इथं एक बरं असते की, निदान आठ ते नऊ भाषांमधे रिमोट व माहिती उपलब्ध असते. मी पुढं निघाले तशी गणवेशातील स्वयंसेविका पुढं झाली आणि मला लिफ्टकडे जाण्याचा मार्ग तिनं दर्शविला. ही "ला पेद्रेरा" किंवा "कॅसा मिला" गौडिने बांधलेली शेवटची इमारत; साधारण 1906 ते 1912 या काळात. त्यानंतर त्याने स्वतःला पूर्णत "सगारादा फॅमीलीया" च्या बांधकामात झोकून दिले होते ते त्याच्या म्रुत्युपर्यंत!
या इमारतीची सुरुवात उद्योगपती पेरे मिला कम्पस व त्याची बायको रोसेर सेगीमौन यांनी; त्यांना आपल्यासाठी उत्तम असं पण वेगळेपण साधणारं सुरेख असं घरकूल बनवायचे होते. परंतु प्रारंभीक काळात इमारतीवर बरीच टीकेची झोड उठली होती! रोसेर सेगीमोन ही जोसेप गुआरडीओला या गडगंज धनीकाची श्रीमंत विधवा होती. तिचा दुसरा पती पेरे मिला हा डेवेलपर होता. पण त्याच्या भडक, दिखाऊ आणि उधळखोर स्वभावामुळे लोक असं म्हणत की हा रोसेरच्या प्रेमात आहे की गुआरडीओलाच्या विधवेच्या? पहा परदेशात ही लोक आपल्या भारतासारखे बोलतात. सन 1905 मध्ये याने पासे द ग्रॅसीयाच्या कोपऱ्यावर एक टुमदार घर घेतले आणि ते बांधायला गौडिला पाचारण केलं. साधारण दोन फेब्रुवारी 1906 ला महानगरपालिकेकडे सदर इमारतीचा प्रस्ताव सादर केला गेला.
गौडी एक सच्चा क्रिश्तन व वरजिन मेरीचा भक्त असल्याने त्यानं हा मिला एक आध्यात्मिक प्रतिक बनवण्याचे मनोमन ठरवले. परंतु मातेच्या पुतळा उभारण्याची योजना शहराने धुडकावून लावली. नैराश्याने गौडी हा प्रोजेक्ट सोडुन देणार होता, पण प्रिस्टच्या आर्जवाने त्यानं यावर परत कामत सुरु केलं. ही भव्य दिव्य इमारत चक्क 1323 स्क्वेर मीटर प्रत्येक मजला आणि 1620 मीटर स्क्वेर प्लॉटवर उभी आहे. नऊ मजली ही वास्तु निसर्गाशी नाते जोडणारी असुन, भूमीतीचाही वापर इथं केला आहे. दोन इमारती एकत्र सांधुन यात बेसमेंट, ग्राउंड फ्लोर मेजनिन, मुख्य मजला, चार वरचे मजले आणि एक छताखालील खोली बांधली आहे. सम्पूर्ण बिल्डिंग ही एसिमेट्रीकल "8" आकार असल्यासारखी वाटते. याचं मुख्य आकर्षण म्हणजे याचं छत. तिथं इतके सुंदर चिमण्या, पंखे यांची मांडणी आहे की गौडी हा नुसता द्रष्टा नव्हता तर काळाच्या पुढं पाहणारा होता हे जाणवते. इतरत्रही हस्तकलेचा उत्तम नमुना असलेली दरवाजाची कडी, कुलुप, खुर्च्या, खिडक्या, फर्निचर हे आपल्याला गौडीला कुर्नीसात करावयास भाग पाडते. त्यानं बिल्डिंगमध्ये लिफ्टही फक्त दुसऱ्या मजल्यापर्यंत मर्यादित ठेवल्या. कारण लोकानी एकमेकांच्या संपर्कात रहावे असं त्याला वाटे.
मा
क्रमश:...