अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या: राज ठाकरे
अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्या, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;
मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना हटवण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं. असं परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. या पत्रानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणतात… मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. काय आहे प्रकरण सचिन वाझे प्रकरणात राज्यातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिस आयुक्त पदी असणाऱ्या परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. या बदल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात अनेक थक्क करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Prambir Singh) यांना हटवण्यात आल्यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं असून या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ८ पानी पत्रात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान परमबीर सिंग यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे..
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असतानापरमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी केली आहे.
सचिन वाझे प्रकरण नक्की काय आहे?
25 फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक आढळली होती. ही स्फोटक ठेवण्यासाठी वापरलेली गाडी ही मनसुख हिरेन यांची होती. या सर्व प्रकरणाचा तपास करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचे आणि मनसुख हिरेन यांचे संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमध्ये आढळला होता. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता. या संदर्भात मनसुख हिरे यांच्या पत्नीने संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा. अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा. असा माझा संशय आहे. त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली होती. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असणाऱ्या सचिन वाझे यांची CFC विभागात बदली करण्यात आली होती.
त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी एटीएसकडे देण्यात आली. मात्र, अंबानीच्या घराबाहेरील स्फोटकांच्या चौकशीचे प्रकरण एटीएसकडे असताना एनआयएने हे प्रकरण स्वत:कडे घेतले. त्यानंतर त्यांनी सचिन वाझेची चौकशी केली. या चौकशी नंतर सचिन वाझेला अटक केली. वाझे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने वाझे यांना 25 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाझेंना पोलिस कोठडी सुनावल्यानंतर चौकशी दरम्यान वाझे यांनी मोठे खुलासे केले असल्याचं एनआयए ने म्हटलं आहे.