'मी भाजपची अडचण समजून घेत युती केली'- उद्धव ठाकरे

Update: 2019-10-07 08:09 GMT

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युतीमधील जागा वाटपावरुन शिवसेनेनं सत्तेत राहण्यासाठी सोयीचा मार्ग निवडल्याची टीका होत आहे. मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीतील जागावाटपाचं स्पष्टीकरण आज केलं आहे.

“युती करताना १२४ जागा घेऊन मी कुठलीही तडजोड केलेली नाही. एकाकी लढायचं असेल तर शिवसेना कधीही लढू शकते. पण मी भाजपची अडचण समजून घेतलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तशी विनंती केली होती. मी त्यांना समजून घेतले.” असं उद्धव ठाकरे यांनी 'सामना ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत युती करताना कमी जागा घेऊन एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातला मोठा भाऊ शिवसेनेला आज छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागली आहे. यावरुन राजकीय चर्चेला ऊत आला असुन शिवसैनिकातही बंडखोरी वाढली आहे.

त्याच अनुषंगानं संजय राऊत यांनी उद्धव यांना प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, 'महाराष्ट्राच्या हितासाठी मी युती केलीय. भाजपला समजून घेतलंय. महाराष्ट्राला हे माहीत आहे. महाराष्ट्र हा काही धृतराष्ट्र नाही,' असं उद्धव म्हणाले.

Similar News