ईव्हीएम मशीनबाबत विरोधकांनी अनेकदा आवाज उठवला होता. वेळोवेळी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनबाबत मोठं वक्तव्यं केलंय.
ईव्हीएम मशीनवरील घड्याळाचं बटन दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे, त्यामुळं मला ईव्हीएम मशीनबाबत चिंता वाटत असल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हैदराबाद आणि गुजरात या राज्यातील काही ईव्हीएम मशीन लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि मला बटण दाबण्यास सांगितलं. त्यावेळी मी ईव्हीएम मशीनमधील घड्याळासमोरचं बटण दाबलं आणि मत कमळाला गेलं, हा संपूर्ण प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, असं शरद पवारांनी सांगितलं. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वच ईव्हीएम मशीनमध्ये असा प्रकार घडला असेल असं आपलं मत नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.