देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी महाराष्ट्राचे(Maharashtra) मुख्यमंत्री (CM) म्हणून आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. मात्र, अजित पवार यांच्या सोबत शपथविधीला गेलेल्या 10 ते 12 आमदारांपैकी संध्याकाळ पर्यंत बहुतांश आमदार पुन्हा एकदा स्वगृही परत आले. शरद पवारांनी आपलं कसब वापरुन हे आमदार परत आणले.
मात्र, या संदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना,(Shivasena) कॉंग्रेस (Congress) असा प्रवास करत सध्या भाजपमध्ये(BJP) गेलेल्या नारायण राणे (Naryan rane)यांनी "राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांनी फसवून आपल्याला राजभवनात नेलं असं म्हणत आहेत. ते काय लहान आहेत का 10-12 वर्षांचे की फसतील? मी त्या सर्व आमदारांना ओळखतो, आम्ही सोबत कामही केलयं. 1 ते 2 आमदार गेले म्हणून फरक पडत नाही, बाजारात आणखी बरेच आमदार आहे. काही येणारे आहेत, काही सीमेवर आहेत, त्यामुळे काही फरक पडत नाही." असं वक्तव्य एका वृत्तवाहिनीला दिलं आहे.
त्यामुळं महाराष्ट्रात आमदारांचा बाजार भरला आहे का? जर आमदारा पैशाने खरेदी केले जात असतील तर, राज्यात लोकशाही शिल्लक राहीली आहे का? जर पैशाने आमदार खरेदी करता येत असतील तर आपण येथे लोकशाही नांदत आहे. असं म्हणू शकतो का?
खरं तर असं म्हणण्याची हिम्मत दाखवणाऱ्या या नेत्यांकडं आमदार खरेदी करण्यासाठी इतके पैसे कुठून येतात? हा लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे का? लोकांनी मतदान केलेल्या आमदारांना अशा पद्धतीने खरेदी करणं म्हणजे लोकांच्या विश्वासाला तडा देण्यासारखं आहे. पर्यायाने लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे.
याच लोकशाहीने माळशिरस येथून राम सातपुते आणि विदर्भातील वरुड मोर्शी येथून देवेंद्र भूयार या सारख्या शेतकऱ्यांची मुलं विधानसभेची पायरी चढू शकले असते का? राज्यातील सर्वात गरीब आमदार असलेले डहाणू मतदार संघातील माकपचे आमदार विनोद निकोले कोणत्या पैशावर निवडून आले आहेत?
या सर्व बाबी बाजूला ठेवल्या तरी, राणेजी तुम्ही ज्या सत्ता बाजाराची भाषा करत आहात. हीच भाषा तुम्ही राजकारणात येण्यापुर्वी केली असती तर नारायणा राणेंसारखा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता का?