Saamana Editorial: राजकीय मनाचा गुंता! नवा साधू वाद!!

Update: 2020-04-30 04:49 GMT

उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे झालेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून चिंता व्यक्त केली. ज्या प्रकारे राज्यात घडलेल्या पालघर घटनेत राज्य सरकारने कठोर कायदेशीर कारवाई केली, त्याचप्रकारे उत्तर प्रदेश सरकारही कारवाई करून दोषींना कडक शिक्षा करेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर संजय राऊत यांनी 'बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन संत साधूंची हत्या झाली आहे. या विषयाचं कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील’ असं म्हणत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी 'उत्तर प्रदेशमध्ये कायद्याचं राज्य आहे. कायदा तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. बुलंदशहर घटनेनंतर काही तासांमध्येच आरोपींना अटक करण्यात आली. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका', असं ट्विट करत योगी आदित्यनाथ यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर हाच धागा पकडत शिवसनेने आजच्या सामनातून योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय आजच्या सामन्यात?

पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही. राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे. उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे.

राजकारणात

गुंतलेले मानवी मन मोठे गमतीचे असते. या गमतीचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे आणि गंमत म्हणून सोडूनही देत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून विझलेल्या कोळशावरील राखुंडी सैरभैर उडावी तसे काही लोकांचे झाले आहे खरे! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक साधू आहेत. त्यांच्या साधुत्वाचा आम्ही नेहमीच आदर केला. महाराष्ट्रात मध्यंतरी दोन साधूंची हत्या जमावाने केली ही अत्यंत दु:खद आणि चीड आणणारी बाब आहे. ज्या गावात ही हत्या झाली ते संपूर्ण गाव भारतीय जनता पक्षाच्या राजकीय अधिपत्याखाली बऱयाच वर्षांपासून आहे, पण अशा प्रसंगात राजकारण नको असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावून सांगितले व 72 तासांत शंभरांवर आरोपींना बेडय़ा ठोकल्या.

या प्रसंगावर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. भगव्या वस्त्रातील साधूंची हत्या होणे ठीक नाही, ही त्यांची चिंता समजण्यासारखी आहे. साधूंचे मन साधूच जाणतो हे खरे, पण पुढच्या दहा दिवसांतच योगी महाराजांच्या राज्यातच बुलंदशहरमधील देवळातच दोन साधू महाराजांची हत्या झाली. महाराष्ट्रातील साधूंचा मृत्यू जमावाच्या मारहाणीत झाला, तर योगांच्या राज्यात साधूंना गळे चिरून मारले. या साधूंच्या हत्येवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन केला व चिंता व्यक्त केली. असे प्रसंग राजकारण करण्याचे नसून गुन्हेगारांना एकत्रित येऊन धडा शिकविण्याचे आहेत. आम्ही तुमच्यासोबतच आहोत, गुन्हेगारांना कठोर शासन तुम्ही करालच, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना एका कळकळीने सांगितले. संपूर्ण

महाराष्ट्राची हीच भावना

आहे. यात कसले आलेय डोंबलाचे राजकारण! पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी योगी महाराजांना फोन करून चिंता व्यक्त केली यातही काही लोकांना फक्त राजकारणाचाच वास येत आहे व त्यांनी असे सांगितले की, बुलंदशहरातील घटना वेगळी व महाराष्ट्रातील वेगळी, तुम्ही तुमचा महाराष्ट्र सांभाळा वगैरे विधाने योगी महाराजांच्या कार्यालयातून केल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणजे महाराष्ट्रात एखादी दुर्घटना घडली की, चिंतेचा माहोल निर्माण केला जातो किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा केला जातो, पण भाजपशासित राज्यात भगवी वस्त्र रक्ताने लथपथ झाली तरी चिंतेची शिंकही कुणी मारायची नाही. भगव्या-भगव्यात व रक्ता-रक्तात फरक करणारे हे मानवी मन गमतीचेच आहे, असे आम्ही म्हणतो ते यासाठीच. बुलंदशहरात जे घडले, त्याआधी दोनेक दिवस इटावा येथे एका ब्राह्मण कुटुंबात पाच जणांची हत्या झाली व त्यातील काहीजण धार्मिक विधी, पूजाअर्चा करून उदरनिर्वाह करणारे होते. म्हणजे तेही एकप्रकारे गरीब साधूच होते, पण बुलंदशहर ते इटावापर्यंत हत्या होऊनही कोणी तेथील मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला नाही.

राज्यपालांच्या घरात बसून अखंड ठिय्या मांडला नाही. शहरी नक्षलवाद्यांचा हा सर्व हैदोस असून सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा इंटरपोलकडे द्यावा, अशी मागणी केली नाही. दिल्लीतून खास हालचाली झाल्या व साधू हत्येबाबत माहिती मागवून राष्ट्रीय गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली, अशी बातमी आमच्या वाचनात आली नाही. महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचे पडसाद मीडियात असे उमटले की, ‘कोरोना’ व्हायरस चार दिवस मागे हटला, पण असा रेटा मीडियातील पोटावळय़ांनी बुलंदशहरातील साधूहत्येबद्दल लावला नाही. तसेच त्यानिमित्ताने कोणा पुढाऱ्याचा उद्धार करून त्यास धार्मिक रंग देऊन पेटवापेटवीचे आंदोलन केले नाही. पत्रकारांवर स्वयंप्रेरणेने हल्ले घडवून, त्याचा तमाशा करून महाराष्ट्राप्रमाणे योगी महाराजांच्या राज्यातही आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाल्याचा बोभाटाही तेथील विरोधी पक्षाने केला नाही. महाराष्ट्रात हे सर्व कसे व कोणी घडवले

ते गंगेप्रमाणे साफ

आहे, पण शेवटी राजकीय मन हे नेहमी थोडे गढूळच असते व त्यांना असे वागावेच लागते. येथे साधुत्वाची वस्त्र व मनही भ्रष्ट होते. कारण शेवटी ते सर्व राजकारणच आहे. द्रौपदीचे वमहरण करणारे हात व ते सर्व पाप सहन करणारे डोळे आपल्या राजकारणात आहेत. त्यांच्या दृष्टीने ‘सत्यमेव जयते’च्या पाट्या या फक्त शोभेसाठीच भिंतीवर लटकवून ठेवल्या आहेत. भगवी वस्त्र व साधूंचे रक्त हे पवित्र आहे. महाराष्ट्रात ते सांडले याचे दु:ख सगळ्यांनाच आहे. पालघरचे साधू हत्याकांड म्हणजे मानवतेला कलंक आहे. असा प्रकार देशात कोठेही घडू नये. म्हणूनच बुलंदशहरातील देवळात साधू हत्या होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. हेसुद्धा माणुसकीचेच लक्षण आहे. आता त्यात कोणाला राजकारण दिसत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पालघर साधू हत्येचे आरोपी पकडले गेले तसे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोपीदेखील अटकेत गेले. कारण दोन्ही राज्ये कायद्याची आहेत. फरक इतकाच की, महाराष्ट्रात विरोधी पक्ष जसा थयथयाट करीत आहे तसे चित्र योगी महाराजांच्या राज्यात दिसत नाही. राजकारणातील मानवी मनाचे हे नवे कंगोरे गमतीचे तितकेच गुंतागुंतीचेही आहेत. जनता गंमत बघत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चेच हसे करून घेत आहे. उत्तर प्रदेशची जनता या खेळास मुकली आहे. बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे.

Similar News