"मी छोटा पैलवान आहे. पण, मला इतक सोप समजू नका. डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. भलेभले डाव कसे उलथवून लावायचे हे मला माहिती आहे" अशा शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय मल्लांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठीच्या इंदापूर तालुक्यात झालेल्या निवड चाचणीवेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत म्हटलं की, "मी पुण्यात शिवाजी मराठा हायस्कूलला शिकत असताना, तिथे चिंचेची तालीम होती. तिथला मी पण पैलवान आहे. मी छोटा पैलवान आहे. शाळा, अभ्यास करत मी काहीवेळ पैलवानकी केलेली आहे. यासाठी मला घरून खुराख येत होता, मी छोटा पैलवान आहे, मात्र मला इतका सोपा समजू नका, डावाला प्रतिडाव टाकायची माझ्यात ताकद आहे. फक्त मी कधी बोलून दाखवत नाही." असे भरणे म्हणाले.
दरम्यान त्यांच्या या मिश्किल भाष्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान राज्यमंत्री भरणे यांनी उपस्थित पैलवानांना शुभेच्छा दिल्या.