाचा..
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश
दडपणाला बळी पडू नका: मुख्यमंत्री
२०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती साठी ज्यांनी महा आय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल.
पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.