ईडीने राज ठाकरे यांची सुमारे 9 तास चौकशी केल्यानंतर मनसे मध्ये पसरलेला सन्नाटा अद्याप दूर झालेला नाही. निवडणूक लढवायची की नाही याबाबत पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करून पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक अहवाल तयार केला असून हा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे.
अहवाल तयार झाल्यानंतर थेट पत्रकार परिषद घेऊन नंतर तो राज ठाकरे यांना सुपूर्द करण्यासाठी बाळा नांदगावकर जाणार आहेत. राज्यभरात जवळपास 100 जागांवर निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मनसेचे नेते अनधिकृतरित्या सांगत असले तरी ईव्हीएम च्या विरोधात निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यासंदर्भातही पक्षात चर्चा होती. मात्र निवडणूक लढली नाही तर पक्ष विस्कटेल अशी भीती मनसेतल्या सर्वांनाच वाटत आहे.
दरम्यानच्या काळात ईडीने राज ठाकरे यांची केलेली चौकशी यामुळे राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीयोचं कनेक्शनच भारतीय जनता पार्टी ने कापून टाकलं आहे. चौकशी नंतर राज ठाकरे जवळपास कोशात गेले आहेत.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसे कडे आक्रमक नेता आहे, जो इतर विरोधी पक्षांकडे नाही. अशा परिस्थितीत राजकीय पटलावर राज ठाकरे सक्रीय झाले नाही तर निवडणुकीच्या प्रचारात रंगत येणार नाही असं सर्वच राजकीय पक्षांना वाटतंय. आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते, असं असतानाही मनसे मध्ये अद्याप निवडणूक लढायची की नाही याबद्दल निर्णय न झाल्याने पक्षात मरगळ आली आहे.