नवी दिल्ली // जगभरातील बहुतांश देशांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने शिरकाव केला असून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. WHO ने म्हटले आहे की, ओमिक्रॉन बहुधा बहुतेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि अभूतपूर्व वेगाने पसरत आहे. भारतातही ओमिक्रॉनची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. फक्त आफ्रिकन देशांमध्येच नाही तर अमेरिका, युरोपमध्ये देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.
भारतात आत्तापर्यंत ओमिक्रॉनची 57 प्रकरणे समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडोनम गेब्रेयसस म्हणाले की, आम्ही कोरोनापूर्वी कोणत्याही प्रकाराचा एवढा उच्च वेग पाहिला नाही.
यूएन एजन्सीने आधीच सांगितले आहे की , कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये ओमिक्रॉन लवकरच डेल्टा प्रकाराला मागे टाकू शकतो.
कोरोनाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत ओमिक्रॉनला अत्यंत संसर्गजन्य घोषित करण्यात आले आहे. मात्र, यात रुग्णालयात दाखल किंवा मृत्यू झाल्याची फारच कमी प्रकरणे समोर आली आहेत. ओमिक्रॉनच्या बहुतेक रुग्णांमध्ये फारच कमी किंवा कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.
ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत अनेक देशांनी आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर सर्व निर्बंध घातलेत. भारताने विमानतळावर येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी आरटीपीसिआर चाचणी अनिवार्य केली आहे. ओमिक्रॉन प्रकाराचे निकाल येईपर्यंत कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीला विलीगिकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन अनेक देशांनी आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, या प्रकाराविरूद्ध बूस्टर डोस किती प्रभावी असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
टेड्रोस म्हणाले की, डब्ल्यूएचओ बूस्टर डोस देण्याच्या विरोधात नाही. मात्र,लसीकरणाबाबत असमानता चिंताजनक आहे. सोबतच केवळ लस कोणत्याही देशाला या संकटातून वाचवू शकत नाही. देशांनी ओमिक्रॉन प्रकाराचा प्रसार थांबवला पाहिजे. 41 देशांमध्ये, अद्याप लसीकरण पात्र लोकसंख्येच्या 10% पर्यंत पोहोचलेले नाही. तर 98 देशांमध्ये ते अद्याप 40 टक्क्यांपर्यंत पोहोचलेले नाही.त्यामुळे सर्वच देशांनी लसीकरणावर भर देणं गरजेचं आहे.