केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. येत्या २१ ऑक्टोबरला दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यासोबत वेगवेगळ्या राज्यातल्या ६४ पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा निवडणूक आयोगाने केलेली नाही.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणुक होईल असं अपेक्षित होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत विधानही केलं होतं. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेत पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. ही आश्चर्यकारक बाब असल्याचं बोललं जातंय.
सातारा लोकसभेची पोटनिवडणुक जाहीर न होण्याबाबत आता तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.