परमबीर सिंग यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचे याचिका फेटाळली

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांना मोठा धक्का बसला आहे.

Update: 2021-03-24 08:08 GMT

गृहमंत्र्यांवर १०० कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयात धक्का बसला आहे. खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या प्रकऱणात झालेले आऱोप-प्रत्यारोप गंभीर आहेत, पण तरीही यासंदर्भात आपण कलम २२६ नुसार हायकोर्टात जाऊ शकता असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

अंटालियाप्रकरणी पोलीस तपासात अनेक चुका झाल्या होत्या, त्यासाठी जबाबदार धऱत राज्य सरकारने परमबीर सिंग यांची बदली मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन गृहरक्षक दलात केली आहे, तसेच हेमंत नगराळे यांना मुंबईचे पोलीस आयुक्त केले. त्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी रुपये खंडणी गोळा करुन आणून देण्याचे आदेश दिले होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच आपली बदली राजकीय हेतूने करण्यात आली होती, असेही परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.

परमबीर सिंग यांची बाजू मांडणाऱ्या मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, आम्ही आजच म्हणजे बुधवारीच हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत. पण या प्रकरणात सीसीटीव्ही पुरावे महत्त्वाचे असल्याने हायकोर्टाने यावर उद्या म्हणजेच गुरूवारीच सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावे अशी मागणी केली. कोर्टान रोहतगी यांचे म्हणणे नोंदवून घेतले आणि हायकोर्टाला आपण तशी विनंती करावी असे निर्देश दिले.

Tags:    

Similar News