Parliament session: शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या NRI चा विमानतळावर छळ करण्यात आला का? खासदाराने विचारलेला प्रश्न सरकारने वगळला
सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांनी उपस्थित केलेला प्रश्न वगळण्यात आला आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय NRI चा विमानतळावर छळ करण्यात आला होता का? अधिकाऱ्यांनी त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊ नये. असे सांगितले होते का? असा सवाल विचारण्यात आला होता.
हा प्रश्न अंतिम यादीत आला ही होता. मात्र, ऐनवेळी काढून टाकण्यात आल्याचं काॅग्रेसचं म्हणणं आहे. हा प्रश्न स्वीकृत प्रश्नांच्या तारांकित/अतारांकित डायरी क्रमांक U455 मध्ये विचारण्यात आला होता.परराष्ट्र मंत्र्यांना काँग्रेसचेच विचारलेल्या प्रश्नात भारताबाहेर स्थायिक झालेल्या अनेक NRI भारतीयांचा विमानतळांवर छळ करण्यात आला आणि त्यांना परत पाठवण्यात आले, ही वस्तुस्थिती आहे का ? असा सवाल करण्यात आला होता.
यासोबतच असं देखील विचारण्यात आले होते की, जर उत्तर होय असेल तर गेल्या तीन वर्षातील संपूर्ण तपशील काय आहे? तसंच या NRI पैकी काही लोकांना तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मदत करू नये असे अधिकाऱ्यांनी सांगितले हे खरे आहे का? जर उत्तर होय असेल तर कृपया तपशील द्या.
दरम्यान, या सर्व प्रश्नांची उत्तरे परराष्ट्र मंत्रालयाला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी द्यायची होती. या संदर्भात Indian express ने दिलेल्या वृत्तानुसार केसी वेणुगोपाल यांनी विचारलेल्या प्रश्नां संदर्भात सर्व प्रश्नांची माहिती घेण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातील संबंधित विभागांना 23 नोव्हेंबर रोजी एक मेल देखील पाठवण्यात आला होता. मात्र, वेणुगोपाल यांच्या या प्रश्नांना स्थान देण्यात आले नव्हते.
दरम्यान, त्यांचे हे प्रश्न यादीतून बाहेर काढल्याबद्दल काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले आहे की, यापूर्वी प्रत्येक प्रश्न वगळण्यातं स्पष्ट कारण दिले जायचे. मात्र, यावेळी त्यांनी केवळ मौखिक कारण दिले आहे.
ते म्हणाले की, फक्त हाच प्रश्न नाही तर जालियनवाला बागच्या जीर्णोद्धाराबाबत उपस्थित केलेला माझा एक प्रश्न देखील यादीतून काढून टाकण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही सदस्याला प्रश्न विचारण्याचा आणि सरकारकडून माहिती घेण्याचा अधिकार आहे, असे म्हणत, हे देशविरोधी नाही का? असा सवाल वेणूगोपाल यांनी उपस्थित केला आहे. तसेच, कोणतेही प्रश्न आणि वादविवाद न करता संसद चालवण्याची ही वृत्ती अगदी हुकूमशाही आहे. हे खासदारांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.