कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. कोट्यवधी गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाची सोयसुद्धा सर्व राज्यांमध्ये केली गेली आहे. पण रस्त्यांवर फिरणाऱ्या आणि मिळेल ते खाणाऱ्या भटक्या प्राण्यांचे या लॉकडाऊनच्या काळात मोठे हाल होत आहेत. या प्राण्यांना खाण्यासाठी काहीही मिळत नसल्याने ओडिशामध्ये अशा भटक्या प्राण्यांच्या खाण्यासाठी राज्य सरकारने मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शहरी भागातील भटके कुत्रे आणि इतर प्राण्यांच्या खाण्याची सोय करण्यासाठी हा निधी सर्व महापालिका, नगरपालिकांना वितरीत केला जाणार आहे. याआधीसुद्धा ओडिशा सरकारने भटक्या प्राण्यांच्या खाण्याची सोय करण्यासाठी ५४ लाखांचा निधी दिला होता.