कोरोनाच्या लसीमुळे आजारी पडल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीवर १०० कोटींचा दावा
कोरोनावरील लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पण सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोरोना वरील लसीचा तिसऱ्या टप्प्यातील डोस घेतल्यानंतर आपण आजारी पडलो, असा दावा एका स्वयंसेवकाने केलेला आहे. पण या व्यक्तीचा हा दावा सिरम इन्स्टिट्यूटने खोडून काढला आहे. तसेच खोटा आरोप करणार्या या व्यक्ती विरोधात शंभर कोटींचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील सिरम इन्स्टिट्यूटने दिलेला आहे.
चाळीस वर्षे वयाच्या चेन्नईमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटच्या तिसऱ्या टप्प्यात लसीचा डोस घेतल्यानंतर आपल्याला मेंदूविषयक आणि मानसिक आजार उद्भवल्याचा दावा केलेला आहे. पण सिरम इन्स्टिट्यूटने या व्यक्तीचा हा दावा फेटाळून लावत, त्यांचा त्रास आणि लसीचा कोणताही संबंध नाही असे स्पष्ट केलेले आहे. तसेच त्या व्यक्तीने लस आणि त्याला होणाऱ्या त्रासाचा जोडलेला संबंध खोटा आहे हे देखील आपण सिद्ध करू शकतो असे सिरम इन्स्टिट्यूटने म्हटलेले आहे. दरम्यान डीजीसीआयने यासंदर्भात चौकशीला सुरुवात केलेली आहे.