गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर पर्रिकरांचे चिरंजीव उत्पाल यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केलीय.
पर्रिकरांच्या मुलानं लिहिलेल्या इंग्रजीतल्या पत्राचा मराठी अनुवाद
आदरणीय शरद पवार साहेब, तुमचं वक्तव्य ऐकून मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसलाय. राजकारणासाठी आणि निराधार दाव्यांसाठी माझ्या वडिलांचं नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे. माझे वडील जिवंत असताना आणि ते आजाराशी लढत होते तेव्हाही एका नेत्याने स्वार्थाच्या राजकारणासाठी त्यांचं नाव मध्ये ओढलं होतं. त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांच्याच शब्दात त्याला उत्तर दिलं होतं.
पवार साहेब, एक ज्येष्ठ नेता म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. पण, आता तुम्ही हे वक्तव्य केलंच आहे, तर मला काही तथ्य तुमच्यासमोर आणायची आहेत. माझे वडील दिल्लीत असो किंवा गोव्यात, त्यांनी प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. संरक्षण मंत्री असतानाही त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले, जे कायम स्मरणात राहतील आणि राफेल विमानांचा व्यवहार त्यापैकीच एक आहे.
यानंतर जेव्हा गोव्याच्या जनतेने पर्रिकरांना पुन्हा गोव्यात आणण्याची मागणी केली, तेव्हा पर्रिकरांनी जनतेच्या भावना लक्षात घेत पुन्हा राज्यात येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत गोव्यातील जनतेची सेवा केली. त्यामुळे ते राफेल व्यवहारामुळे गोव्यात आले हे म्हणणं हा पर्रिकर आणि गोव्यातील जनता यांच्या प्रेमाचा अपमान आहे. एक माजी संरक्षण मंत्री म्हणून तुम्हालाही अनेक गोष्टी माहिती आहेत, पण तुम्ही चुकीच्या माहितीला बळी पडून याचं राजकारण करत आहात.
एक आणखी वाईट वाटतं की ज्याने माझे वडील जिवंत असताना आणि आजाराशी लढा देत असताना साधी विचारपूसही केली नाही, त्याच्याकडूनच वडिलांचं नाव स्वार्थाच्या राजकारणासाठी वापरलं जातंय. आमचं कुटुंब, गोव्याची जनता दुःखामध्ये आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की अशा कृत्यापासून दूर राहा.