धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन भाऊ – बहिणीचं राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दोनही नेते एकमेकांसमोर येणार आहेत. नुकताच परळी शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.
बीडच्या पालकमंत्र्यांकडून परळीच्या जनतेची फसवणूक केली जात आहे. 133 कोटी रुपयांचा कामाचा फक्त डीपीआर सॅंक्शन आहे. डीपीआर सँक्शन होणं आणि पैशाची तरतूद होणं. यात फार मोठा फरक आहे. आपल्या परळीच्या तिर्थक्षेत्रासाठी 133 कोटी रुपये आणले म्हणून डिजिटल बोर्ड लावून सांगितलं. मात्र, पैशाची तरतूद फक्त दहा कोटीचे आहे आणि हे जर खोटं असेल तर, "याच व्यासपीठावर परळीकरांच्या समोर त्यांनी यावं आणि मी येतो. मग होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी." असं खुलं चॅलेंज पंकजा मुंडे यांना दिलं आहे.
मी परळीच्या विकासाचा ध्यास घेतला असताना ज्यांच्यावर विकास करण्याची खरी जबाबदारी आहे, त्या भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र विकासात आडकाठी आणण्याचे पाप केले आहे. त्यांच्या या वृत्तीमुळेच परळीच्या महत्वाकांक्षी 110 कोटी रूपयांच्या भूमिगत गटारी योजना व मलनिस्सारण प्रकल्पाला अडीच महिन्यांचा विलंब झाला आहे. मात्र, विकासात आडवे येणाऱ्यांना परळीची जनता मतदानातून यावेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
परळी नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे प्रत्येक विकास कामात अडथळा आणला जातो. त्यासाठी केजच्या आमदाराला पुढे करून लक्षवेधी लावल्या जातात. नगरपालिकेचा निधी बांधकाम विभागाकडे वळवला जातो. अल्पसंख्यांक विभागाचा निधी अडवला जातो. अशा प्रकारचे राजकारण करण्यापेक्षा 10 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री असताना काय कामं केली आणि काय झाले नाही? हे सांगण्यासाठी एकदा खुल्या व्यासपीठावर येऊन चर्चा करा, असे आवाहन त्यांनी दिले.
अडवा-अडवीचे हे राजकारण मला ही करता येवू शकते, वैद्यनाथ बँकेतला भोंगळ कारभार, वैद्यनाथ कारखान्यातील 6 माणसांचा झालेला मृत्यू हे विषय मी काढले असते. तर संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले असते. याची जाणीव करून दिली. मात्र मला कोणाच्या विरोधात लढायचे नाही, विकासाचे राजकारण करायचे आहे. माझी लढाई ही सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी असल्याचा उच्चार त्यांनी केला आहे.
"9 महिने पाणी टंचाई असताना ताईसाहेब तुम्ही कुठे होता ? वैद्यनाथ कारखान्याचे ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले का? वैद्यनाथाचा दर्जा गेला त्यावर काय केले? जायकवाडीचे पाणी परळीसाठी खडक्याला येवू द्यायचे म्हणून अधिकाऱ्याला 18 दिवसांच्या रजेवर पाठवले नाही का? बंद थर्मल पुन्हा सुरू करण्यात खोडा घातला नाही का?" असे अनेक प्रश्न धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केले.
https://youtu.be/b5-PEdKlauQ